सध्या पावसाळा सुरू झाला असून, या हंगामात आरोग्याची काळजी घेणे गरजेचे आहे. पावसाळ्याच्या दिवसांत लोकांची रोगप्रतिकारक शक्ती कमकुवत होते. त्यामुळे अनेक प्रकारचे संसर्ग होऊ शकतात. पावसाळा म्हटले की, अनेक आजारांना सहज आमंत्रण मिळते. त्यांचा सामना करण्यास सक्षम राहण्यासाठी आपण काय खातो याची काळजी घेणेदेखील तितकेच महत्त्वाचे आहे. पावसाळ्यात जीवाणू आणि बुरशीजन्य संसर्गाचा धोका जास्त असतो. त्यासाठी आपण जे अन्न खातो, त्याबाबत सावध राहणे गरजेचे आहे. पावसाळ्यात कोणत्या पदार्थांपासून दूर राहावे, या विषयावर पोषणतज्ज्ञ गरिमा देव वर्मन यांनी माहिती दिल्याचे वृत्त दी इंडियन एक्स्प्रेसने दिले आहे. आपण ती माहिती सविस्तर जाणून घेऊ.

पावसाळ्यात ‘या’ पदार्थांपासून स्वत:ला ठेवा दूर

१. पालेभाज्या

निरोगी राहण्यासाठी पालेभाज्या खाण्याचा सल्ला दिला जातो. पण, पावसाळ्यात पालेभाज्या का खाऊ नयेत हे जाणून घेतल्यावर तुम्हाला नक्कीच आश्चर्य वाटेल. कारण- त्यात जीवाणू आणि सूक्ष्म जीव आढळतात. त्यामुळे संसर्गाचा धोका अनेक पटींनी वाढतो.

२. रस्त्यावरील खाद्यपदार्थ

पावसाळ्याच्या हंगामात बाहेर थंडगार वातावरण असते. या हंगामात बाहेरील पदार्थ खाणे टाळा. विशेषकरून रोडच्या बाजूला असलेल्या उघड्यावरील गाड्यांवरचे अन्न खाणे टाळा. रस्त्यावरील खाद्यपदार्थ पूर्णत: स्वच्छतेच्या दृष्टीने काळजी घेऊन तयार केलेले नसतात. त्यामुळे ते लवकर दूषित होऊ शकतात. चाट, पकोडे, समोसे असे सर्व रस्त्यावरचे पदार्थ आपल्या पचनासाठी चांगले नसतात.

(हे ही वाचा: ‘या’ जादुई पावडरने झपाट्याने होईल वजन कमी; फक्त एकदा डाॅक्टरांकडून सेवनाची पद्धत समजून घ्या)

३. सीफूड

तुम्हाला पावसाळ्यात काळजी घ्यावी लागेल आणि सीफूडचे मर्यादित प्रमाणात सेवन करावे लागेल. पावसाळ्यात पाणी लवकर दूषित होते. या पार्श्वभूमीवर मासे, कोळंबी वगैरे खाणे टाळा. तुम्ही खाल्लेल्या माशांमुळे तुम्हाला अतिसाराचा त्रास होऊ शकतो.

४. कापलेली फळे

पावसाळ्यामध्ये अनेक संसर्गजन्य जीवाणूंच्या संख्येत वाढ होते. त्यामुळे या दिवसांमध्ये आहाराची विशेष काळजी घेणे आवश्यक असल्याने अगोदरच कापून ठेवलेल्या फळांचे सेवन अजिबात करू नका. अशा फळांवर माश्या, डास यांसारखे कीटक बसतात. त्यामुळे अनेक जीवाणू फळांवर असतात. अशा फळांचे सेवन केल्याने आपण आजारी पडू शकतो.

५. दुग्धोत्पादने

पावसाळ्यात दही, ताक अशा दुग्धजन्य पदार्थांचे सेवन टाळावे. कारण- पावसाळ्यात अन्नपदार्थांमध्ये जीवाणू फार लवकर वाढतात आणि दह्यामध्ये आधीच जीवाणू असतात. जर तुम्ही रोज दह्याचे सेवन करीत असाल, तर तुम्हाला पोटाशी संबंधित आजार होऊ शकतात.

६. तळलेले पदार्थ

पावसाळ्यामध्ये तळलेल्या पदार्थांपासून दूर राहण्याचा मोह आवरणे फार कठीण असते. पण, जिभेला आवर घालून, तुम्ही तळलेल्या पदार्थांपासून जेवढे दूर राहाल तेवढे उत्तम ठरेल. तेलकट पदार्थ जास्त प्रमाणात खाल्ल्याने पचनाशी संबंधित त्रासांना सामोरे जावे लागू शकते.

७. मांसाहाराचे अतिसेवन टाळण्याची गरज

पावसात मांसाहारी गोष्टींचे अतिसेवन टाळावे. जर तुम्हाला मांसाहाराची इच्छा असेल, तर ताजे शिजविलेले पदार्थ निवडण्याचा आणि उरलेले पदार्थ टाळण्याचा सल्ला तज्ज्ञांनी दिला.