मुक्ता चैतन्य- समाज माध्यम अभ्यासक मी नववीत होते तेव्हा पहिल्यांदा मारिओ नावाचा गेम माझ्या आयुष्यात आला. तेव्हा मोबाईल नव्हते. पण टीव्हीला गेमचं गॅजेट जोडण्याची सोय आलेली होती. आम्ही मोठ्या सुट्ट्या म्हणजे दिवाळी, नाताळ आणि उन्हाळ्याची सुट्टी लागली की, मारिओ गेम भाड्याने आणत असू. टीव्हीला जोडून तासन् तास खेळतही असू. त्याहीवेळी अनेकदा असं वाटून जायचं की अभ्यासही असाच एखाद्या गेमसारखा किंवा सीरिअलसारखा शिकता आला तर कित्ती मज्जा येईल? तोवर यूट्यूब आलेलं नव्हतं आणि इंटरनेटसारखा काही प्रकार पुढच्याच काही वर्षात आपल्या आयुष्यात येऊन, आपल्या हातात चोवीस तास-बारा महिने एक गॅजेट असणार आहे याचीही कल्पना नव्हती. यूट्यूब हा आज लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांच्या आवडीचा प्लॅटफॉर्म झाला आहे. जेष्ठ नागरिकांशी गप्पा मारताना लक्षात येतं, त्यांच्या आयुष्यात टीव्ही इतकीच जागा यूट्यूबची आहे. वेगवेगळ्या प्रकारच्या शॉर्ट फिल्म्सपासून ते फूडपर्यंत आणि योगपासून ते प्रेरणादायी कथांपर्यंत अनेक गोष्टी पाहण्यासाठी ते यूट्यूबचा वापर करतात आणि मुलांच्याबाबतीत बोलायचं तर ते चाला- बोलायला लागण्याआधी यूट्यूब त्यांच्या आयुष्यात येतं. आधी बडबड गीतं, बालगीतांसाठी आणि मुलं जसजशी मोठी व्हायला लागतात तसं निरनिराळ्या कारणांसाठी त्यांचा यूट्यूब वावर प्रचंड वाढायला लागतो. हेही वाचा. Health Special: पहिल्या पावसाचे पाणी अंगावर घ्यावे का? आपण नेहमी हे गृहीत धरलेलं असतं की, लिखित स्वरूपात जे साहित्य उपलब्ध असतं त्यातूनच फक्त शिक्षण योग्य आणि चांगल्या प्रकारे होऊ शकतं. उदा. पुस्तकं वाचली तरच ज्ञानप्राप्ती होते. शालेय पुस्तकंच शिक्षणाचं सर्वोत्तम माध्यम आहे, एक ना अनेक. पण पुस्तकं वाचली तरच ज्ञानप्राप्ती होते ही संकल्पना डिजिटायझेशननंतर झपाट्याने बदलत गेली. आपण असं म्हणू शकतो पुस्तकं हा ज्ञानप्राप्तीच्या, माहिती मिळवण्याच्या अनेक माध्यमांपैकी एक माध्यम आहे. फक्त एक माध्यम. तेच फक्त एकमेव माध्यम आहे, असं मात्र आपल्याला आता म्हणता येणार नाही. आपल्या धारणा लिखित साहित्याशी जास्त जोडलेल्या आहेत आणि तेच आपल्याला सर्वोत्तम वाटतं. कारण आजवरच्या सगळ्याच पिढ्या फक्त या एकाच माध्यमाबरोबर शिक्षित होत आल्या आहेत. किंवा माहिती आणि ज्ञान मिळवण्याचा तेवढा एकच मार्ग आजवरच्या मानवांना उपलब्ध होता. हेही वाचा. Health Special: आषाढी एकादशी आणि उपवास- आहार कसा असावा? टीव्ही, सिनेमे आणि रेडिओ आपल्याकडे येऊन अनेक दशकं उलटून गेलेली असली तरी त्याचा वापर प्रामुख्याने फक्त मनोरंजनासाठी केला गेला. मी शाळेत आणि कॉलेजमध्ये असताना या माध्यमांचा माझ्या मुख्य प्रवाहातील शिक्षणात सहभाग नव्हता. तसा तो असायला हवा असा विचारही नव्हता. पण इंटरनेट आणि यूट्यूब आल्यानंतर गोष्टी झपाट्याने बदलत गेल्या. आणि विशेषतः अलीकडच्या पिढीसाठी तर खूपच बदलल्या. कारण ही जनरेशन खऱ्या अर्थाने ह्या माध्यमांसकट जन्माला आलेली आहेत. जन्माला आल्याक्षणापासून हे तंत्रज्ञान आणि माध्यमे त्यांच्याबरोबर आहेत. त्यामुळे गोष्टींचे आकलन करण्याच्या आजवरच्या इतर पिढ्यांच्या पद्धती आणि आजच्या टिनेजर्सच्या पद्धती पूर्णपणे निराळ्या आहेत. बाकी पिढ्या ह्या ‘लिखित आणि वाचिक’ माध्यमांच्या होत्या तर आजची जेन झी पिढी ‘दृक् श्राव्य’ माध्यमांची आहे,ऑडिओ- व्हिज्युअल आहे. हा मोठा फरक आपल्याला लक्षात घ्यावाच लागेल. त्याशिवाय ही पिढी या माध्यमांकडे कशा पद्धतीने पाहाते हे समजू शकणार नाही, समजून घेता येणार नाही. हेही वाचा. Health Special: वेदनेचे प्रकार किती? ती कशी जाणवते? कामाच्या निमित्ताने मुलांशी जेव्हा गप्पा होतात तेव्हा एक प्रश्न मी आवर्जून त्यांना विचारते, यूट्यूब का आवडतं? बहुतेकदा मुलं हे नाकारत नाहीत की त्यांना यूट्यूब आवडतं. हेही नाकारत नाहीत की, त्यांना अभ्यासापेक्षा यूट्यूब जास्त आवडतं. मग अर्थातच प्रश्न येतो, असं का? काही मुद्दे जे मुलं नेहमीच शेअर करतात इथे मांडते. वाचण्यापेक्षा ऐकणं आणि बघणं जास्त आवडतं, त्यातून विषय चटकन समजतात.यूट्यूब कधीही पाहता येतं, शाळेत न समजलेला विषय यूट्यूबवर चटकन समजतो. शिक्षक परत परत समजावून देत नाहीत. विचारलं तर हसू होतं. व्हिडीओ पुन्हा पुन्हा लावण्याची सोय असते.जे प्रश्न पडतात त्यांची तात्काळ उत्तरं मिळतात. कुणीही तुम्हाला प्रश्न विचारला म्हणून हसत नाही. प्रश्न का विचारला म्हणून ओरडाही बसत नाही.जगभरातल्या तज्ज्ञांशी, शिक्षकांशी कनेक्ट होता येतं. फक्त शाळा आणि कॉलेजपुरतं मर्यादित राहण्याची गरज नसते.एकच एक शिक्षक सतत शिकवत राहतात ते कंटाळवाणं वाटतं, यूट्यूबवर वेगवेगळ्या लोकांकडून शिकता येतं.गणिताच्या निरनिरळ्या पद्धती समजतात, विज्ञानाचे प्रयोग अधिक नीट समजून घेता येतात. शाळेत जे प्रयोग नीट समजत नाहीत ते यूट्यूबवर रिव्हाईंड करत परत परत बघून समजून घेता येतं.एरवी अभ्यासासाठी वेळ, वातावरण तयार करावं लागतं, ऑनलाईन कधीही शिकता येतं.यूट्यूब ही उत्तम पर्यायी शिक्षण व्यवस्था आहे.रोजच्या जगण्यातल्या छोट्या प्रश्नांचीही उत्तरं मिळतात.कुणीही आमच्याकडे प्रश्न विचारला म्हणून जजमेंटली बघत नाही. इंटरनेट विचारलेल्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं देतं. हा प्रश्न पडलाच कसा असं तिथे कुणीही विचारत नाही. हा पिढ्यांमध्ये पडलेला मोठा फरक आहे. मग विषय येतो, मुलांना कॉपीची सवय लागते त्याचं काय? स्वतःचं डोकं न चालवता गुगलवरून किंवा यूट्यूब वापरुन आहे तसं उतरवून काढण्याकडे कल वाढतोय त्याचं काय? खरं सांगायचं तर… हेही काही नवीन नाही. गाईड्स आपल्याकडे पूर्वापार आहेत. आणि त्यातून उत्तर उतरवून काढण्याची, पाठ करून घोका आणि ओका पद्धतीने पेपर लिहिण्याची पद्धतही जुनीच आहे. त्याचा माध्यमांशी संबंध नाही, शिक्षण व्यवस्थेशी आहे. पूर्वी गाईड्स होती आता इंटरनेट. माध्यम बदललं आहे फक्त. ज्यांना कॉपी करायची आहे ते पूर्वीही करत होते आणि आजही करतात. ज्यांना विषय समजून घ्यायचा आहे ते विषय समजून घेतात. मुद्दा आहे तो आजची तरुण पिढी ऑडिओ व्हिज्युअल आहे हे समजून घेण्याचा.