बॉलीवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्री माधुरी दीक्षितचे पती डॉ. श्रीराम नेने हे हृदय व छातीचे शल्यचिकित्सक आणि सार्वजनिक आरोग्याचे समर्थक आहेत. ते त्यांच्या सोशल मीडियावरून लोकांना उपयुक्त माहिती, सल्ले व उपाय सांगत असतात. अलीकडेच त्यांनी एक व्हिडीओ शेअर केला, ज्यात त्यांनी भारतातील लोकांना उन्हाळ्यातील असह्य उष्णता सहन करण्यासाठी सोपे उपाय सुचवले.
“शरीराचं तापमान नियंत्रित राखणं हे फक्त आरामासाठीच नाही, तर तुमच्या आरोग्यासाठीही खूप महत्त्वाचं आहे. शरीरातील पाणी कमी होणं, थकवा येणं व उष्माघात होणं हे खरे धोके आहेत. पण, काही साध्या सवयी अंगीकारल्यास, उन्हाळा आनंदात घालवता येतो आणि उष्णतेचा त्रास होत नाही”, असं त्यांनी इन्स्टाग्रामवर सांगितलं.
डॉ. नेने यांनी दिलेले काही उपयोगी सल्ले खालीलप्रमाणे :
सल्ला १ : पाणी भरपूर प्या
“पुरुषांनी रोज सुमारे ३.७ लिटर आणि महिलांनी २.७ लिटर पाणी प्यावं. तहान लागण्याआधीच पाणी प्या. गोड पेये आणि दारू पिणे टाळा. कारण- त्यामुळे उष्णतेची समस्या वाढते”, असं त्यांनी सांगितलं.
डॉ. बसवराज एस. कुंबर, सल्लागार – अंतर्गत वैद्यकशास्त्र, अॅस्टर व्हाइटफिल्ड हॉस्पिटल, बेंगळुरू, यांनी सांगितलं की, दिवसभरात आठ ते १० ग्लास पाणी प्यावं. नेहमी तुमच्यासोबत पाण्याची बाटली ठेवा. पाण्यात लिंबू, काकडी किंवा पुदिना घालून ते अधिक ताजं आणि चवदार बनवा. दिवसाची सुरुवात एका ग्लास पाण्याने करा; जेणेकरून शरीरातील पाण्याची कमतरता भरून येईल आणि पचनक्रिया सुरळीत सुरू होईल.
“कॉफी, एनर्जी ड्रिंक्स व सॉफ्ट ड्रिंक्स कमी प्या. त्याऐवजी नारळपाणी, हर्बल चहा किंवा लिंबूपाणी घ्या. जास्त कॅफिन आणि साखरयुक्त पेय प्यायल्यामुळे शरीरात पाण्याची कमतरता निर्माण होऊ शकते. त्यामुळे थकवा येतो, पोट फुगतं आणि त्यामुळे तुम्हाला अशक्त झाल्यासारखं वाटू शकतं”, असं त्यांनी सांगितलं.
सल्ला २ : उन्हापासून बचाव करा
डॉ. नेने यांनी सांगितलं की, सकाळी १० ते दुपारी ४ या वेळेत शक्यतो घरातच राहा. खूप थकल्यासारखं वाटल्यास थंड पाण्यानं अंघोळ करा.
सल्ला ३ : योग्य कपडे घाला
“सैल, हलक्या रंगाचे कपडे हे काळ्या आणि घट्ट कपड्यांपेक्षा चांगले. सनब्लॉक, टोपी व गॉगल्स म्हणजे उष्णतेपासून बचाव करणारी ढाल,” असं डॉ. नेने म्हणाले.
डॉ. बसवराज यांनीही याला अनुमती दिली आणि सांगितलं की, लोकांनी शक्यतो सावलीत राहावं आणि दुपारी १२ ते ४ या वेळेत थेट सूर्यप्रकाश टाळावा. त्यांनी असंही सांगितलं की, उष्णता आणि डिहायड्रेशनपासून बचावासाठी लोकांनी सुरक्षादायक कपडे घालावेत आणि सनस्क्रीन लावावं.
सल्ला ४ : कमकुवत लोकांची काळजी घ्या
डॉ. नेने यांनी सांगितलं की, लहान मुलं, वयोवृद्ध व आजारी लोकांना उष्णतेपासून दूर ठेवा: “बाळं, वृद्ध आणि ज्यांना आरोग्याच्या समस्या आहेत अशा लोकांना उष्णतेचा जास्त त्रास होतो. त्यामुळे त्यांची विशेष काळजी घ्या.”
डॉ. बसवराज यांनी अजून काही सल्ले दिले, जसे की हायड्रेशन अलार्म किंवा अॅप्स वापरणे आणि ८×८ नियम पाळणे (दररोज आठ ग्लास म्हणजे प्रत्येकी ८ औंसेंस ounces पाणी प्यायचे) जेणेकरून पाणी नियमितपणे घेतले जाईल. त्यांनी असंही सांगितलं की, दिवसभरात थोडे थोडे पाणी प्यायल्यास एकदम मोठ्या प्रमाणात पाणी पिण्यापेक्षा अधिक फायदा होतो.
“कलिंगड, काकडी, संत्री व स्ट्रॉबेरी यांसारखी पाण्याने भरलेल्या फळांचा आपल्या आहारात समावेश करा. त्याचबरोबर सूप, स्मूदी व ताज्या फळांचे रसही घ्या. हे पदार्थ फक्त शरीराला हायड्रेटच करीत नाहीत, तर शरीर थंड ठेवण्यासाठी आवश्यक ती जीवनसत्त्वे आणि खनिजेही प्रदान करतात,” असे तज्ज्ञांनी सांगितले.
नियमित पाण्याऐवजी पर्याय
“जर तुम्हाला नियमित पाण्यात थोडा वेगळेपणा हवा असेल, तर नारळपाणी वापरा; ज्यात इलेक्ट्रोलाइट्स जास्त असतात,किंवा हर्बल चहा जसे की कॅमोमाइल किंवा ग्रीन टी, ज्यात अँटीऑक्सिडंट्स असतात”, असं डॉ. बसवराज म्हणाले. फळं, पुदिना किंवा काकडी घालून तयार केलेलं स्वादिष्ट पाणी पिणं फायदेशीर असतं आणि त्यातून पोषक घटकही मिळतात. तसेच ताक आणि ताज्या फळांचे रस तुम्हाला हायड्रेटेड आणि ताजेतवाने ठेवतात, असंही त्यांनी सांगितलं.