Insulin Response To Protein :कार्बोहायड्रेट कमी करून प्रथिनांचे सेवन जास्त केलं तर रक्तातील साखरेची पातळी आपोआप नियंत्रणात येते असे अनेकांना वाटते. पण, प्रत्यक्षात दूध, चिकन, अंडी किंवा डाळीसारखी प्रथिनेयुक्त अन्नपदार्थदेखील रक्तातील साखरेवर परिणाम करू शकतात. काही लोकांमध्ये तर प्रथिनेयुक्त आहार जास्त खाल्ल्यावरच इन्सुलिन अचानक वाढतं आणि रक्तातील साखरेची पातळी स्थिर न राहता उलट वाढायला लागते. या प्रक्रियेचा नेमका मेकॅनिझम काय आहे आणि प्रथिनेयुक्त अन्न खातानाही पोर्शन कंट्रोल म्हणजे योग्य प्रमाणात खाणे का गरजेचं आहे, यावर तज्ज्ञ काय सांगतात हे जाणून घेऊ या.

याबाबत दी इंडियन एक्स्प्रेसला माहिती देताना, दिल्ली अपोलो हॉस्पिटलच्या एंडोक्रायनॉलॉजीचे सीनियर कन्सल्टंट, डॉ. एस. के. वांगनू यांनी सांगितले की, “माझ्याकडे एक रुग्ण आला होता, स्वतःची थोडीशी वाढती रक्तातील साखरेची पातळी आटोक्यात आणण्यासाठी तो कार्बोहायड्रेट आणि फॅट कमी करून प्रथिनेयुक्त आहार घेत होता. तो व्यायामही नियमित करत होता. पण, तरीही त्याच्या रक्तातील साखरेची पातळी कमी होत नव्हती. उलट काही दिवसांनी ते आणखी वाढत होते. हे पाहून एक मोठा प्रश्न पडला, जेव्हा कार्बोहायड्रेट कमी आहेत, फॅटस् कमी आहे आणि आहार व व्यायाम नीट आहे, तरीही रक्तातील साखरेची पातळी वाढते; असे का घडते ते समजून घ्या.

इन्सुलिन आणि त्याची कारणं

सामान्यतः पोषण आणि रक्तातील साखरेची पातळी नियंत्रणाच्या चर्चेत कार्बोहायड्रेट्सलाच जास्त महत्त्व दिले जाते, कारण ते थेट रक्तातील साखर वाढवतात. पण, एक महत्त्वाची गोष्ट अनेकदा दुर्लक्षित राहते — प्रथिनांमुळेही इन्सुलिन वाढू शकते आणि काही वेळा ते कार्बोहायड्रेटपेक्षा जास्त वाढू शकते. विशेषतः ६० ते ७५ ग्रॅमसारखे जास्त प्रमाणात प्रथिने एका जेवणात घेतल्यास शरीराच्या प्रतिदिन आवश्यक असलेल्या ६० ग्रॅम प्रथिनाच्या मर्यादेपेक्षा ते खूपच जास्त होते. अशा परिस्थितीत एका वेळी ७५ ग्रॅमपेक्षा जास्त प्रथिने खाल्ल्यास तुमची रक्तातील साखरेची पातळी वाढू शकते.

Award Banner

कार्बोहायड्रेट्स रक्तातील साखर वाढवतात म्हणून स्वादूपिंड शरीरात इन्सुलिन सोडतो — हे सर्वांना माहीत आहे, पण काही प्रथिनेयुक्त पदार्थ रक्तातील साखर फारशी न वाढवता इन्सुलिनसाठी जबरदस्त सिग्नल देतात. यामागचं मुख्य कारण म्हणजे अमिनो अॅसिड्स. ल्युसिन, आयसोल्युसिन, व्हॅलीन, लाइसिन आणि आर्जिनिन ही अमिनो अॅसिड्स इन्सुलिन वाढवण्यात खूप प्रभावी आहेत. जेव्हा ही अमिनो अॅसिड्स रक्तात प्रवेश करतात, तेव्हा ती स्वादूपिंडाला अतिरिक्त इन्सुलिन सोडण्याचा संदेश देतात. अनेक वेळा हा प्रतिसाद कार्बोहायड्रेट्ससारखाच किंवा त्याहूनही जास्त असू शकतो. दीर्घकाळ असे घडू लागले तर स्वादूपिंडावर ताण येतो, इन्सुलिन सोडणाऱ्या पेशी थकतात आणि हळूहळू त्यांची कार्यक्षमता कमी होते. गंभीर परिस्थितीत त्या पेशींचा नाशही होऊ शकतो. इन्सुलिनचं संतुलित प्रमाण ठेवणं शरीराच्या रक्तातील साखरेच्या नियंत्रणासाठी खूप गरजेचं आहे.

कोणत्या प्रथिनेयुक्त पदार्थांमुळे इन्सुलिन वाढू शकते

१. दुग्धजन्य पदार्थ (दूध, दही, चीज)

हे प्रथिनांमध्ये समृद्ध असतात आणि इन्सुलिन वाढवणारे अमिनो अॅसिड्स मोठ्या प्रमाणात असतात. व्हे प्रथिने तर विशेषतः जोरदार इन्सुलिन प्रतिसाद निर्माण करतो, म्हणूनच वर्कआउटनंतर दूध किंवा व्हे प्रोटीन घेतलं जातं—ते स्नायूंमध्ये पोषकद्रव्यं पोहोचवण्यासाठी इन्सुलिनचा वापर करते.

२. अंडी

कार्बोहायड्रेट्स कमी असले तरी अंडी ल्युसिन आणि लाइसिनने भरलेली असतात आणि हलका पण महत्त्वपूर्ण इन्सुलिन प्रतिसाद देतात.

३. चिकन, टर्की, लीन मीट

यामध्ये ल्युसिन आणि आर्जिनिन मोठ्या प्रमाणात असल्याने इन्सुलिन वाढतं. कार्बोहायड्रेट नसतानाही हे इन्सुलिन वाढवतात—विशेषतः जास्त प्रमाणात प्रथिनांचे सेवन केल्यास.

४. मासे आणि समुद्री अन्न

सॅल्मन, ट्युना, कॉड यांसारखे मासे हे प्रथिनांनी समृद्ध असतात आणि त्यातील आर्जिनिनमुळे इन्सुलिन वाढवतात.

५. वनस्पतीजन्य प्रथिने (सोया, मसूर, मटार)

सोया प्रथिनांमध्ये ब्रॅन्च्ड चेन अमिनो अॅसिड्स असल्यामुळे इन्सुलिन लक्षणीय वाढतं. म्हणजे कार्बोहायड्रेट कमी असलं तरी प्रथिनांमुळे इन्सुलिन वाढू शकतं.

आरोग्य आणि आहार नियोजनासाठी काय अर्थ?

यावरून एक गोष्ट स्पष्ट होते — प्रथिने हा निरुपद्रवी किंवा नेहमीच सुरक्षित असलेला घटक नाही. विशेषतः टाइप २ डायबिटीस किंवा इन्सुलिन रेझिस्टन्स असणाऱ्या व्यक्तींनी प्रथिनेही योग्य प्रमाणात सेवन करणे आवश्यक आहे.

प्रथिनांसह फायबर आणि हेल्दी फॅट्स घेतल्यास इन्सुलिनचा प्रतिसाद संतुलित करण्यास मदत होते.

खेळाडूंना किंवा स्नायू वाढवू इच्छिणाऱ्यांना हा इन्सुलिन प्रतिसाद फायदेशीरही ठरू शकतो, कारण इन्सुलिन पोषकद्रव्यं स्नायूंमध्ये पोहोचवून स्नायू निर्मितीत मदत करतो.

प्रथिनांमुळे होणारा इन्सुलिन प्रतिसाद हा प्रथिनेचा प्रकार, त्याचं सेवन केलेलं प्रमाण आणि व्यक्तीच्या मेटाबॉलिक आरोग्यावर अवलंबून असतो.

संपूर्ण अन्न (whole foods) प्रामुख्याने संतुलित प्रतिक्रिया देतात, पण व्हे किंवा सोया आयसोलेट (Whey or soy isolate)सारख्या अत्यंत शुद्ध प्रथिने पावडरचे सेवन केल्याने इन्सुलिन जास्त प्रमाणात वाढू शकतं, त्यामुळे आहार योजना आखताना प्रथिनांनाही संतुलित प्रमाणात, योग्य वेळी आणि योग्य पदार्थांबरोबर घेणं महत्त्वाचं आहे.