KL Rahul Fitness Secrets : भारतीय क्रिकेट संघातील खेळाडू केएल राहुलदेखील इतर खेळाडूंप्रमाणेच फिटनेस फ्रिक आहे. खेळाडूंच्या दृष्टीने निरोगी राहणे खूप महत्त्वाचे असते. कारण- खेळण्यासाठी बराच सराव करावा लागतो. खेळावर मेहनत घ्यावी लागते. त्यामुळे केएल राहुलप्रमाणे अनेक खेळाडू त्यांच्या आहारआणि तंदुरुस्तीकडे विशेष लक्ष देतात. याबाबत बोलताना केएल राहुलने एका मुलाखतीत त्याच्या रोजच्या नाश्त्याविषयीची माहिती दिली आहे.

क्रिकेटपटू केएल राहुलने सांगितले की, मी गेल्या तीन ते चार वर्षांपासून नाश्त्यात तेच तेच पदार्थ खातो. त्याला त्याच्या दिवसाची सुरुवात प्रथिनयुक्त आहाराने करायला आवडते. त्यासाठी तो नाश्त्यात चार उकडलेली अंडी मीठ आणि काळी मिरी टाकून खातो. सोबत त्याला एक अॅव्होकॅडो, एक ग्लास प्रोटीन शेक व एक कापलेलं फळ खायला आवडतं. त्याचा हा सकाळचा नाश्ता आहे. परंतु, या प्रोटीनयुक्त आहाराने शरीरास दिवसभर कशा प्रकारे ऊर्जा मिळते हे तज्ज्ञांकडून जाणून घेऊ…

प्रोटीन शेक

फोर्टिस हॉस्पिटलच्या मुख्य आहारतज्ज्ञ रिंकी कुमारी म्हणाल्या की, प्रोटीन पावडर विविध स्वरूपात येतात, ज्यामध्ये व्हे, सोया व केसीन प्रोटीन असते. त्यात सर्वांत जास्त वापरला जाणारा घटक म्हणजे व्हे. कारण- ते पाण्यात विरघळणारे मिल्क प्रोटीन आहे, ज्यामध्ये प्रोटीन अधिक असते आणि फॅटचे प्रमाण कमी असते. त्याशिवाय ते एक संपूर्ण प्रोटीन आहे म्हणजेच त्यात शरीराच्या आवश्यक गरजा पूर्ण करण्यासाठी आवश्यक असलेली सर्व नऊ अमिनो आम्ले असतात.

या पदार्थांच्या सेवनाने स्नायूंच्या उतींचे संरक्षण करणे, स्नायूंना बळकटी देणे व शरीरातील फॅटचे प्रमाण कमी करणे यांसाठी मदत मिळते. त्याशिवाय अॅनाबॉलिक हार्मोन्सची पातळीदेखील नियंत्रणात राहते. इतर पोषक घटकांच्या तुलनेत चयापचय क्रिया सुधारते आणि हृदय व रक्तवाहिन्यासंबंधात उद्भवणारा संभाव्य धोका कमी होतो.

अ‍ॅव्होकॅडो

हैदराबाद येथील यशोदा हॉस्पिटल्सचे वरिष्ठ सल्लागार व मधुमेहतज्ज्ञ डॉ. सोमनाथ गुप्ता म्हणाले की, अ‍ॅव्होकॅडोमध्ये मोनोअनसॅच्युरेटेड फॅट्स भरपूर प्रमाणात असतात, जे हृदयासाठी निरोगी फॅट्स मानले जातात. या फॅट्समुळे वाईट कोलेस्ट्रॉलची पातळी कमी करण्यास आणि चांगल्या कोलेस्ट्रॉलची पातळी वाढवण्यास मदत होते. तसेच हृदय व रक्तवाहिन्यासंबंधीचे आरोग्य सुधारण्यास साह्य मिळते. अ‍ॅव्होकॅडोचे सतत सेवन केल्याने लिपिड प्रोफाइलवर सकारात्मक परिणाम होऊ शकतो, ज्यामुळे निरोगी हृदय व रक्तवाहिन्यासंबंधीच्या यंत्रणेला चालना मिळते.

फळे

कुमारी म्हणाल्या की, फळे कोणत्याही संतुलित आहारातील प्रमुख घटकांपैकी एक आहेत. कारण- त्यात फायबर, जीवनसत्त्वे, खनिजे व अँटिऑक्सिडंट्स भरपूर असतात. फळांमध्ये आरोग्यास फायदेशीर असे अनेक घटक असतात, ज्यांच्या सेवनाने काही प्रमाणात कर्करोगापासून संरक्षण, रक्तदाब नियंत्रण, कोलेस्ट्रॉल कमी करणे, शरीराचे वजन नियंत्रणात ठेवणे यांसाठी मदत होते.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

अंडी

कोकिलाबेन धीरूभाई अंबानी रुग्णालयाच्या मुख्य आहारतज्ज्ञ प्रतीक्षा कदम म्हणाल्या की, अंड्यांमध्ये स्नायूंच्या दुरुस्ती व बळकटीसाठी आवश्यक असलेली सर्व नऊ आवश्यक अमिनो आम्ले असतात. व्हिटॅमिन बी १२, मेंदूची शक्ती वाढवणारे कोलीन व डोळ्यांसाठी फायदेशीर असलेले ल्युटीन यांचा अंडी हा उत्तम स्रोत आहे. अंडी खाल्ल्यानंतर पोट भरल्यासारखे वाटते. त्यामुळे वारंवार भूक लागत नाही. एकंदरीत अंडी हृदयाचे आरोग्य राखण्यास आणि वजन कमी करण्यासदेखील उपयुक्त आहेत.