मुंबई : भारतामध्ये वंध्यत्वाच्या उपचारांमध्ये झपाट्याने होत असलेल्या प्रगतीमुळे आयव्हीएफ (इन व्हिट्रो फर्टिलायझेशन) तंत्रज्ञान अधिक प्रभावी आणि विश्वासार्ह ठरत आहे. या क्षेत्रात आता एक नवं आणि महत्त्वाचं पाऊल पुढे आल आहे. भ्रूणाच्या जेनेटिक टेस्टिंगचं. हे तंत्रज्ञान अनेक जोडप्यांसाठी पालकत्वाची नवी आशा घेऊन येत असल तरी त्याचवेळी काही गंभीर नैतिक प्रश्नही उभे करत आहे.
आयव्हीएफ प्रक्रियेत प्रिंम्प्लांटेशन जेनेटिक टेस्टिंग (पीटीजी) चा वापर करून भ्रूण गर्भाशयात रोपण करण्यापूर्वीच त्याची तपासणी केली जाते. या चाचणीमुळे भ्रूणामध्ये असलेले क्रोमोसोमल दोष किंवा आनुवंशिक आजार आधीच ओळखता येतात. परिणामी, डॉक्टरांना निरोगी भ्रूण निवडण्याची संधी मिळते. यामुळे गर्भपाताचा धोका कमी होतो आणि आयव्हीएफचा यशदर वाढण्यास मदत होते. विशेषतः ज्यांना वारंवार आयव्हीएफ अपयशी ठरलं आहे किंवा कुटुंबात आनुवंशिक आजारांचा इतिहास आहे अशा जोडप्यांसाठी हे तंत्रज्ञान अत्यंत उपयुक्त ठरत आहे.
तंत्रज्ञानातील प्रगतीमुळे आयव्हीएफ प्रक्रिया अधिक अचूक आणि परिणामकारक झाली आहे. भ्रूणाच्या वाढीवर सतत लक्ष ठेवणारी आधुनिक यंत्रणा, सुधारित भ्रूण गोठवण्याच्या पद्धती (क्रायोप्रिझर्वेशन) आणि अत्याधुनिक प्रयोगशाळा सुविधा यामुळे उपचारांचे परिणाम लक्षणीयरीत्या सुधारले आहेत. त्यामुळे अनेक जोडप्यांसाठी पालकत्वाचा प्रवास आता पूर्वीपेक्षा अधिक सुलभ आणि आशादायक झाला आहे. मात्र या प्रगतीसोबतच एक महत्त्वाचा प्रश्न समोर येतो तो म्हणजे या तंत्रज्ञानाची मर्यादा नेमकी काय असावी हा.
सध्या जेनेटिक टेस्टिंगचा वापर गंभीर आनुवंशिक आजार टाळण्यासाठी केला जातो जे वैद्यकीय दृष्टिकोनातून योग्य मानल जात. परंतु भविष्यात जर याच तंत्रज्ञानाचा वापर बाळाचे गुणधर्म ठरवण्यासाठी जसे की बुद्धिमत्ता, उंची किंवा दिसण करण्याचा प्रयत्न झाला तर ‘डिझायनर बेबी’ ही संकल्पना वास्तवात येऊ शकते. यामुळे सामाजिक असमानता वाढण्याची भीती व्यक्त केली जाते.
भारतामध्ये या संदर्भात काही कडक कायदे लागू करण्यात आले आहेत. असिस्टेड रिप्रॉडक्टिव्ह टेक्नॉलॉजी ॲक्ट २०२१ आणि पीसीपीएनडीटी कायद्याअंतर्गत लिंगनिवड पूर्णपणे बंद आहे. तसेच जेनेटिक टेस्टिंगचा गैरवापर होऊ नये यासाठी नियमावली आखण्यात आली आहे. तरीही, तज्ज्ञांच्या मते, तंत्रज्ञान ज्या वेगाने विकसित होत आहे, त्याच वेगाने नैतिक आणि कायदेशीर चौकट मजबूत करण्याची गरज आहे.याशिवाय, खर्च आणि उपलब्धता हेही मोठे अडथळे आहेत.
महानगरांमध्ये अत्याधुनिक सुविधा उपलब्ध असल्या तरी ग्रामीण किंवा निम्न उत्पन्न गटातील लोकांसाठी आव्हीएफ आणि जेनेटिक टेस्टिंग अजूनही महागडे आणि सहज उपलब्ध नसलेले उपचार आहेत. त्यामुळे या तंत्रज्ञानाचा लाभ सर्वांपर्यंत समानपणे पोहोचत नाही हीदेखील एक चिंतेची बाब आहे. तज्ज्ञांचे मत स्पष्ट आहे की आयव्हीएफ मधील जेनेटिक टेस्टिंग हे ना पूर्णपणे वरदान आहे ना पूर्णपणे धोका. योग्य नियम आणि जबाबदारीच्या चौकटीत वापर केल्यास हे तंत्रज्ञान अनेक कुटुंबांसाठी आनंदाचा मार्ग ठरू शकते. मात्र, नैतिक मर्यादा ओलांडल्या गेल्यास हेच तंत्रज्ञान समाजासाठी नवे आणि गुंतागुंतीचे प्रश्न निर्माण करू शकते.एकूणच विज्ञानाने दिलेल्या या नव्या शक्यता जितक्या आशादायक आहेत, तितक्याच सावधगिरीने हाताळण्याची गरजही तितकीच मोठी आहे.
