Why Eating at Home is Healthier : सेलिब्रिटी न्युट्रिशनिस्ट ऋजुता दिवेकर यांनी अलीकडेच घरचे जेवण विरुद्ध बाहेरचे जेवण यावरून सुरू असलेल्या वादावर कमेंट करत सर्वांचे लक्ष वेधले आहे. त्यांनी नियमित रेस्टॉरंटमध्ये जेवण करण्याचा आग्रह धरणाऱ्या जाहिरातीविरुद्ध ठाम भूमिका मांडली आहे.

झिरोधाचे सह-संस्थापक निखिल कामथ यांनी सिंगापूरमधील खाण्याच्या सवयींवर एक पोस्ट शेअर केली आहे. सिंगापूरमध्ये त्यांना दिसून आले की, अनेकदा लोक घरी स्वयंपाक करत नाहीत. यावर प्रत्युत्तर देताना दिवेकर त्यांच्या फॉलोअर्सना श्रीमंत मुलांपासून प्रभावित होऊ नका, असा सल्ला देत आरोग्यासाठी घरी तयार केलेले जेवण किती महत्त्वाचे आहे, याविषयी सांगतात.

करीना कपूर खानसारख्या बॉलीवूड सेलिब्रिटींबरोबर काम केलेल्या दिवेकर यांनी सोशल मीडियावर घरी तयार केलेल्या खाद्यपदार्थांचे फायदे सांगितले आहेत. त्या सांगतात, “श्रीमंत मुलांचे ऐकू नका, घरचे जेवण हे आरोग्यदायी व चांगली सवय आहे, त्यामुळे आपण अनेक आजारांपासून दूर राहतो.” त्यांनी पुढे लोकांना लिंग, वय किंवा उत्पन्नाचा विचार न करता स्वयंपाक करायला शिकण्यास आणि त्याचा नियमित सराव करण्यास प्रोत्साहन दिले आहे.

कामथ काय म्हणाले?

त्यांच्या एक्स अकाउंटवर त्यांनी सिंगापूरच्या खाद्यसंस्कृतीविषयी सांगितले आहे. कामथ सांगतात की, सिंगापूरमध्ये जवळपास कोणीच घरी स्वयंपाक करत नाही. पुढे ते सांगतात की, जर भारताने हा ट्रेंड स्वीकारला तर रेस्टॉरंट उद्यागोला मोठ्या प्रमाणात गुंतवणूक करण्याची संधी निर्माण होऊ शकते. सध्या त्यांच्या या वक्तव्याची सोशल मीडियावर जोरदार चर्चा सुरू आहे.

जर तुम्ही रोज बाहेर खात असाल तर काय होईल?

घरचे जेवण टाळणे हे सोयीसाठी आकर्षक वाटू शकते, पण संशोधन आणि तज्ज्ञांनी सतत रेस्टॉरंटमध्ये जेवण केल्याने निर्माण होणाऱ्या दीर्घकालीन आजारांविषयी सांगत धोक्याचा इशारा दिला आहे. आहारतज्ज्ञ कनिक्का मल्होत्रा (Kanikka Malhotra) यांनी नियमित बाहेर जेवण केल्यामुळे उद्भवणाऱ्या समस्यांविषयी सांगितले आहे.

कॅलरीचे अतिसेवन : रेस्टॉरंटच्या जेवणात अनेकदा जास्त कॅलरी, शरीरासाठी खराब असलेले फॅट, साखर आणि सोडियम असतात, ज्यामुळे वजन वाढू शकते.

आजारांचा धोका वाढतो : प्रक्रिया केलेले आणि जास्त फॅटयुक्त पदार्थांचे नियमित सेवन केल्याने हृदय व रक्तवाहिन्यांसंबंधित आजार, टाइप २ मधुमेह आणि उच्च रक्तदाबाचा धोका वाढतो. अभ्यासात असे दिसून आले आहे की जे लोक बाहेर खातात ते घरी जेवण बनवणाऱ्यांपेक्षा जास्त प्रमाणात आरोग्यास हानिकारक जेवण करतात.

स्वच्छतेची काळजी घेणे : घरगुती स्वयंपाकघरांऐवजी जर तुम्ही रेस्टॉरंटमध्ये जेवण करत असाल तर तिथे स्वच्छतेविषयी सतर्क राहणे गरजेचे आहे. रेस्टॉरंट फूड, व्यवस्थित स्टोरेज न करणे यामुळे अन्नजन्य आजारांचा धोका निर्माण होऊ शकतो.

चयापचयाशी संबंधित आरोग्याची समस्या : सतत बाहेर खाणे, विशेषतः फास्ट फूड आणि प्रक्रिया केलेले अन्नाचे सेवन करणे यामुळे चयापचयाशी संबंधित आरोग्याच्या समस्या निर्माण होऊ शकतात. तसेच हृदयरोग आणि मधुमेहाचा धोका वाढू शकतो.

आपण किती प्रमाणात बाहेरचे खायला पाहिजे?

कधीतरी बाहेर जेवण करणे आनंददायी असू शकते. तरी निरोगी आहार घेताना संयम राखणे महत्त्वाचे आहे. मल्होत्रा यांच्यासह काही तज्ज्ञांनी महत्त्वाच्या टिप्स सांगितल्या आहेत.

  • रेस्टॉरंटचे जेवण आठवड्यातून एक किंवा दोनदा तुम्ही करू शकता. उत्तम पोषक आहारासाठी घरी तयार केलेल्या अन्नाला प्राधान्य द्या.
  • आरोग्यदायी रेस्टॉरंटचा पर्याय निवडा, जसे की भाज्या, प्रोटिन्स आणि धान्याचा आहारात समावेश करून तळलेले पदार्थ आणि सॉस खाणे टाळा.
  • तुम्ही किती प्रमाणात खाता याची काळजी घ्या, कारण रेस्टॉरंटमध्ये अनेकदा आवश्यकतेपेक्षा जास्त अन्न ताटात वाढले जाते, त्यामुळे प्रमाणाच्या बाहेर जेवण होते.
  • सध्याच्या जीवनशैलीत रेस्टॉरंटमध्ये जेवण करण्याला अधिक प्राधान्य देत असले तरी दीर्घकालीन आरोग्य जपण्यासाठी योग्य अन्नाची निवड करणे आवश्यक आहे.