Walking VsRunning Benefits : चालणे आणि धावणे हे दोन्ही शारीरिक क्रिया प्रकार आपल्या आरोग्यासाठी फायदेशीर आहेत. त्यामुळे जास्त वजन, लठ्ठपणा, मधुमेह, उच्च रक्तदाब, हृदयविकाराचा झटका येणं आणि इतर अनेक आरोग्यांसंबंधित समस्यांचा धोका कमी होतो. पण, रोज एक किलोमीटर धावण्यापेक्षा दोन किमी चालणं आरोग्यासाठी फायदेशीर ठरू शकतं का? याविषयी आरोग्यतज्ज्ञ काय सांगतात ते आपण जाणून घेऊ…
हैदराबाद येथील अपोलो हॉस्पिटल्सचे कन्सल्टंट न्यूरोलॉजिस्ट डॉ. सुधीर कुमार म्हणाले की, धावण्यापेक्षा चालणे आरोग्यासाठी चांगले आहे की नाही याचे उत्तर देणे कठीण आहे. धावल्याने वेळेची बचत करता येते. उदाहरणार्थ- एक किमी धावण्यासाठी ६-८ मिनिटे लागतात; तर दोन किमी चालण्यासाठी २०-२५ मिनिटे लागतात,
चालण्यापेक्षा धावल्यामुळे जास्त कॅलरीज बर्न (जर चालताना किंवा धावताना व्यतीत केलेल्या वेळेची किंवा समान अंतराची तुलना केली तर) होतात. चालण्यापेक्षा धावल्यामुळे हृदय व रक्तवाहिन्यासंबंधीच्या आरोग्यात मोठ्या प्रमाणात सुधारणा होते. VO2 max मध्येही असे दिसून येते की, चालण्यापेक्षा धावण्याने शरीरातील ऑक्सिजन लेव्हलमध्ये अधिक सुधारणा होत आहे, असे डॉ. सुधीर कुमार म्हणाले.
पण, धावण्याचे काही तोटेदेखील आहेत. धावण्यामुळे सांधे, स्नायू व अस्थिबंधने यांवर जास्त ताण येतो आणि म्हणूनच चालण्यापेक्षा धावल्यामुळे शारीरिक दुखापतींचा धोका जास्त असतो, डॉ. सुधीर कुमार असेही नमूद करतात की, गुडघ्यासंबंधित आजार ऑस्टिओआर्थरायटिस, लठ्ठपणा किंवा गंभीर हृदयरोग यांसारख्या काही गंभीर आजारांनी ग्रस्त असलेल्या लोकांना धावता येत नाही; परंतु ते सहज चालू शकतात. धावण्याचा नव्याने सराव करणारे लोक किंवा वृद्ध वयोगटातील लोकांना धावण्यापेक्षा चालणे सोपे वाटू शकते.
डॉ. कुमार पुढे असेही नमूद करतात की, धावणे किंवा चालणे यापैकी तुमच्यासाठी काय योग्य आहे हे निवडणे हे त्या त्या व्यक्तीवर अवलंबून आहे. कारण- सध्याच्या परिस्थितीत जगभरातील अर्ध्याहून अधिक लोक योग्य प्रकारे व्यायामाचे ध्येय (३०० मिनिटे हलके शारीरिक क्रिया प्रकार जसे की, चालणे किंवा दर आठवड्याला १५० मिनिटे तीव्र शारीरिक क्रिया प्रकार, जसे की, धावणे) पूर्ण करू शकत नाहीत.
म्हणून तुमच्या वैयक्तिक आवडीनुसार शारीरिक क्रिया प्रकारांची (चालणे किंवा धावणे) निवड करणे आणि शारीरिक क्रिया प्रकारांचे आठवड्याचे ध्येय साध्य करण्याचा प्रयत्न करणे महत्त्वाचे आहे, असेही डॉ. कुमार म्हणाले.