scorecardresearch

Health Special: पित्ताशयातील खडे

आपल्या देशातील १३२ कोटी लोकसंख्येच्या १५% व्यक्तींना त्यांच्या आयुष्यात पित्ताशयामध्ये खडे होतात.

Gallstones Diagnosis, Treatment and prevention
पित्ताशयातील खडे (छायाचित्र- लोकसत्ता ग्राफिक्स टीम)

भारतातील विविध प्रदेशात खाण्याच्या पद्धती, राहणीमान व हवामान वेगळे असल्याने होणारे आजारही वेगळे असतात. याचेच उदाहरण म्हणजे पित्ताशयातील खडे. उत्तर भारतात – पंजाब दिल्ली उत्तर प्रदेश व बिहार येथे खडयाचे प्रमाण खूप जास्त आहे तर दक्षिण भारतात ते त्या मानाने कमी असते. हल्ली बऱ्याचदा असे रुग्ण येतात कि त्यांनी इतर कारणासाठी पोटाची सोनोग्राफी केली असते व त्यांच्या पित्ताशयामध्ये खडे आहेत असे आढळून येते. आपल्या देशातील १३२ कोटी लोकसंख्येच्या १५% व्यक्तींना त्यांच्या आयुष्यात पित्ताशयामध्ये खडे होतात. परंतु चांगली गोष्ट म्हणजे त्यातील फक्त २-३ टक्केच व्यक्तींना त्याचा जास्त त्रास होतो.

आहारात स्निग्ध पदार्थांचे प्रमाण (Oily food) जास्त झालं किंवा तंतूमय पदार्थांचं (fibre) प्रमाण कमी झालं तर पित्तरसाची घनता वाढते व पित्ताशयात छोटे छोटे खडे तयार होतात. हे खडे तीन प्रकारचे असतात १. कोलेस्ट्रॉल (Cholesterol) २. pigment (बिलीरुबीनचे घटक) ३. मिश्र. ७०- ८० टक्के रुग्णामध्ये ते मिश्र प्रकारचे असतात. अगदी लहान खडे पित्तनलिकेवाटे पित्तरसाबरोबर लहान आतडयात निघून जातात. पण जर त्यांचा आकार मोठा असेल तर ते पित्ताशयाच्या व पित्तनलिकेच्या अरुंद ठिकाणी अडकून राहतात व पित्ताशयाला सूज येऊन जंतूचा प्रादूर्भाव होतो.

India accounted for 20 per cent of global pre term births says Lancet study Premature baby rate increase in india
देशात प्रीमॅच्युअर बेबीजचं प्रमाण २० टक्के; लॅन्सेटच्या अहवालातून वास्तव उघड
growing aging population
वाढत्या वृद्ध लोकसंख्येसाठी एवढे तरी करावेच लागेल…
justin_trudeau_and_narendra_modi
भारत-कॅनडा यांच्यातील तणावामुळे मसूर डाळ महागणार ? जाणून घ्या…
High Blood Pressure Hypertension
बहुतांश भारतीय हायपरटेन्शनचे बळी; ‘या’ मोठ्या समस्येमुळे येतोय उपचारांमध्ये अडथळा; WHO चा धक्कादायक अहवाल

वैद्यकशास्त्रामध्ये पित्ताशयातील खडे होण्याचं प्रमाण स्थूल देहाच्या चाळिशीतील महिलांमध्ये जास्त प्रमाणात आहे असं शिकवलं जातं. पुरुषांपेक्षा स्त्रियांमध्ये याचं प्रमाण सहापटींनी जास्त असते. पाश्चात्य देशात व उत्तर भारतामध्ये याचे प्रमाण जास्त आहे. त्यांचा आहार, स्थूल शरीर, जाडेपणा, अतिस्थूलपणा, अति तूपकट, तेलकट खाणं, आहारात तंतूमय पदार्थ न घेणं , बैठी काम करणं, व्यायामाचा अभाव, वरचेवर फास्ट फूड किंवा जंक फूड असणे, या सर्व गोष्टी पित्ताशयात खडे तयार होण्यासाठी मदत करतात. त्यामुळे गेल्या दोन तीन दशकात भारतातही या आजाराचे प्रमाण वाढत आहे. हल्ली खडे सर्व वयाच्या पुरुषांमध्ये , स्त्रियांमध्ये व लहान मुलामध्ये सुद्धा आढळू लागले आहेत.

हेही वाचा… Health Special: दोन मणक्यांमधील गादी नेमकं काम करते तरी काय?

सुरुवातीची लक्षणे असिडीटीच्या त्रासासारखीच असतात. सुरुवातीला पोटाच्या वरच्या भागात थोडेसे उजवीकडे दुखायला लागते. गॅसेस होतात. मळमळ सुटते, जळजळ होऊ लागते, त्याबरोबरच एखादा खडा पित्तनलिकेत अडकून राहिला तर पित्तरस आतडयात नेणारा मार्ग अरुंद होतो व पित्तरस यकृतात (लिव्हर) मध्ये साचू लागतो त्यातील बिलीरुबीन हे रंगद्रव्य रक्तात मिसळतात व काविळीची लक्षण दिसू लागतात. याला अवरोधक काविळ (Obstructive Jaundice) असं म्हणतात. पित्तखडयांमुळे होणाऱ्या काविळीबरोबर अंगाला खाज सुटते. पित्ताशयातील खडयांमुळे स्वादुपिंडदाहही होऊ शकतो.

पित्ताशयातील खडयाचे निदान

सोनोग्राफी, काही विशिष्ट रक्त तपासणी व एन्डोस्कोपी करुन पित्ताशयातील दोष, अडकलेले खडे, पित्तनलिकेचा आजार इ. गोष्टीविषयी पूर्ण माहिती मिळू शकते.

उपाय

जर एखाद्यास पित्ताशायाच्या खड्यामुळे त्रास होत असेल आणि कावीळ नसेल तर शस्त्रक्रिया करुन हे खराब झालेले पित्ताशय व खडे काढून टाकता येते, ही शस्त्रक्रिया पोटाची चिरफाड न करता दुर्बिणीद्वारे(Laparoscopy) केली जाते. त्यामुळे रुग्ण दुसऱ्या दिवशी घरी जाऊ शकतो व पोटावर टाके, जखमेत व्रण राहत नाही. ही शस्त्रक्रिया सोपी, सुलभ असते. यानंतर त्या व्यक्तीला त्रास होत नाही. कारण पचनास लागणारा पित्तरस सरळ लहान आतडयात नियमित प्रमाणात येत राहतो.

जर एखाद्यास पित्ताशायाच्या खड्यामुळे कावीळ असेल तर दुर्बिणीद्वारे पित्तनलिकेतील खडे काढले जातात व एक प्लास्टिकची नळी (stent) पित्तनलिकेत टाकून कावीळ कमी होते. पुन्हा होऊ नये म्हणून दुर्बिणीद्वारे पित्ताशय काढणे उचित. काही रुग्णांना शस्त्रक्रियेची गरज लागते ज्यामध्ये पित्तनलिका ही लहान आतडयास जोडली जाते.

खडे होण्याचे टाळण्यासाठी काय करावं ?

जेवणातील तेल तूपाचे प्रमाण (स्वयंपाकातील) योग्य प्रमाणात असावे म्हणजे फोडणीसाठी माफक तेल, भातावर थोडे साजूक तूप (हे लोणी काढून घरी बनवलेलं तूपच असावं ) इतकं चालेल. पनीर, खोबरं व शेंगदाण्याचाही वापर माफक प्रमाणात करावा.

तळलेले पदार्थ, फास्ट फूड वरचेवर खाऊ नये.

जेवणात रोज कोशिंबीर वा सॅलड खावे.

चिकू , सफरचंद, पपई, संत्री, मोसंबी, केळं अशी फळे आवर्जून खावीत.

रोज नियमित व्यायाम करावा. एक तास रोज चालायला जावं.

पित्ताशयातील खडे विरघळण्याची काही औषधे उपलब्ध आहेत खरी पण ती बरीच वर्षे घ्यायला लागतात. बरीच खर्चिक असतात व खडे विरघळण्याचे प्रमाण अनिश्चित असते. दुसरा धोका म्हणजे या अवधीत एखादा खडा अडकून काही दुष्परिणाम होणार नाहीत असे सांगता येत नाही.

त्रास न होणारे खडे (Silent or asymptomatic stones)

पित्ताशयातील खडे असणाऱ्या ७० – ८० टक्के रुग्णांना त्याचा काही त्रास होत नाही. त्यातले काही सोनोग्राफीमध्ये दिसतात. अश्या खड्यांना सायलेंट खडे म्हणतात. जर खड्यांचा काही त्रास नसेल, ते लहान असतील व पित्ताशय जाड झाले नसेल तर असे खडे काढणे आवश्यक नसते. केवळ सोनोग्राफीमध्ये खडे आहेत म्हणून ते काढावेत हे गरजेचे नाही. त्यावर फक्त लक्ष ठेवावे व डॉक्टरांच्या सल्ल्यानेच उपचार करावे. सोनोग्राफीच्या रिपोर्टने घाबरून न जाता जर खड्यामुळे त्रास होत असेल तरच त्यावर शस्त्रक्रियेची गरज असते.

Latest Comment
View All Comments
Post Comment

मराठीतील सर्व हेल्थ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Know about gallstones diagnosis treatment and prevention hldc dvr

First published on: 20-11-2023 at 17:14 IST

संबंधित बातम्या

मराठी कथा ×