मुंबई : कर्करोगाचे निदान झाले की सर्वप्रथम डोळ्यांसमोर उभा राहणारा शब्द म्हणजे शस्त्रक्रिया. अनेक दशकांपासून कर्करोगावरील उपचारामध्ये एकच भूमिका ठाम होती: ‘जास्तीत जास्त काढून टाका, म्हणजे धोका कमी’. मात्र आज ही भूमिका मोठ्या प्रमाणावर बदलताना दिसते आहे. कर्करोग शस्त्रक्रियेभोवतीची चर्चा आता अधिक संतुलित, वैज्ञानिक आणि रुग्णकेंद्रित झाली आहे.अत्याधुनिक तंत्रज्ञानामुळे तसेचे मिनिमल इन्व्हेसिव्ह तंत्रामुळे अचुकता साधणे शक्य झाले आहे. यातूनच रुग्णकेंद्रित निर्णयप्रक्रिया राबविणे सोपे झाले आहे.

पूर्वीच्या काळात कर्करोगावर मात करण्यासाठी व्यापक (रॅडिकल) शस्त्रक्रिया हा प्रमुख पर्याय मानला जात होता. विशेषतः स्तनाच्या कर्करोगात संपूर्ण स्तन काढून टाकणे ही सर्वसाधारण पद्धत होती. यात उद्दिष्ट एकच होते ते म्हणजे कर्करोगाची पुनरावृत्ती रोखणे. परंतु अशा आक्रमक शस्त्रक्रियांमुळे रुग्णांच्या शारीरिक आरोग्यासोबत मानसिक आणि सामाजिक आयुष्यावरही परिणाम होत असल्याची जाणीव हळूहळू वैद्यकीय क्षेत्राला झाली.

तंत्रज्ञानातील प्रगती, संशोधनातील नवे निष्कर्ष आणि कर्करोगाच्या जैविक स्वरूपाबाबत वाढलेले ज्ञान यामुळे उपचाराची दिशा बदलली. आता ‘नो मोअर, नो लेस’ म्हणजेच ‘ना जास्त, ना कमी’ या तत्त्वावर भर दिला जात आहे. ट्युमर जितका आवश्यक आहे तितकाच काढणे, आणि शक्य तितक्या अवयवांचे संरक्षण करणे, हा आधुनिक दृष्टिकोन बनल्याचे डॉक्टरांचे म्हणणे आहे.आज अनेक प्रकारच्या कर्करोगांमध्ये मिनिमल इन्व्हेसिव्ह (लहान चिरा देऊन) किंवा रोबोटिक शस्त्रक्रिया केल्या जात आहेत. यामुळे रक्तस्त्राव कमी होतो, रुग्ण लवकर बरा होतो आणि जीवनमान सुधारते. याशिवाय केमोथेरपी, रेडिएशन, टार्गेटेड थेरपी आणि इम्युनोथेरपी यांसारख्या पर्यायी उपचारांमुळे शस्त्रक्रियेचा व्यापही कमी करता येतो.

Award Banner

महत्त्वाचा बदल म्हणजे डॉक्टर आणि रुग्ण यांच्यातील संवाद. पूर्वी उपचाराचा निर्णय प्रामुख्याने डॉक्टर घेत असत. आता मात्र उपचारपद्धती, संभाव्य दुष्परिणाम, पर्याय आणि अपेक्षित परिणाम यांवर सविस्तर चर्चा केली जाते. रुग्णाच्या जीवनशैली, वय, इतर आजार आणि वैयक्तिक प्राधान्यांचा विचार करून निर्णय घेतला जातो.विशेषज्ञांच्या मते, उपचाराचा उद्देश फक्त कर्करोग नष्ट करणे नसून रुग्णाला चांगल्या गुणवत्तेचे आयुष्य देणे आहे. म्हणूनच शस्त्रक्रिया ही आता केवळ तांत्रिक प्रक्रिया नसून एक व्यापक उपचार आराखड्याचा भाग बनली आहे.कर्करोगावरील लढाई अजूनही कठीण आहे. परंतु उपचारातील हा बदल रुग्णांना अधिक आशावादी आणि सक्षम बनवत आहे. ‘जास्त म्हणजे चांगले’ या विचारापासून ‘योग्य तेवढेच पुरेसे’ या विचाराकडे झालेली ही वाटचाल वैद्यकीय क्षेत्रातील महत्त्वाचा टप्पा मानली जात आहे.

आजही देशभरातील रुग्ण मुंबईतील टाटा कॅन्सर रुग्णालयाकडे धाव घेताना दिसतात. तथापि टाटा कॅन्सर रुग्णालयातील तज्ज्ञांच्या माध्यमातून नॅशनल कॅन्सर ग्रीड निर्माण करण्यात आली. देशभरातील अनेक डॉक्टरांना योग्य प्रशिक्षण देण्यात आले. यातूनच देशभरात कॅन्सर उपचारात एकसमानता निर्माण करण्यात आली आहे. तंत्रज्ञान व औषधोपचार जसजसे प्रगत होत चालले आहे. तसे रुग्णांचे बरे होण्याचे प्रमाण वाढू लागले आहे तसेच उपचारातही एकसुत्रता व अचुकता येऊ लागल्याचे डॉक्टरांचे म्हणणे आहे.