Jemimah Rodrigues on fitness periods and the pressure of pro cricket : भारतीय महिला क्रिकेटमध्ये जेमिमा रॉड्रिग्ज हे नाव आता सातत्य, आत्मविश्वास आणि जिद्दीचे प्रतीक बनले आहे. खेळावरील तिच्या प्रेमाच्या आड काहीही येऊ देत नाही, अगदी मासिक पाळीसुद्धा नाही. करिअरच्या सुरुवातीच्या टप्प्यात मासिक पाळीतील वेदना आणि अस्वस्थतेमुळे सराव करताना अडचणी येत असल्याची ती प्रामाणिक कबुली देते. मात्र आता आरोग्याला प्राधान्य देणे, शरीराचे संकेत ओळखणे आणि गरज पडल्यास एक पाऊल मागे घेणे हे तिने स्वीकारले आहे.

इंडियन एक्सप्रेसला दिलेल्या ई-मेल मुलाखतीत महिला प्रीमियर लीगमधील (WPL) दिल्ली कॅपिटल्सची कर्णधार जेमिमाने मैदानावर मासिक पाळीचा ताण कसा सांभाळते, व्यावसायिक खेळाडू म्हणून मानसिक दबाव कसा हाताळते, फिटनेस का अत्यावश्यक आहे आणि तिचा आहार कसा असतो याबद्दल सविस्तर संवाद साधला.

भारतीय महिला क्रिकेटमधील आघाडीची फलंदाज आणि डब्ल्यूपीएलमधील दिल्ली कॅपिटल्सची कर्णधार जेमिमा रॉड्रिग्ज हिने फिटनेस, मासिक पाळीच्या काळातील आव्हाने आणि व्यावसायिक क्रिकेटमधील मानसिक ताण यावर मनमोकळेपणाने भाष्य केले आहे. “देशासाठी फलंदाजी करताना मासिक पाळीची चिंता मनात असू नये,” असे सांगताना ती मान्य करते की सुरुवातीच्या काळात मासिक पाळीमुळे तिला प्रशिक्षणात अडचणी आल्या होत्या.

Award Banner

देशासाठी खेळताना पाळीची चिंता नको (Balancing Periods and Professional Commitments)

देशासाठी फलंदाजी करताना मासिक पाळीची चिंता मनात असू नये, असे जेमिमा आधीच सांगते. मात्र करिअरच्या सुरुवातीच्या काळात तिला मासिक पाळीमुळे काही वेळा सराव किंवा सत्रांमध्ये अडचणींचा सामना करावा लागला होता, हे ती स्पष्टपणे मान्य करते.

ती सांगते की,”तीव्र पोटदुखी, थकवा आणि अस्वस्थतेमुळे काही दिवस प्रशिक्षण अधिक कठीण होत असे. अशा वेळी शरीराचे संकेत ऐकणे भाग पडत असे. त्या काळात मासिक पाळीबद्दल खुलेपणाने बोलण्याचीही संकोचाची भावना होती.

अनुभवातून मात्र तिने एक महत्त्वाचा धडा शिकला की,” गरज असल्यास गती कमी करणे किंवा थोडा ब्रेक घेणे पूर्णपणे योग्य आहे. आता ती पाळीचे व्यवस्थापन हा अतिरिक्त ताण होऊ देत नाही. काही दिवस स्वतःला पुढे ढकलायचे असतात, तर काही दिवस विश्रांती घ्यायची असते आणि दोन्ही गोष्टी तितक्याच योग्य आहेत, असे ती ठामपणे सांगते.

पाळीवरील मौन आणि बदलती जाणीव (Breaking the Silence Around Menstruation)

भारतात अजूनही मासिक पाळी हा विषय अनेक घरांत संकोचाने हाताळला जातो. जेमिमा सांगते की,”तिच्या लहानपणी मासिक पाळीबाबत उघडपणे चर्चा होत नव्हती. तो विषय अत्यंत खाजगी मानला जायचा आणि त्याभोवती एक प्रकारचे मौन आणि अस्वस्थता असायची. काय करायचे हे सांगितले जायचे, पण का करायचे याचे स्पष्ट कारण दिले जात नव्हते, त्यामुळे अनेकदा गोंधळ निर्माण होत असे.

वय वाढत गेले आणि खेळाच्या क्षेत्रात अधिक वेळ घालवताना तिला मासिक पाळी ही पूर्णपणे नैसर्गिक आणि सामान्य प्रक्रिया असल्याची जाणीव झाली. महिलांवर मासिक पाळीचा शारीरिक आणि भावनिक परिणाम कसा होतो, हे तिने जवळून अनुभवले आहे. तरीही समाजात अनेकदा “काहीच घडलेले नाही” अशा पद्धतीने वागण्याची अपेक्षा केली जाते, असे ती नमूद करते.

म्हणूनच तिच्या मते, “मासिक पाळीबाबतचे संवाद लवकर सुरू होणे आवश्यक आहे. घरात आणि शाळेत या विषयावर खुलेपणाने चर्चा झाली, तर मुलींना एखाद्या नैसर्गिक प्रक्रियेबद्दल मर्यादा किंवा संकोच वाटणार नाही.”

निर्बंध, संकोच आणि अनुभवांच्या गोष्टी (Restrictions and Awkward Realities)

मासिक पाळीच्या काळात कधी एखादा अवघड प्रसंग किंवा निर्बंधांचा सामना करावा लागला का, यावर जेमिमा सांगते की,”ती स्वतः त्या बाबतीत सुदैवी ठरली. मात्र बहुतेक मुलींप्रमाणेच तिने मैत्रिणी, वर्गमैत्रिणी आणि सहकाऱ्यांकडून मासिक पाळीशी संबंधित अनेक अनुभव ऐकले आहेत.”

“काहींना विशिष्ट पदार्थ खाऊ नको, काही ठिकाणी जाऊ नको, काही गोष्टींना हात लावू नको,” अशा सूचना दिल्या जातात. अनेकदा हे थेट शब्दांत सांगितले जात नाही, पण वातावरणात न बोलताच एक संकोच जाणवत राहतो.

जेमिमाच्या मते, “हीच मानसिकता बदलणे आवश्यक आहे. मासिक पाळीशी भीती, लाज किंवा अनावश्यक नियम जोडले जाऊ नयेत. या विषयावर जितक्या खुलेपणाने चर्चा होईल, तितक्या सहजपणे मुलींना आत्मविश्वास आणि पाठिंबा मिळेल.”

निर्णायक सामन्यात पाळीची वेदना कशी हाताळतात? (Managing Period Pain on Crucial Match Days)

पॉडकास्टमध्ये सहकाऱ्यांना मासिक पाळी दरम्यान होणाऱ्या तीव्र वेदनेचा सामना करताना पाहिल्याचा उल्लेख जेमिमाने केला होता. याबाबत ती सांगते की,”काही दिवस वेदना इतक्या तीव्र असतात की हालचाल करणे किंवा लक्ष केंद्रित ठेवणेही कठीण होते. अशा परिस्थितीचा प्रभाव सराव किंवा महत्त्वाच्या सामन्यावर पडू शकतो.”

मात्र अशा वेळी सर्वात महत्त्वाचे ठरते ते संवाद आणि परस्पर पाठिंबा. खेळाडू स्वतःची प्रकृती प्रामाणिकपणे सांगतात, तर प्रशिक्षक आणि फिजिओ परिस्थितीनुसार कामाचा ताण कमी-जास्त करतात. प्रत्येक जण त्या दिवशी ज्या पातळीवर खेळू शकतो, तितकेच योगदान देतो.

जेमिमाच्या मते, मासिक पाळीच्या काळात शरीर साथ देत नसेल तर स्वतःला अति शारीरिक ताण देणे आवश्यक नाही. त्याच वेळी संघातील एकजूट आणि समजूतदारपणा खेळाडूंना मैदानावर उभे राहण्याचे बळ देतो.

मैदानावर खेळणाऱ्या महिलांसाठी योग्य पाळी संरक्षण का महत्त्वाचे? (Why Period Protection Matters for Active Women)

व्हिस्परसोबतच्या सहकार्याबद्दल बोलताना जेमिमा सांगते की,”तिच्यासाठी हा केवळ ब्रँड करार नाही, तर मुली आणि महिलांना पाळीच्या दिवसांतही मोकळेपणाने वावरता यावे, हा मुख्य उद्देश आहे. मैदानावर आणि मैदानाबाहेर वेगवान जीवनशैली जगताना तिला असे संरक्षण आवश्यक वाटते, जे लक्ष विचलित करणार नाही किंवा कामगिरीत अडथळा आणणार नाही.

ती विशेषतः “व्हिस्पर पिरियड पॅंटी”चा उल्लेख करते. तिच्या मते, ३६० अंश संरक्षण देणारे आणि नियमित अंतर्वस्त्रासारखे आरामदायी वाटणारे हे उत्पादन सराव, सामना, प्रवास आणि लांब दिवसांमध्येही आत्मविश्वास टिकवून ठेवण्यास मदत करते.

खेळाडू किंवा सक्रिय जीवनशैली जगणाऱ्या महिलांसाठी अशा प्रकारचे संरक्षण उपयोगी ठरते, कारण त्यामुळे गळती, डाग किंवा सततच्या अस्वस्थतेची चिंता न करता आपल्या आवडीच्या गोष्टींवर लक्ष केंद्रित करता येते. जेमिमाच्या शब्दांत, मासिक पाळी हा आयुष्याचा नैसर्गिक भाग आहे, त्यामुळे वापरले जाणारे उत्पादनही साथ देणारे असावे, अडथळा ठरणारे नव्हे.

दररोजची फिटनेस दिनचर्या (Daily Fitness Routine of Jemimah Rodrigues)

व्यावसायिक क्रिकेटपटू म्हणून जेमिमासाठी फिटनेस हा दिवसेंदिवस महत्त्वाचा भाग आहे. ती कौशल्याच्या सत्रांना फिटनेसच्या सरावासोबत संतुलित करते. काही दिवस स्ट्रेंथ, कंडिशनिंग, धावणे आणि जिमवर लक्ष केंद्रित केले जाते, तर काही दिवस फलंदाजी, क्षेत्ररक्षण आणि सामन्यांच्या सिम्युलेशन्सवर भर दिला जातो.

स्वतंत्रपणे काम करत असो किंवा संघासोबत, ती नेहमी संरचित पद्धतीने सराव करते, जेणेकरून कोणत्याही घटकावर जास्त ताण न येता सर्वोत्तम कामगिरी करता येईल. सरावाबरोबर झोप, योग्य आहार आणि पुनर्बांधणी (recovery) यालाही तितकेच महत्त्व दिले जाते. हे सर्व तिला मैदानात चपळ राहण्यासाठी, बॉल लांब मारण्यासाठी आणि सामन्यांमध्ये आत्मविश्वासाने उतरायला मदत करते.

संतुलित आहाराचा फॉर्म्युला (Balanced Diet Plan)

खेळाडूंसाठी आहार तितकाच महत्त्वाचा असतो, असे जेमिमा सांगते. ती आपला आहार संतुलित ठेवण्यावर भर देते. दिवसाची सुरुवात हलक्या आणि ऊर्जादायी नाश्त्याने होते. फळे, स्मूदी किंवा घरगुती हिरव्या भाज्यांचा ज्यूस यांचा समावेश करून ती शरीराला हायड्रेटेड आणि ताजेतवाने ठेवते.

दुपारचे आणि रात्रीचे जेवण प्रथिने, भाज्या आणि कार्बोहायड्रेट्स यांच्या संतुलनावर आधारित असते, जे सराव आणि शरीराला पुन्हा बरे करण्यासाठी आवश्यक ऊर्जा देते. मात्र ती आवडते पदार्थ पूर्णपणे टाळत नाही. कधीमधी मुंबईतील स्ट्रीट फूड किंवा दीर्घ दिवसानंतर एखादा छोटा ‘ट्रीट’ घेणेही ती महत्त्वाचे मानते. तिच्या मते, योग्य खाणे आणि आनंदाने खाणे या दोन्ही गोष्टींचा समतोल साधणे आवश्यक आहे.

मानसिक लढाईच सर्वात कठीण (The Mental Side of Professional Sport)

आजच्या काळात खेळाडूसाठी सर्वात मोठे आव्हान काय, यावर जेमिमा स्पष्टपणे सांगते की मानसिक बाजू हाताळणे हेच सर्वात कठीण आहे. प्रचंड अपेक्षा, सातत्याचा ताण आणि कधीमधी होणारी अपयशाची भावना, या सगळ्यांची खरी लढाई मनातच सुरू असते.

आत्मविश्वास टिकवून ठेवणे, परिस्थितीकडे योग्य दृष्टीकोनातून पाहणे आणि दबावामुळे खेळातील आनंद हरवू न देणे, यासाठी ती सतत प्रयत्न करत असते. मात्र तिच्या मते, हाच संघर्ष खेळाडूला अधिक मजबूत बनवतो. तो केवळ मैदानावरील कामगिरी सुधारत नाही, तर व्यक्तिमत्त्व घडवण्यासही मदत करतो.

ताण, टीका आणि अपयशात मानसिक संतुलन कसे राखते? (Maintaining Mental Well-being Under Pressure)

स्वत:कडून असलेल्या जास्तीच्या अपेक्षा, टीका, खराब कामगिरी, दुखापती आणि पराभव, या सगळ्यांच्या दरम्यान मानसिक संतुलन राखणे सोपे नसते, असे जेमिमा मान्य करते. काही क्षण असे आले की,”सगळेच भारावून टाकणारे वाटले. मात्र त्या वेळी सर्वाधिक मदत झाली ती स्वतःच्या भावनांबद्दल प्रामाणिक राहण्यात.”

ती सांगते की,”सर्व काही एकट्याने झेलण्यापेक्षा कुटुंब, सहकारी आणि मित्रांचा आधार घेणे महत्त्वाचे ठरते. भावना दडपून न ठेवता व्यक्त केल्याने ताण हलका होतो. त्याचबरोबर ती निकालाऐवजी प्रक्रियेवर लक्ष केंद्रित करते. दररोज मैदानावर हजर राहून प्रामाणिकपणे मेहनत करणे हे परिपूर्णतेच्या मागे धावण्यापेक्षा अधिक महत्त्वाचे आहे,” असे तिचे मत आहे.

उद्याचे खेळाडू, विशेषतः महिलांसाठी तिचा संदेश स्पष्ट आहे, “असुरक्षित वाटणे चुकीचे नाही, मदत मागणे कमकूवतपणा नाही आणि मानसिक आरोग्य हे शारीरिक फिटनेसइतकेच महत्त्वाचे आहे. खेळातील यश टिकवायचे असेल, तर मनाची काळजी घेणे तेवढेच आवश्यक आहे.

निर्णायक सामन्यापूर्वी विश्रांतीचा मंत्र (Importance of Rest and Recovery Before Big Matches)

महत्त्वाच्या सामन्यापूर्वी विश्रांती आणि पुनर्बांधणी अत्यावश्यक असल्याचे जेमिमा ठामपणे सांगते. तिच्यासाठी ‘रेस्ट डे’ म्हणजे अतिउत्साह किंवा अतिरिक्त सराव नव्हे, तर साधेपणा जपणे. पुरेशी आणि दर्जेदार झोप, योग्य आणि पौष्टिक आहार, तसेच शरीराचे संकेत ऐकणे, या गोष्टींवर ती भर देते, जेणेकरून दुसऱ्या दिवशी ती ताजेतवाने वाटेल.

सामन्यापूर्वी अति विचार करणे ती टाळते. हलका नेट सराव करून लय साधणे आणि त्यानंतर मानसिकदृष्ट्या स्वतःला शांत ठेवण्यासाठी वेळ देणे, हा तिचा दृष्टिकोन असतो.

तिच्या मते, शरीर हे यंत्र नाही. जर मेहनत घेतली असेल, तर पुन्हा बळ मिळवम्यासाठी वेळ देणेही तितकेच गरजेचे आहे. योग्य विश्रांतीमुळेच खेळाडू मैदानावर ऊर्जा आणि स्पष्टतेसह उतरू शकतो.