जवळपास प्रत्येकाच्या सकाळची सुरुवात एक कप गरम चहा किंवा कॉफीने होते. आजकाल आरोग्याबाबत सतर्क असलेले लोक चहा कॉफी ऐवजी ग्रीन टी किंवा ब्लॅक कॉफी पिण्यास पसंती देतात. आजकाल माचा लाटेदेखील चर्चेत आला आहे जो आरोग्यासाठी चांगला मानला जातो. ग्रीन टी, ब्लॅक कॉफी किंवा माचा आरोग्यदायी मानले जाणारे हे पेय खरंच पोटाचे आरोग्यासाठी (gut health) चांगले आहेत का? असेल तर या तिन्ही पेयांपैकी कोणता पर्याय खरोखरच फायदेशीर आहे, असा प्रश्न अनेकांच्या मनात निर्माण होतो.

याबाबत दी इंडियन एक्स्प्रेसला माहिती देताना पुण्यातील गॅस्ट्रोएन्टेरोलॉजिस्ट डॉ. किरण शिंदे यांनी सांगितले की, “पोटाच्या आरोग्याच्या दृष्टीने ग्रीन टी आणि माचा हे ब्लॅक कॉफीपेक्षा अधिक सौम्य आणि सुरक्षित पर्याय ठरू शकतात.”

चहाचे प्रकार पोटासाठी अधिक सौम्य (Tea is gentler on the gut)

गॅस्ट्रोएन्टेरोलॉजिस्टच्या दृष्टीने पाहिले तर माचा आणि ग्रीन टी हे दोन्ही पेय पोटावर (gastrointestinal system) तुलनेने कमी ताण आणतात. या दोन्ही प्रकारांमध्ये ‘कॅटेचिन्स’ (catechins) नावाचे अँटीऑक्सिडंट्स आढळतात, जे पोटातील चांगल्या बॅक्टेरियांचे संतुलन राखण्यास मदत करतात.

कॅटेचिन्स सूज (inflammation) कमी करण्यास मदत करतात आणि पोटातील मायक्रोबायोम सुधारण्यासाठी उपयुक्त ठरू शकतात. विशेषतः माचा हा संपूर्ण चहाच्या पानांची पूड असल्यामुळे त्यात कॅटेचिन्सचे प्रमाण साध्या ग्रीन टीपेक्षा जास्त असते. त्यामुळे पोटाच्या आरोग्याच्या दृष्टीने माचा हा ग्रीन टीपेक्षा किंचित अधिक फायदेशीर मानला जातो.

कॉफीचे पचनावर होणारे परिणाम (Effects of coffee on digestion)

कॉफीमध्ये देखील अँटीऑक्सिडंट्स असतात, मात्र तिचे शरीरावर होणारे परिणाम वेगळे असतात. ब्लॅक कॉफी तुलनेने अधिक आम्लीय (acidic) असते. त्यामुळे ती पोटात अधिक प्रमाणात अॅसिड तयार होण्यास प्रवृत्त करते. यामुळे काहींना पोटात जळजळ होते, अस्वस्थता जाणवते किंवा आम्लपित्त (acidity) वाढण्याची शक्यता असते. विशेषतः ज्यांचे पोट संवेदनशील आहे किंवा ज्यांना वारंवार अॅसिडिटीचा त्रास होतो, अशा लोकांनी कॉफीचे सेवन मर्यादित ठेवणे अधिक योग्य ठरू शकते.

रिकाम्या पोटी कॉफी घेतल्यास पोटात अधिक त्रास होण्याची शक्यता असते, त्यामुळे सकाळी उठल्यावर लगेच कॉफी घेण्यापेक्षा काहीतरी खाल्ल्यानंतरच कॉफी घेणे सुरक्षित मानले जाते.

शौचाच्या सवयींवर होणारा प्रभाव (Impact on bowel movements)

अनेकांना कॉफी घेतल्यानंतर लगेच शौचास जावे लागते. याचे कारण म्हणजे कॉफी पोटातील अॅसिडचे प्रमाण वाढवते आणि मोठ्या आतड्याच्या स्नायूंना (colon muscles) सक्रिय करते. यामुळे आतड्यांची हालचाल (bowel movement) वेगाने होते. काही लोकांसाठी हा परिणाम फायदेशीर ठरू शकतो, विशेषतः ज्यांना बद्धकोष्ठतेचा त्रास आहे. मात्र काही व्यक्तींमध्ये यामुळे उलट जुलाब (loose motions) किंवा पोटदुखीचा त्रास वाढू शकतो.

याउलट, माचा आणि ग्रीन टीमध्ये कॅफिन असले तरी त्याचा परिणाम तुलनेने सौम्य असतो. त्यामुळे अचानक शौचास जाण्याची शक्यता कमी असते. या पेयांमुळे पचन प्रक्रिया अधिक स्थिर आणि सहज राहण्यास मदत होते.

अॅसिडिटी आणि पोटफुगीच्या त्रासात कोणता पर्याय योग्य? (Best choice for acidity and bloating)

ज्यांना अॅसिडिटी, गॅस्ट्रायटिस किंवा पोट फुगण्याचा त्रास वारंवार होतो, अशांसाठी ग्रीन टी किंवा माचा हा अधिक योग्य पर्याय मानला जातो.

कॉफीमुळे पोटातील अॅसिडचे प्रमाण वाढण्याबरोबरच ‘लोअर इसोफेजियल स्फिंक्टर’ (lower esophageal sphincter) सैल होऊ शकतो. लोअर इसोफेजियल स्फिंक्टर म्हणजे अन्ननलिका (esophagus) आणि पोट (stomach) यांच्या मधोमध असलेला एक वलयाकृती स्नायू (ring-shaped muscle) होय. हा स्नायू अन्न पोटात गेल्यानंतर परत वर येऊ नये यासाठी झडप (valve) सारखे काम करतो. तो सैल झाल्यास अॅसिड वरच्या दिशेने जाऊन हार्टबर्न किंवा अॅसिड रिफ्लक्सचा त्रास वाढू शकतो.

ग्रीन टी आणि माचा यामध्ये ‘एल-थियानिन’ (L-theanine) नावाचे संयुग असते. हे संयुग शरीरावर शांत करणारा (calming) परिणाम करते आणि कॅफिन हळूहळू शरीरात सोडते. त्यामुळे पोटावर अचानक ताण येत नाही आणि अॅसिडचे प्रमाण झपाट्याने वाढत नाही.

रिकाम्या पोटी सेवन करताना घ्यायची काळजी (Precautions when consuming on an empty stomach)

ग्रीन टी आणि माचा हे कॉफीपेक्षा सौम्य असले तरी त्यांचे अतिप्रमाणात सेवन टाळणे आवश्यक आहे. विशेषतः खूप स्टाँग (strong) ग्रीन टी किंवा माचा रिकाम्या पोटी घेतल्यास काही व्यक्तींमध्ये मळमळ (nausea) होण्याची शक्यता असते.

म्हणून हे पेय जेवणानंतर किंवा हलका नाश्ता केल्यानंतर घेणे अधिक योग्य ठरते. यामुळे पोटावर अनावश्यक ताण येत नाही आणि पचनक्रिया व्यवस्थित राहते.

कॅफिनचे प्रमाण आणि त्याचा परिणाम (Role of caffeine in gut irritation)

कॉफीमध्ये कॅफिनचे प्रमाण ग्रीन टी किंवा माचाच्या तुलनेत अधिक असते. याशिवाय कॉफीमध्ये काही इतर रसायनेही असतात, जी पोटातील अॅसिडचे प्रमाण वाढवू शकतात.

यामुळे काही व्यक्तींमध्ये पोटदुखी, जुलाब किंवा पोटातील अस्वस्थता वाढण्याची शक्यता असते. याउलट ग्रीन टी आणि माचा यामध्ये कॅफिन हळूहळू शरीरात शोषले जाते. त्यामुळे अचानक अॅसिड वाढण्याचा धोका कमी होतो.

पोटाच्या आरोग्यासाठी काय योग्य? (what is good for gut health)

पोटाच्या आरोग्याला प्राधान्य देत असाल, तर ग्रीन टी किंवा माचा हे ब्लॅक कॉफीपेक्षा अधिक सौम्य आणि संतुलित पर्याय ठरू शकतात. विशेषतः ज्यांना अॅसिडिटी, पोटदुखी किंवा संवेदनशील पचनाचा त्रास असतो, अशांसाठी हे पेय अधिक योग्य ठरतात.

तथापि, याचा अर्थ कॉफी पूर्णपणे टाळावी असा नाही. योग्य प्रमाणात आणि योग्य वेळेत(विशेषतः रिकाम्या पोटी न घेता) कॉफी घेतल्यास तिचे नकारात्मक परिणाम कमी करता येऊ शकतात.

एकूणच, प्रत्येक व्यक्तीची पचनसंस्था वेगळी असते. त्यामुळे कोणते पेय आपल्याला अधिक योग्य ठरते हे स्वतःच्या अनुभवावर आणि वैद्यकीय सल्ल्यावर अवलंबून असते. योग्य प्रमाण, योग्य वेळ आणि संतुलित आहार या गोष्टी पोटाच्या आरोग्यासाठी तितक्याच महत्त्वाच्या ठरतात.