मुंबई : डोके फुटल्यासारखी वेदना, डोळ्यांवर प्रकाश पडताच वाढणारी असह्य जळजळ आणि काही तास नव्हे तर दिवसन्‌दिवस सुरू राहणारा त्रास ही केवळ साधी डोकेदुखी नाही. हा आहे मायग्रेन, जो आज शांतपणे पण वेगाने लोकांच्या आयुष्यावर परिणाम करत आहे. प्रामुख्याने महिलांमध्ये हा त्रास जास्त प्रमाणात दिसून येतो.मायग्रेन हा एक गुंतागुंतीचा न्यूरोलॉजिकल आजार असून त्याकडे अजूनही अनेकजण किरकोळ त्रास म्हणून पाहतात. पण तज्ज्ञांच्या मते, ही दुर्लक्ष करण्यासारखी समस्या नाही. कारण मायग्रेनचा झटका आल्यावर व्यक्तीचं दैनंदिन जीवन अक्षरशः थांबून जात.

या आजाराची लक्षणंही वेगळी आणि टप्प्याटप्प्याने दिसणारी असतात. अनेक रुग्णांना झटका येण्याआधी काही संकेत मिळतात त्यात डोळ्यांसमोर चमकणारे प्रकाश, थकवा, चिडचिड किंवा भूक मंदावणं. त्यानंतर डोक्याच्या एका बाजूला ठणकणारी तीव्र वेदना सुरू होते. ही वेदना काही तासांपासून दोन-तीन दिवसांपर्यंत टिकू शकते. त्यासोबत मळमळ, उलट्या, तसेच प्रकाश आणि आवाजाची तीव्र संवेदनशीलता दिसून येते.विशेष म्हणजे, हा आजार पुरुषांपेक्षा महिलांमध्ये जास्त प्रमाणात आढळतो. यामागे हार्मोन्समधील बदल हे एक मोठं कारण मानलं जातं. मासिक पाळी, गर्भधारणा किंवा मेनोपॉजदरम्यान मायग्रेनचा त्रास अधिक वाढतो. त्यामुळे महिलांमध्ये याबाबत जागरूकता असणं अधिक गरजेचं आहे.

मायग्रेनची कारणंही व्यक्तीनुसार बदलतात. ताणतणाव, झोपेची कमतरता, काही विशिष्ट अन्नपदार्थ, हवामानातील बदल, किंवा दीर्घकाळ मोबाईल आणि संगणकाच्या स्क्रीनकडे पाहण हे सर्व ट्रिगर्स ठरू शकतात. त्यामुळे प्रत्येक व्यक्तीमध्ये मायग्रेन वेगळ्या स्वरूपात दिसतो.सर्वात चिंताजनक बाब म्हणजे, अनेकजण याकडे दुर्लक्ष करतात. साधी डोकेदुखी समजून स्वतःच औषधं घेणं किंवा वेदना सहन करत राहण यामुळे समस्या अधिक गंभीर होऊ शकते.

दीर्घकाळ मायग्रेनचा त्रास राहिल्यास मानसिक आरोग्यावरही परिणाम होण्याची शक्यता असते. उपचारांच्या बाबतीत, मायग्रेन पूर्णपणे बरा करणारा एकच उपाय उपलब्ध नसला तरी योग्य उपचार आणि जीवनशैलीत बदल करून हा त्रास मोठ्या प्रमाणात नियंत्रणात ठेवता येतो. डॉक्टरांच्या सल्ल्याने औषधोपचार घेणं, नियमित झोप, संतुलित आहार आणि ताण कमी करणाऱ्या सवयी अंगीकारणं अत्यंत आवश्यक आहे. डॉक्टरांचे याबाबत म्हणणे आहे की, जर वारंवार तीव्र डोकेदुखी होत असेल आणि ती रोजच्या कामकाजावर परिणाम करत असेल, तर त्याकडे दुर्लक्ष करू नका. वेळेत निदान आणि योग्य उपचार केल्यास मायग्रेनवर नियंत्रण मिळवणं शक्य आहे.आजच्या धावपळीच्या जीवनशैलीत वाढता ताण आणि बदलते सवयी यामुळे मायग्रेनचा धोका वाढतो आहे. त्यामुळे ‘साधी डोकेदुखी’ म्हणून दुर्लक्ष करण्याऐवजी हा इशारा समजून योग्य वेळी पावलं उचलणं गरजेच आहे.