Stomach Cancer Symptoms And Treatment : पोटाचा कर्करोग (Stomach Cancer) त्याच्या सुरुवातीच्या टप्प्यात सहसा ठळकपणे दिसून येत नाही. त्यामुळे अनेकदा त्याच्या लक्षणांकडे दुर्लक्ष होते; तर काही वेळा आपण ती पचनासंबंधित सामान्य समस्या असल्याचे समजतो. अनेकदा इथेच चूक होते आणि पोटाच्या कर्करोगाचा सामना करावा लागतो. अशा परिस्थितीत, पोटाच्या कर्करोगाची पहिली लक्षणे कोणती? ती कशी ओळखायची? यावर ठाण्यातील ‘केआयएमएस’ (KIMS) हॉस्पिटलच्या ‘जीआय आणि एचपीबी ऑन्कोसर्जरी’ सल्लागार डॉ. सानिया पांड्रोवाला यांनी दी इंडियन एक्स्प्रेसशी बोलताना सविस्तर माहिती दिली आहे.

डॉ. सानिया पांड्रोवाला सांगतात की, पोटाच्या कर्करोगाची सुरुवातीची लक्षणे अत्यंत सौम्य असतात आणि ती नजरेतून सहजपणे सुटू शकतात. अनेक रुग्ण सतत होणारे अपचन, थोडे जेवण केल्यानंतरही जाणवणारा जडपणा किंवा विनाकारण जाणवणारा पोटफुगीचा त्रास यांकडे दुर्लक्ष करतात. पण, या आपण सामान्य समजत असलेल्या समस्या उपचारांनीही बऱ्या होत नाहीत.

पोटाच्या कर्करोगाची सुरुवातीची लक्षणे कोणती?

भूक न लागणे, अचानक वजन कमी होणे ही सुरुवातीची लक्षणं असू शकतात. डॉ. पांड्रोवाला सांगतात की, काही व्यक्तींना पोटाच्या वरच्या भागात अस्वस्थता किंवा मंद वेदना जाणवू शकतात. ही लक्षणे किरकोळ वाटू शकतात; परंतु ती सतत जाणवत असतील, तर वेळीच लक्ष देण्याची गरज आहे. कारण- काही वेळा कित्येक आठवड्यानंतरही ही लक्षणं कमी होत नाहीत.

डॉ. पांड्रोवाला यांच्या मते, आजार जसजसा बळावतो, तसतशी लक्षणे अधिक स्पष्ट होऊ लागतात. यामध्ये खालील लक्षणं दिसू लागतात.

१) मळमळणे किंवा अधूनमधून उलट्या होणे.

२) अन्न गिळताना घशात अडकल्यासारखे वाटणे.

३) थकवा किंवा अशक्तपणा जाणवणे (पोटाच्या आतील थरातून नकळत होणाऱ्या रक्तस्रावामुळे ॲनिमिया किंवा रक्ताल्पता होऊ शकते).

गंभीर धोक्याची घंटा :

काही दुर्मीळ प्रकरणांमध्ये काळपट रंगाचा शौच होणे किंवा रक्ताची उलटी होणे ही अत्यंत गंभीर लक्षणे आहेत, ज्यासाठी तातडीने वैद्यकीय मदतीची गरज असते.

काळजी कधी घ्यावी?

ही लक्षणे केवळ पोटाच्या कर्करोगाचीच नसून, गॅस्ट्र्रायटिस किंवा ॲसिड रिफ्लक्स यांसारख्या समस्यांमध्येही दिसू शकतात. पण मुख्य गोष्ट म्हणजे ही लक्षणे किती काळ टिकतात आणि ती काळानुसार अधिक बिघडत जातात का? जर लक्षणे नवीन असतील, बरी होत नसतील आणि हळूहळू वाढत असतील, तर ती गांभीर्याने घेतली पाहिजेत. विशेषतः ४० वर्षांवरील व्यक्ती किंवा ज्यांना धूम्रपानाचे व्यसन आहे, दीर्घकाळ ‘हेलिकोबॅक्टर पायलोरी’ (H. pylori) संसर्ग आहे किंवा ज्यांच्या कुटुंबात कर्करोगाचा इतिहास आहे, अशा लोकांनी अधिक सावध राहावे, असे डॉ. पांड्रोवाला यांनी स्पष्ट केले.

निदानाचे महत्त्व

लवकर निदान झाल्यामुळे उपचारांचे निकाल अधिक चांगले मिळतात. जर पचनाच्या समस्या उपचारांनंतरही काही आठवड्यांपेक्षा जास्त काळ टिकत असतील, तर वेळीच एंडोस्कोपीसारखी तपासणी करून घेणे कोणत्याही गंभीर समस्येचे निवारण करण्यासाठी फायदेशीर ठरते.

थोडक्यात सांगायचे तर, केवळ एखाद्या लक्षणाकडे न पाहता, शरीराच्या एकूण सवयींमध्ये किंवा पॅटर्नमध्ये होणाऱ्या बदलांकडे लक्ष द्या. पचनक्रियेत सातत्याने जाणवणारे सूक्ष्म बदल हेच सूचित करतात की, तुम्ही शरीराकडे अधिक लक्ष देण्याची गरज आहे.

(टीप- कोणतेही उपाय, उपचार करण्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला घ्या.)