पुणेः रोजच्या जेवणाची चव खुलविण्यासाठी मिठाचा वापर अपरिहार्य मानला जातो. मात्र, चवीसाठी शरीरात जाणारे अतिरिक्त सोडियम उच्च रक्तदाब आणि हायपरटेन्शनचा धोका वाढविते. त्यामुळे केवळ मिठाचे प्रमाण कमी करण्याऐवजी पोटॅशियमयुक्त कमी-सोडियम मिठाचे सेवन करण्याचा पर्याय पुढे आला आहे. ‘सोडियमचे सेवन कमी करताना पोटॅशियमचे प्रमाण वाढवून रक्तदाब नियंत्रणास मदत होऊ शकते,’ असे भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेने नुकत्याच केलेल्या संशोधनातून पुढे आले आहे. मात्र, आहारात बदल करताना डॉक्टरांचा सल्ला घ्यावा, असे आरोग्यतज्ज्ञांनी म्हटले आहे.
‘लेट्स फिक्स अवर फूड’च्या ‘आयसीएमआर’च्या अहवालात ही बाब अधोरेखित करण्यात आली आहे. अहवालात दिलेल्या माहितीनुसार, भारतात सरासरी ४,४५५.६६ मिलिग्रॅम सोडियमचे सेवन दररोज होते. जागतिक आरोग्य संघटनेच्या दिवसाला दोन हजार मिलिग्रॅमपेक्षा कमी सोडियम सेवनाच्या शिफारशीच्या दुपटीहून अधिक आहे. उलट, पोटॅशियमचे सरासरी सेवन १,४२८.३६ मिलिग्रॅम असून ते संघटनेच्या किमान ३,५०० मिलीग्रॅमच्या शिफारशीच्या निम्म्यापेक्षाही कमी आहे. जास्त सोडियम आणि कमी पोटॅशियम या दोन्हीमुळे रक्तदाब वाढण्याचा धोका वाढतो. पोटॅशियमयुक्त कमी-सोडियम मिठामध्ये साधारण ७० टक्के सोडियम क्लोराइड आणि ३० टक्के पोटॅशियम क्लोराइड असते.
मॉडेलिंग अभ्यासानुसार, भारतात पोटॅशियमयुक्त कमी-सोडियम मिठाचा राष्ट्रीय स्तरावर स्वीकार झाल्यास दर वर्षी हृदय व रक्तवाहिन्यासंबंधी आजारांमुळे होणारे मृत्यू ८ ते १४ टक्क्यांनी कमी होऊ शकतात. वर्षाला सुमारे २.४ ते ३.१५ लाख जीव वाचण्याची शक्यता आहे. भारतामध्ये सुमारे ८० टक्के आहारातील सोडियम घरगुती पातळीवर तयार होणाऱ्या अन्नातून येते. त्यामुळे घराघरांत नियमित मिठाऐवजीपोटॅशियमयुक्त कमी-सोडियम मीठ वापराला चालना देणे ही मोठी संधी ठरू शकते. मात्र, अशा मिठाची मर्यादित उपलब्धता, किंमत, कमी जनजागृती आणि स्वीकारार्हतेबाबतचे गैरसमज हे प्रमुख अडथळे आहेत.
भारतातील संशोधन काय सांगते?
ग्रामीण भारतातील सात गावांमध्ये झालेल्या ‘सॉल्ट सबस्टिट्यूट इन इंडिया स्टडी’मध्ये उच्च रक्तदाब असलेल्या ५०२ व्यक्तींचा समावेश होता. पोटॅशियमयुक्त मिठाचा पर्याय वापरणाऱ्या गटाच्या सिस्टॉलिक रक्तदाबात तीन महिन्यांत ४.६ एमएमएचजीची घट आढळली. तर, प्ल्युरस अभ्यासात कमी-सोडियम आयोडीनयुक्त मिठाबाबत जागरुकता आणि उपलब्धता कमी असल्याचे दिसले. मात्र, जनजागृती आणि अनुदानाच्या हस्तक्षेपानंतर ४९.३ टक्के कुटुंबांनी पोटॅशियमयुक्त कमी-सोडियम मिठाचा वापर केल्याचे नोंदले गेले.
तज्ञ काय सांगतात ?
आहारात मिठाचे प्रमाण त्याचे आरोग्यावर होणारे परिणाम याविषयी आहार तज्ञ डॉक्टर मालविका करार करकरे अधिक माहिती देताना सांगतात की, उच्च रक्तदाब रोखण्यासाठी केवळ मीठ कमी खाणे पुरेसे नसून, योग्य प्रकारचे मीठ निवडणेही तितकेच महत्त्वाचे आहे. ‘आयसीएमआर’ने सुचवलेले पोटॅशिअमयुक्त लो-सोडियम मीठ अनेक निरोगी प्रौढांसाठी चांगला पर्याय ठरू शकतो, मात्र, मूत्रपिंडाचे आजार असलेल्या व्यक्तींनी किंवा रक्तातील पोटॅशिअम वाढण्याचा धोका असलेल्या रुग्णांनी डॉक्टर किंवा आहारतज्ज्ञांच्या सल्ल्याशिवाय पोटॅशिअमयुक्त मिठाचा वापर करू नये. त्यामुळे कोणताही आहारातील बदल हा प्रत्येकाच्या आरोग्यस्थितीनुसार आणि तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखालीच करणे अधिक सुरक्षित व परिणामकारक ठरते.
सह्याद्री रुग्णालयातील हृदयरोग तज्ञ डॉक्टर जगजीत देशमुख यांनीही या विषयावर अधिक प्रकाश टाकला, भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेने उच्च रक्तदाब नियंत्रणासाठी सामान्य मिठाऐवजी पोटॅशिअमयुक्त लो-सोडियम मीठ वापरण्याचा सल्ला दिला आहे. हृदयाच्या आरोग्याच्या दृष्टीने हा सल्ला अनेकांसाठी फायद्याचा ठरू शकतो. असे असले, तरी पोटॅशिअमयुक्त मीठ हा सर्वांसाठी समान पर्याय नाही. विशेषतः मूत्रपिंडाचे आजार असलेले रुग्ण, रक्तातील पोटॅशिअमचे प्रमाण आधीच वाढलेले असलेले रुग्ण किंवा याच्याशी निगडित असणारी काही विशिष्ट औषधे घेणाऱ्या व्यक्तींनी डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय अशा मिठाचा वापर करू नये. अशा परिस्थितीत रक्तातील पोटॅशिअम धोकादायकरीत्या वाढू शकते, ज्याचा थेट परिणाम हृदयाच्या ठोक्यांवर होऊ शकतो.
