Kidney Health: किडनीला हृदय किंवा मेंदूइतके महत्त्व क्वचितच दिले जाते. लोक हृदयविकाराचा झटका, रक्तातील साखर आणि कोलेस्ट्रॉल बद्दल बोलतात. पण किडनी मात्र शांतपणे आपले काम करतात. शरीरातील घाण बाहेर टाकणे, द्रव पदार्थांचे संतुलन राखणे आणि रक्तदाब स्थिर ठेवणे. त्या शांतपणे काम करत असल्यामुळे जोपर्यंत काहीतरी गंभीर घडत नाही, तोपर्यंत बहुतेक लोक त्यांच्याबद्दल विचार करत नाहीत. नेमकी समस्या हीच आहे. किडनीच्या समस्या अनेकदा हळूहळू विकसित होतात, त्यामुळे सर्व काही ठीक आहे असंच समजलं जातं.

आपल्या दैनंदिन सवयी देखील यात भूमिका बजावतात. आपल्यापैकी बरेच जण जास्त मीठ खातात, पॅकेज्ड फूडवर अवलंबून राहतात, कामाच्या व्यापात पाणी पिणे टाळतात किंवा विचार न करता पेनकिलर्स घेतात. या गोष्टी त्या क्षणी धोकादायक वाटत नाहीत. पण कालांतराने त्या किडनीवर दबाव आणतात. कठीण गोष्ट अशी आहे की, सुरुवातीच्या किडनीच्या नुकसानीची कोणतीही स्पष्ट लक्षणे दिसत नाहीत. अचानक वेदना होत नाही. त्यामुळे आपल्या किडनीला त्रास होत असेल याची जाणीवही न होता लोक जीवन जगत राहतात.

थकवा, सूज, लक्ष केंद्रित करण्यात अडचण आणि गंभीर प्रकरणांमध्ये डायलिसिस किंवा ट्रान्सप्लांट (प्रत्यारोपण) अशा समस्या समोर आल्यावर वेळीच लक्ष दिले नाही तर ते गंभीर परिणाम शरीरावर करतात.

क्रॉनिक किडनी डिसीज (CKD) हे जागतिक आरोग्य आव्हान

‘जर्नल ऑफ द असोसिएशन ऑफ फिजिशियन्स ऑफ इंडिया’ (JAPI) मध्ये प्रसिद्ध झालेल्या अहवालानुसार, ग्लोबल बर्डन ऑफ डिसीज २०१७ च्या अभ्यासानुसार, जगभरात सुमारे ६९ कोटी लोक किडनीच्या आजाराने (CKD) ग्रस्त आहेत, ज्यामध्ये भारताचा क्रमांक चीननंतर दुसरा लागतो. भारतात सुमारे ११.५ कोटी रुग्ण असून, जगातील दर सहा रुग्णांमागे एक रुग्ण भारतीय आहे. ही आकडेवारी पाहता किडनी स्वास्थ्याकडे लक्ष देणे अनिवार्य झाले आहे.

बंगळुरू येथील किम्स (KIMS) हॉस्पिटलचे संचालक आणि प्रमुख सल्लागार – नेफ्रोलॉजी, डॉ. विद्याशंकर पंचांगम यांनी सांगितल्याप्रमाणे, किडनीच्या आरोग्यावर आहाराचा किती मोठा परिणाम होतो आणि आपण नकळत कोणत्या आहारविषयक सवयी लावतो याचा परिणाम आपल्या किडनीवर होतो.

दररोजचे कोणते पदार्थ वारंवार खाल्ल्यास किडनीच्या आरोग्यासाठी सर्वात हानिकारक आहेत?

तज्ज्ञ सांगतात की, सर्वात मोठे गुन्हेगार हे विदेशी पदार्थ नसून सामान्य, रोजचे पदार्थ आहेत जे अतिप्रमाणात सेवन केले जातात. गेल्या काही वर्षांत, खाण्यापिण्याच्या अयोग्य सवयींमुळे हाय ब्लड प्रेशर आणि डायबिटीज या समस्या निर्माण झाल्या आहेत आणि हीच किडनी निकामी होण्याची मुख्य कारणे आहेत.

काही सर्वात हानिकारक पदार्थांमध्ये पॅकेज्ड स्नॅक्स, इन्स्टंट नूडल्स, प्रक्रिया केलेले मांस (सॉसेज, सलामी) आणि तयार (ready-to-eat) पदार्थ यांसारख्या खूप जास्त प्रक्रिया केलेल्या अन्नाचा समावेश होतो, ज्यात मीठ आणि प्रिझर्व्हेटिव्ह्ज जास्त असतात. साखरयुक्त पेये, जसे की सोडा आणि एनर्जी ड्रिंक्स ही देखील चिंतेची बाब आहे. जास्त साखरेचे सेवन लठ्ठपणा, मधुमेह आणि उच्च रक्तदाबाच्या वाढत्या जोखमीशी संबंधित आहे. कृत्रिम स्वीटनर्स आणि हाय फ्रुक्टोज कॉर्न सिरप (HFCS)मुळे डिहायड्रेशन होऊन आणि युरिक ॲसिडची निर्मिती वाढून किडनीचे नुकसान होऊ शकते. जास्त प्रमाणात तळलेले पदार्थ आणि रिफाइंड कार्बोहायड्रेट्स खाल्ल्याने मेटाबॉलिक समस्या निर्माण होऊन किडनीला इजा होऊ शकते.

जास्त मीठ किंवा सोडियम सेवनाचा कालांतराने किडनीवर कसा परिणाम होतो?

तज्ज्ञ सांगतात की, किडनी शरीरातील द्रव आणि इलेक्ट्रोलाईट नियमनासाठी जबाबदार असते. शरीरात मिठाचे जास्त सेवन केल्याने उच्च रक्तदाब होतो, त्यामुळे किडनीचे नुकसान होते. अतिरिक्त सोडियममुळे शरीरात पाणी साठून राहते (fluid retention). मिठाचे सेवन कमी करणे हा किडनीची काळजी घेण्याचा सर्वात सोपा आणि प्रभावी मार्ग आहे.

हाय-प्रोटीन डाएट सर्वांसाठी सुरक्षित आहेत का, की ते किडनीवर ताण आणू शकतात?

सामान्य किडनी कार्य असलेल्या निरोगी व्यक्तींसाठी हाय-प्रोटीन डाएट मूळतः हानिकारक नसतात. हाय-प्रोटीन डाएट सर्वांसाठी नसतात. जेव्हा शरीर प्रोटीन तोडते ब्रेक करते, तेव्हा ते नायट्रोजनयुक्त कचरा बाहेर टाकते जो किडनीद्वारे फिल्टर आणि उत्सर्जित केला जाणे आवश्यक असते. ज्यांना आधीच किडनीच्या समस्या आहेत, अगदी निदान होण्यापूर्वीच्या सुरुवातीच्या टप्प्यातही, हाय-प्रोटीन डाएट किडनीच्या फिल्टरिंग सिस्टिमवर दबाव वाढवून किडनीच्या नुकसानीचा वेग वाढवू शकतो. डायबिटीज असलेले, उच्च रक्तदाब असलेले आणि ज्यांना किडनीच्या समस्यांचा कौटुंबिक इतिहास आहे त्यांनी डॉक्टरांचा सल्ला घेतल्याशिवाय हाय-प्रोटीन डाएट किंवा प्रोटीन सप्लिमेंट्स घेऊ नयेत.

अशा कोणत्या सामान्य सवयी आहेत ज्या लोक साध्या समजतात, पण त्या किडनीला हानी पोहोचवतात?

अनेक दैनंदिन सवयी आपल्या कळत नकळत किडनीवर अतिरिक्त ताण आणतात. त्यापैकी एक म्हणजे पुरेसे पाणी न पिणे आणि दीर्घकाळ सौम्य डिहायड्रेशनमध्ये राहणे. आणि मग डोकेदुखी किंवा अंगदुखी झाल्यावर पेनकिलर्स, घेण्याची सवय लागते. कालांतराने त्याचा किडनीच्या कार्यावर परिणाम होऊ शकतो. रक्तदाब आणि रक्तातील साखरेच्या पातळीचा किडनीच्या आरोग्यावर थेट परिणाम होतो, मात्र लोक अनेकदा नियमित चाचण्यांकडे दुर्लक्ष करतात. धूम्रपानामुळे किडनीकडे जाणारा रक्तप्रवाह कमी होतो आणि योग्य वैद्यकीय सल्ल्याशिवाय सप्लिमेंट्स किंवा हर्बल उपचारांनी स्वतःच औषधोपचार केल्याने कधीकधी फायद्यापेक्षा तोटाच जास्त होऊ शकतो.

निर्बंध न वाटता लोक आपली किडनी सुरक्षित ठेवण्यासाठी कोणते सोपे बदल करू शकतात?

तुमची किडनी निरोगी ठेवण्यासाठी तुम्हाला अत्यंत कडक आहाराचे पालन करण्याची गरज नाही. काही छोटे बदल आहेत जे मोठा फरक दाखवू शकतात.

  • ताजी फळे, मीठ नसलेला सुका मेवा आणि घरी बनवलेले पदार्थ खा.
  • पॅकेज्ड पदार्थांऐवजी ताजे घरगुती जेवण घ्या.
  • अन्नाला चव देण्यासाठी मिठाऐवजी औषधी वनस्पती (herbs), लिंबू, लसूण किंवा मसाल्यांचा वापर करा.
  • पाणी, शहाळे किंवा ताक प्या.
  • प्रोटीन, संपूर्ण धान्य आणि भरपूर भाज्यांसह संतुलित आहार घ्या.
  • तुमचा रक्तदाब, रक्तातील साखर आणि किडनी फंक्शन टेस्ट नियमितपणे करून घ्या.