Kidney Failure Symptoms in Marathi: डॉ. अमरेंद्र कुमार यांच्या माहितीनुसार युरिक ऍसिडचे प्रमाण वाढल्याने बहुतांश वेळा किडनीमध्ये टॉक्सिन्स वाढून किडनी फेल होण्याचा धोका असतो. आपल्या शरीरात किडनीचे काम खूप महत्त्वाचे असते. रक्त शुद्ध करण्यासाठी आणि शरीरातील घातक कचरा बाहेर टाकण्यासाठी किडनी काम करत असते. किडनीच्या बाबत एक सोयीची बाब म्हणजे हृदय विकाराचा झटका येण्याइतका किंवा ब्रेन स्ट्रोक इतकं अचानक किडनी निकामी होत नाही. उलट काही महिन्यांपासून तुम्हाला किडनी आपल्या अस्वास्थ्याचे लक्षण काही चिन्हांमधून देत असते. युरिक ऍसिड वाढल्याचे किंवा किडनी निकामी होत असल्याची लक्षणे तुमच्या संपूर्ण शरीरात दिसून येतात. ही लक्षणे कशी ओळखायची हे जाणून घेऊयात..

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

किडनी निकामी होण्याची लक्षणे

सतत थकवा व कंटाळा

डॉ. पुरू धवन, आयुर्वेदिक किडनी तज्ञ आणि साई संजीवनीचे संस्थापक सांगतात की, तुम्हाला काम आवडत असूनही काम करताना ऊर्जा जाणवत नसेल तर हा अगदी छोटासा बदलही किडनी निकामी होण्याचे लक्षण असू शकते. . किडनीची कार्यक्षमता कमी झाल्याने रक्त अशुद्ध होण्यास सुरुवात होते. त्यामुळे रक्तप्रवाहात अडथळा येतो ज्यामुळे थकवा किंवा अशक्तपणा जाणवू लागतो.

त्वचा सुकणे व खाज येणे

डॉ. पुरू धवन (बीएएमएस) यांच्या मते, निरोगी किडनी अनेक महत्त्वाची कामे करते, ज्यामध्ये शरीरातील कचरा आणि घाण काढून टाकण्याचा समावेश असतो. तसेच रक्तपेशी बनविण्यास हाडे मजबूत ठेवण्यास मदत करते. यामुळेच तुमच्या रक्तातील खनिजे योग्य काम करतात. त्वचा जेव्हा कोरडी पडते आणि त्वचेला खाज सुटते तेव्हा हे खनिज आणि हाडांच्या आजाराचे लक्षण असू शकते. तसेच ते किडनीच्या बिघाडाचेही प्रमुख लक्षण असू शकते.

लघवीचा रंग

निरोगी किडनी सामान्यत: मूत्र तयार करण्यासाठी रक्तातील टाकाऊ पदार्थ फिल्टर करतात, ज्या प्रक्रियेत रक्त पेशी शरीरात ठेवल्या जातात व कचरा बाहेर टाकला जातो. जेव्हा किडनीचे फिल्टर खराब होतात, तेव्हा या रक्त पेशी मूत्रात “मिसळून” शरीराबाहेर पडू शकतात. मूत्राचा बदललेला रंग हा किडनीच्या आजारासह ट्यूमर, किडनी स्टोन किंवा संसर्गाचे चिन्हे असू शकतात.

फेसाळ लघवी

लघवीमध्ये जास्त फेस असल्यास तुमच्या शरीरातील प्रोटीन सुद्धा शरीराबाहेर पडत असल्याचे लक्षण आहे. सोप्या भाषेत समजून घ्यायचं तर जेव्हा तुम्ही अंडी एखाद्या वाटीत फेटून घेत असता तेव्हा थोडा फेस तयार होतो. कारण अंड्यामध्ये अल्ब्युमिन हे प्रोटीन असते. हेच प्रोटीन शरीरातही असते, त्यामुळे जेव्हा किडनीचे फिल्टर खराब होतात तेव्हा प्रथिने लघवीत मिसळून फेसाळ स्वरूपात बाहेर येऊ शकते.

हे ही वाचा<< लसणाच्या सेवनाने ‘हे’ ३ त्रास १०० च्या वेगाने वाढू शकतात; लसूण खाणे कोणी टाळावे? जाणून घ्या

पायात ‘या’ ठिकाणी सूज

किडनीचे काम कमी झाल्यास शरीरात सोडियमचे प्रमाण वाढते. त्यामुळे तुमच्या पायाला विशेषतः घोट्याजवळ सूज येऊ शकते. शरीराला सतत सूज येत असल्यास हे केवळ किडनी निकामी झाल्याचे नव्हे तर हृदय विकार, यकृताचे आजार व पायांच्या रक्तवाहिनीच्या दीर्घकालीन समस्यांचेही लक्षण असू शकते.

क्रॅम्प व पायाला मुंग्या येणे

डॉ. पुरू धवन सांगतात, “किडनीच्या बिघाडाने इलेक्ट्रोलाइट असंतुलित होऊ शकतो. यामुळे कॅल्शियम पातळी कमी व फॉस्फरसचे प्रमाण वाढू शकते. यामुळेच तुम्हाला सतत पायांमध्ये क्रॅम्प जाणवू शकतात.”

मराठीतील सर्व हेल्थ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Kidney failure symptoms in marathi health news your body alerts before disease svs
First published on: 03-01-2023 at 19:35 IST