तुमच्यापैकी अनेक जण हातात Fitbit, Apple सह वेगवेगळ्या ब्रॅंडचे वॉच घालत असाल; पण तुम्हाला माहीत आहे का, या वॉचच्या रोजच्या वापरामुळे तुम्ही आजारी पडत आहात. तुम्हाला हे जाणून खोटे वाटेल; पण एका संशोधनात तुम्ही वापरत असलेल्या रिस्टबँडमध्ये व्यक्तीस आजारी पाडणारे अनेक बॅक्टेरिया आढळून आले आहेत. त्यामुळे या संशोधनात नेमके काय सांगण्यात आले आहे आणि या रिस्टबँडमुळे खरंच तुम्ही आजारी पडू शकता का याबाबत नवी दिल्लीच्या साकेतमधील मॅक्स सुपरस्पेशालिटी हॉस्पिटलचे डायरेक्टर (इंटर्नल मेडिसिन) डॉ. रोमेल टिकू यांनी ‘द इंडियन एक्स्प्रेस’शी बोलताना माहिती दिली आहे.
तुमच्यापैकी किती जण दिवसाच्या शेवटी वॉच घातलेल्या हाताचे मनगट स्वच्छ धुता, असा प्रश्न जर विचारला तर बहुतेकांना याचे उत्तर ठाऊक नसते. त्यात विशेषत: ‘ॲपल’ किंवा ‘फिटबिट’चे वॉच वापरत असाल, तर तुम्ही रोज मनगट स्वच्छ करणे आवश्यक आहे. कारण- फ्लोरिडा अटलांटिक युनिव्हर्सिटीच्या नवीन संशोधनात असे आढळून आले आहे की, तुमच्या आवडत्या वॉचचे रिस्टबँड जे दिवसभर वेगवेगळ्या गोष्टींच्या संपर्कात येते, त्यामुळे ते ई. कोलाय, स्टॅफिलोकोकससह अनेक हानिकारक बॅक्टेरियांचे ‘हॉटबेड’ बनत आहे. याच कारणामुळे कदाचित तुम्ही आजारी पडू शकता. त्यात वारंवार ताप आणि अतिसार होण्याची शक्यता आहे.
पण जर तुम्ही तुमचे वॉच, स्पोर्ट्स रिस्टबँड्स किंवा इतर डिव्हाइस हे अल्कोहोल वाइप्स, ॲपल सायडर व्हिनेगरचा वापर करून नियमित स्वच्छ केलेत, तर बॅक्टेरिया दूर राहू शकतात. डिव्हाइस स्वच्छतेसाठी यांचा वापर केल्यामुळे ३० सेकंदांत ९९.९९ टक्के बॅक्टेरिया मरू शकतात.
नव्या संशोधनात असे आढळून आले की, चाचणीतील ९५ टक्के वॉच रिस्टबँड्स अस्वच्छ होते. रबर आणि प्लास्टिकच्या वॉच रिस्टबँड्सवर असलेल्या विशिष्ट डिझाइन आणि छिद्रांमध्ये बॅक्टेरियांची संख्या जास्त असते; पण सोने, चांदी व धातूपासून बनवलेल्या वॉच रिस्टबँड्सवर एक तर बॅक्टेरिया नसतात किंवा असले तरी फार कमी असतात. पण, वॉच रिस्टबँड्सवर सापडलेले बॅक्टेरिया हे स्टॅफिलोकोकस आणि स्युडोमोनास या जातीचे होते; जे अनेकदा अस्वच्छ त्वचेवर आढळून येतात. तसेच आतड्यांसंबंधी एस्चेरिचिया, विशेषत: ई. कोलाय हे बॅक्टेरियाही आढळले. त्यातील ८५ टक्के रिस्टबँड्सवर स्टॅफिलोकोकसचा प्रादुर्भाव होता; तर ३० टक्के रिस्टबँड्सवर स्युडोमोनास आणि ६० टक्के रिस्टबँड्सवर ई-कोलाय बॅक्टेरिया आढळले; जे सामान्यतः अनेक संक्रमणांना सुरुवात करतात. जिममध्ये जाणाऱ्यांच्या हातातील रिस्टबँड्सवर स्टॅफिलोकोकल बॅक्टेरिया सर्वाधिक प्रमाणात आढळून आले. त्यामुळे हातात रिस्टबँड्स वॉच घालून जिममध्ये जाणाऱ्या किंवा घरात व्यायाम करणाऱ्या प्रत्येकाने वेळोवेळी रिस्टबँड्स पुसून स्वच्छ करावा.
या संशोधनावर डॉ. रोमेल टिकू म्हणाले की, यातून अशी एक वस्तुस्थिती समोर आली की, कोरोना महामारीपासून स्वच्छतेला फार महत्त्व आले आहे. त्यामुळे तुम्ही स्वच्छतेच्या बाबतीत केवळ जागरूक राहून उपयोगी नाही, तर बॅक्टेरियांना दूर ठेवण्यासाठी काळजी घेतली पाहिजे. अन्यथा तुम्ही घड्याळाद्वारे वाहून नेत असलेले बॅक्टेरिया तुम्हालाच नाही तर तुमच्या कुटुंबातील व्यक्तींसाठीही घातक ठरू शकतात. विशेषत: घरातील लहान मुले, गर्भवती महिला व वृद्ध व्यक्तींना याचा सर्वाधिक धोका असतो.
डॉ. टिकू हे स्वतः एक डॉक्टर असल्याने ते घरी आल्यावर त्यांच्या सर्व डिव्हायसेसचे निर्जंतुकीकरण करतात. त्यामुळे तुम्हीदेखील प्रत्येकाने असेच केले पाहिजे. त्यात तुमचा मोबाइल फोन, वॉच, पाकीट व लॅपटॉप सॅनिटाइज करून घेतला पाहिजे.
खास जिमसाठी वापरत असलेल्या रिस्टबँड्स वॉचच्या स्वच्छतेकडे दुर्लक्ष केले जाते; पण याच बँड्सवर सर्वाधिक घाम जमा होतो. तुम्हाला एका गोष्टीचे आश्चर्य वाटेल की, तुमच्या ऑफिसच्या टेबलावर ई. कोलाय नामक बॅक्टेरिया सर्वत्र विखुरलेला आहे. तर डॉक्टरांच्या स्टेथॉस्कोपमध्ये स्टॅफिलोकोकसची जास्तीत जास्त संख्या असते. अभ्यासात असे दिसून आले की, तुमचे ऑफिस डेस्क किंवा वर्कस्टेशनवर टॉयलेट सीटच्या तुलनेत सरासरी ४०० पट जास्त बॅक्टेरिया असू शकतात.
‘युनिव्हर्सिटी ऑफ ॲरिझोना’चे डॉ. चार्ल्स गेर्बा यांनी केलेल्या एका अभ्यासात असे आढळून आले की, कोणत्याही ऑफिस डेस्कवर कोणत्याही वेळी सुमारे १० दशलक्ष बॅक्टेरिया घर करून असतात. तरीही तुमच्यापैकी अनेक जण डेस्क स्वच्छ न करता, त्यावर मोबाईलपासून ते खाण्यापिण्याच्या अनेक गोष्टी ठेवतो. त्यामुळे अनेकांना ताप, सर्दी, खोकल्यासह अनेक आजारांचा संसर्ग होण्याचा धोका वाढतो. त्यामुळे प्रत्येकाने स्वच्छतेकडे लक्ष दिले पाहिजे, असे डॉ. टिकू यांनी सांगितले आहे.
बॅक्टेरिया सर्व ठिकाणी असतात. त्यातील स्टॅफिलोकोकस ऑरियस हा एक सामान्य आहे; जो मानवी त्वचा, नाक, बगल, कंबर, सांधे किंवा इतर भागांत सहजतेने स्थिर होतो. त्यामुळे विविध प्रकारचे रोग होतात. स्युडोमोनास बॅक्टेरिया सामान्यत: वातावरणात तरंगत असतो; जो रक्त, फुप्फुस आणि कमजोर लोकांना संक्रमित करतो. त्यानंतर ई. कोलाय व साल्मोनेला यांसारखे परिचित बॅक्टेरिया जे पोटाच्या विकारासाठी कारणीभूत मानले जातात. ते कमी संख्येतही विविध आजारांसाठी कारणीभूत ठरू शकतात. विशेषत: रोगप्रतिकार शक्ती कमकुवत असलेल्या लोकांना याचा सर्वाधिक धोका असतो, असे डॉ. टिकू म्हणाले.
अभ्यासासाठी संशोधकांनी प्लास्टिक, रबर, कापड, चामडे व धातू (सोने आणि चांदी) यांच्या रिस्टबँड्सची चाचणी केली; त्यात रिस्टबँड्स आणि बॅक्टेरियाचा प्रादुर्भाव यांच्यात परस्परसंबंध आहे का याचा अभ्यास करण्यात आला. त्यासाठी त्यांनी सर्व क्षेत्रातील सक्रिय व्यक्तींनी परिधान केलेले रिस्टबँड्स निवडले आणि ते सर्व रिस्टबँड्स सॅनिटाइज करण्याची गरज असल्याचे दिसले.
सूक्ष्म जीवशास्त्रीय तपासणी वापरून, संशोधकांनी बॅक्टेरियांची संख्या, त्यांचे प्रकार आणि मनगटाच्या पृष्ठभागावर ते कशा प्रकारे पसरतात याचे निरीक्षण केले. त्यानंतर त्यांनी तीन भिन्न जंतुनाशके; उदा. लायसोल जंतुनाशक स्प्रे, ७० टक्के इथेनॉल, अल्कोहोल वाइप्स, ॲपल सायडर व्हिनेगर हे या बॅक्टेरियांवर प्रभावशाली ठरतात हे तपासले. त्यातील लायसोल जंतुनाशक स्प्रे आणि ७० टक्के इथेनॉल हे सर्व प्रकारच्या रिस्टबँड मटेरियलमधील ९९ टक्के बॅक्टेरियांना ३० सेकंदांत नष्ट करीत असल्याचे अभ्यासातून दिसून आले आहे; पण ॲपल सायडर व्हिनेगर तितकेसे शक्तिशाली ठरले नाही. त्यामुळे बॅक्टेरियांची संख्या कमी करण्यासाठी दोन मिनिटांच्या एक्सपोजरची गरज लागली. पण, केवळ घड्याळाचे रिस्टबँडच नाहीत; तर इअरबड्स किंवा सेल फोनवरील बॅक्टेरियांबाबतही असा अभ्यास होण्याची गरज आहे, असेही डॉ. इसोबू म्हणाले.
