मुंबई : घरगुती आरोग्यसेवा आता पर्याय राहिलेली नाही ती अपरिहार्य वास्तव बनली आहे. तरीही बहुतांश लोक अजूनही जुन्याच भ्रमात अडकलेले आहेत तो म्हणजे ‘मेडिकल इन्शुरन्स आहे ना, सगळ कव्हर होईल’ हीच सर्वात मोठी चूक आहे. कारण सत्य खूप कठोर आहे. तुमचा विमा तुम्हाला अर्ध्यावर सोडतो आणि उरलेला आर्थिक भार तुमच्या खिशावर कोसळतो.

भारतात आजघडीला आजार हा फक्त आरोग्याचा प्रश्न नाही तर तो थेट आर्थिक संकटातही रूपांतरित होतो. अनेक रुग्णांच्या बाबतीत हॉस्पिटलमधून डिस्चार्ज मिळाल्यावर खरा खर्च सुरू होतो. अनेकदा २४ तास नर्स लागते, केअरगिव्हर, फिजिओथेरपी, औषधे, फॉलोअप. आणि यापैकी बहुतांश गोष्टी विमा कव्हर करत नाही. म्हणजेच तुम्ही प्रीमियम भरत राहता पण गरजेच्या वेळी तुमच्याच पैशांवर तुम्हाला उपचार करावे लागतात.

एका ज्येष्ठ नागरिकाचा विचार करा.अपघातानंतर शस्त्रक्रिया झाली, विम्या मधून हॉस्पिटलचा खर्च भरला. पण घरी परतल्यानंतर दोन महिने २४ तास परिचारिका सेवा लागली. त्याचा येणारा खर्च कोण करणार हा एक प्रश्न आहे. दुसऱ्या एका तरुणाला लिगामेंट इजा झाली. त्याला शस्त्रक्रियेनंतर घरी फिजिओथेरपी आणि नर्सिंग. काही महिन्यांतच खर्च लाखाच्या पुढचा होता. अशी अनेक उदाहरणे देता येतील.खरी भीती इथेच आहे. विमा कंपन्या अजूनही ‘हॉस्पिटलायझेशन’ या जुनाट चौकटीत अडकलेल्या असून रुग्णालयातून घरी आल्यानंतर येणाऱ्या खर्चाचा भार कोण घेणार हा खरा प्रश्न आहे. तुम्ही घरी उपचार घेत असाल तर सिस्टम तुम्हाला ‘कव्हरेजच्या बाहेर’ ढकलते. म्हणजेच तुम्ही आजारी असताना फक्त शरीरच नाही, तर तुमची आर्थिक स्थितीही कोलमडते.

Award Banner

खर्चाचे वास्तव आणखी धक्कादायक आहे. २४ तास लागणाऱ्या प्रशिक्षित नर्ससाठी महिन्याला ४५ हजार ते १ लाख रुपये खर्च येतो. केअरगिव्हरसाठी २५ ते ४० हजार रुपये. फिजिओथेरपीसाठी किमान दरमहा १० ते २० हजार. अनेकदा हे सर्व काही महिन्यांसाठी नव्हे तर अनेकदा वर्षभर चालू शकते. मध्यमवर्गीय कुटुंबासाठी हा सरळ आर्थिक आपत्तीचा फॉर्म्युला आहे.सर्वात मोठी होणारी चूक म्हणजे लोक ‘नंतर बघू’ या मानसिकतेत राहतात. पण आरोग्य खर्चात ‘नंतर’ नावाचा पर्याय नसतो. एक अपघात, एक स्ट्रोक, एक गंभीर आजार तुमची सगळी बचत काही महिन्यांत संपवते. विमा असूनही.

म्हणूनच आता वेळ आली आहे वास्तव स्वीकारण्याची. जर तुमच्या इन्शुरन्स प्लॅनमध्ये होम हेल्थकेअर कव्हर नाही तर तो प्लॅन अपूर्ण आहे. सरळ भाषेत सांगायचं तर तो तुम्हाला पूर्ण संरक्षण देत नाही. काही कंपन्या आता होम केअर कव्हर देऊ लागल्या आहेत पण त्या सुद्धा मर्यादित आणि अटींनी भरलेल्या आहेत. म्हणजेच, फक्त पॉलिसी घेऊन काम भागत नाही तर तुम्हाला ती खोलात जाऊन समजून घ्यावी लागते.

यामुळे ज्यांना शक्य असले त्यांनी स्वतंत्र ‘हेल्थकेअर फंड’ तयार करणे गरजेचे आहे. दर महिन्याला ठराविक रक्कम बाजूला ठेवली नाही तर भविष्यातील खर्च तुम्हाला गाठणारच. महागाई १० ते १२ टक्के दराने वाढत असताना आजचा १ लाखाचा खर्च लाख उद्या दोन तीन लाख होऊ शकतो. आणि तेव्हा तुम्ही तयार नसाल तर त्याची किंमत खूप मोठी तुम्हालाच चुकवावी लागणार आहे.आजारपण टाळता येत नाही पण आर्थिक विनाश टाळता येतो हे वस्तव लक्षात घेऊन जर तुम्ही आजच योग्य निर्णय घेतला तर घरगुती आरोग्यसेवा ही लक्झरी नाही. ती भविष्यातील अनिवार्य गरज असून जोपर्यंत तुम्ही ती तुमच्या विमा आणि आर्थिक नियोजनाचा भाग करत नाही, तोपर्यंत तुम्ही धोक्यात आहात.आता प्रश्न एकच आहे की तुम्ही अजूनही ‘माझं इन्शुरन्स पुरेसं आहे’ या भ्रमात राहणार आहात की वास्तव स्वीकारून स्वतःला आणि आपल्या कुटुंबाला खऱ्या अर्थाने सुरक्षित करणार आहात?