scorecardresearch

लग्नसमारंभ, पार्टीतील डीजेचा मोठा आवाज ठरतोय जीवघेणा, रिसर्चमधून धक्कादायक खुलासा

लग्नसमारंभ, पार्टीत तुम्हाला डीजेच्या मोठ्या गाण्यांवर नाचायला आवडत असेल तर ही बातमी वाचाच…

loud music at weddings increases risk of heart attack study reveals the link
लग्नसमारंभ, पार्टीत डीजेवर नाचायला आवडते का? (फोटो संग्रहित)

ध्वनी प्रदूषणाचा मानवी आरोग्यावर विपरीत परिणाम होत असल्याचे आपण अनेकदा ऐकलं असेल. पण ध्वनी प्रदुषणामुळे आता मृत्यू झाल्याच्या अनेक घटना समोर आल्या आहेत. अनेकांना लग्नसमारंभात, पार्टीत डीजेवरील मोठ्या आवाजातील गाण्यांवर नाचायला आवडते. मात्र यामुळे अनेकांना ह्रदयविकाराचा धोका वाढत असल्याचे धक्कादायक खुलासा एका रिसर्चमधून झाला आहे.

बिहारच्या सीतामढीमध्ये ४ मार्च रोजी २२ वर्षीय सुरेंद्र कुमार यांचा लग्नसमारंभात वधूच्या गळ्यात वरमाळ घालताना ह्रदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला. लग्नसमारंभातील डीजेच्या मोठ्या आवाजामुळे अस्वस्थ वाटल्याने तो स्टेजवरून कोसळल्याचा दावा त्याच्या कुटुंबियांनी केला आहे.

याचप्रकारे तेलंगणामध्ये आपल्या नातेवाईकाच्या लग्नात नाचताना एका १९ वर्षीय व्यक्तीचा खाली कोसळून मृत्यू झाला. तर दुसरीकडे गेल्या वर्षी २५ नोव्हेंबर रोजी वाराणसीच्या पिपलानी कटरा येथे लग्नासमारंभात नाचत असताना एका व्यक्तीचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला. गेल्या काही महिन्यांपासून भारतात अशाप्रकारे अनेक घटना घडल्या ज्यात डीजेचा मोठा आवाज सहन न झाल्याने कोसळून मृत्यूच्या घटना घडल्या.

दरम्यान नोव्हेंबर 2019 मध्ये युरोपियन हार्ट जर्नलमध्ये एक अभ्यास प्रकाशित करण्यात आला होता, ज्यात कोणत्याही प्रकारचे संगीत, मग ते मोठ्याने असो किंवा सॉफ्ट, एखाद्या व्यक्तीला शारीरिकदृष्ट्या कमजोर बनवू शकते.

संशोधकांनी ५०० निरोगी व्यक्तींवर हा अभ्यास केला, यातील बहुतांश व्यक्ती गजबजलेल्या बाजार परिसरात काम करणारे आणि सतत मोठ्या आवाजाच्या संपर्कात असतात. पाच वर्षे केलेल्या या अभ्यासात दिसून आले की, ह्रदयविकाराची कोणतीही लक्षणे नसलेल्या व्यक्तींना ह्रदय आणि रक्तवाहिन्यांसंबंधीत रोगांचा सामना करावा लागला.

हृदय व रक्तवाहिन्यासंबंधी जोखीम (वायू प्रदूषणासह) मध्ये योगदान देणाऱ्या इतर घटकांचे समायोजन केल्यानंतर आढळले की, सरासरी 24 तासात आवाजाच्या पातळीतील प्रत्येकी 5 डेसिबलची वाढ ही ह्रदयविकाराचा झटका, स्ट्रोक आणि ह्रदयासंबंधीत इतर गंभीर आजारांचा धोका 34 टक्क्यांनी वाढवतोय. याचा परिणाम अ‍ॅमिग्डाला (मेंदूतील राखाडी पदार्थ) वर देखील होतो जो निर्णय घेण्यात महत्त्वाची भूमिका बजावतो. तीव्र आवाजामुळे मेंदूतील हा भाग आकुंचन पावतो. यामुळे आक्रमकता आणि मूड बदलणे यासारख्या समस्या निर्माण होतात.

जर्मनीतील मेंझ युनिव्हर्सिटी मेडिकल सेंटरमध्ये ३५ ते ७४ वर्षे वयोगटातील सुमारे १५,००० लोकांवर असाच अभ्यास करण्यात आला. संगीत असो वा मोठा आवाज, ठराविक मर्यादेनंतर वाढल्यास त्याचा मानवी हृदयावर घातक परिणाम होऊ शकतो, असे अभ्यासातून समोर आले आहे. जेव्हा एखादी व्यक्ती मोठ्या आवाजात संगीताच्या संपर्कात येते तेव्हा त्यांच्या हृदयाचे ठोके वेगाने वाढतात, जसे जॉगिंग करताना किंवा शारीरिक व्यायाम करताना वाढतात.

अनियमित हृदयाच्या ठोक्याला अॅट्रियल फायब्रिलेशन (AFib) म्हणतात आणि त्यामुळे हृदयविकाराचा झटका, मेंदूचा झटका आणि रक्ताच्या गुठळ्या होण्याचा धोका वाढतो. संशोधकांचे मत आहे की, रक्तदाब वाढवणारी कोणतीही क्रिया फायब्रिलेशनला चालना देऊ शकते, मोठ्या आवाजातही असेच घडते. यामध्ये हृदयाच्या वरच्या दोन चेंबर्समध्ये रक्त योग्य प्रकारे पोहोचत नाही, ज्यामुळे खालच्या चेंबर्समधील रक्तप्रवाह देखील विस्कळीत होतो आणि यामुळे हृदयविकाराचा धोका वाढतो.

खूप मोठ्या आवाजाच्या संपर्कात आल्याने कानातील संवेदी पेशी आणि संरचना कमकूवत होतात. असे जास्त काळ सुरु राहिल्यास कानावर त्याचा विपरित परिणाम होऊ शकतो. परिणामी श्रवणशक्ती कमी होते. बहुतेक अभ्यासांच्या निष्कर्षांवरून असे दिसून आले आहे की, 60 डेसिबलपर्यंतचा आवाज मानवी कानासाठी सामान्य आहे. पण सतत हेडफोन्सचा वापर, बार, क्लब आणि लग्नसमारंभात मोठ्या आवाजातील गाण्यांमुळे कानावर आणि मेंदूवर परिणाम होत आहे.

15 मिनिटांपेक्षा जास्त काळ 100 डेसिबल किंवा त्याहून अधिक वेगाने संगीत ऐकणे टाळले पाहिजे कारण त्यामुळे श्रवण क्षमतेवर वाईट परिणाम होतो. 50-70 डेसिबलपेक्षा जास्त आवाज हा हानिकारक मानला जातो ज्यामुळे व्यक्तीच्या हृदय आणि मेंदूवर परिणाम होतो.

जागतिक आरोग्य संघटनेच्या माहितीनुसार (WHO), प्रत्येक दोन तरुणांपैकी एका तरुणास दीर्घकाळापर्यंत मोठ्या आवाजातील संगीत आणि इतर मनोरंजनात्मक आवाजामुळे कमी ऐकू येण्याचा धोका असतो.

यावर जागतिक आरोग्य संघटनेने म्हटले होते की, 12 ते 35 वयोगटातील लोक जे म्युझिक क्लब किंवा म्युझिक कार्यक्रमासाठी जातात त्यांना ऐकण्याच्या समस्यांना तोंड द्यावे लागते. यापैकी सुमारे 40 टक्के किशोरवयीन तरुण मोठ्या आवाजात म्युझिक ऐकत असल्याने त्यांच्या आरोग्यावर वाईट परिणाम होतो.

फोर्टिस हॉस्पिटलचे अध्यक्ष आणि हृदयरोगतज्ज्ञ डॉ. अजय कौल म्हणाले की, एकीकडे, संगीत एक थेरपी म्हणून काम करते पण दुसरीकडे जास्त मोठ्या आवाज किंवा संगीताचा आपल्या आरोग्यावर विपरीत प्रभाव पडतो. तर दुसरीकडे झोप आणि इतर मानसिक समस्यांवर उपचार करण्यासाठी आरोग्यासाठी सुख अशा ध्वनीचा वापर केला जातो. ६० डेसिबलच्या वर मोठ्या आवाजात संगीत शरीरासाठी खूप हानिकारक ठरू शकते. त्यामुळे हृदयाचे ठोके कमी होतात किंवा हृदयाचे ठोके अनियमित होतात. परिणामी हृदयासंबंधीत आजार वाढतात.

मराठीतील सर्व हेल्थ ( Health-tips ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 07-03-2023 at 12:06 IST