पुणेः ‘तोंडात फोड येणे, सूज येणे किंवा अल्सर होणे, यालाच सर्वसामान्य भाषेत ‘तोंड येणे’ असे म्हटले जाते. अनेकजण ही किरकोळ समस्या समजून त्याकडे दुर्लक्ष करतात. मात्र ठराविक कालावधीत तोंडातील फोड किंवा अल्सर बरे होत नसतील, तर ते शरीरातील गंभीर आजाराचे संकेत असू शकतात,’ असे मत वैद्यकीय तज्ज्ञांनी व्यक्त केले आहे. ‘वेळेवर निदान करून योग्य उपचार घेतल्यास या समस्येवर प्रभावीपणे नियंत्रण मिळवता येते,’ असेही तज्ज्ञांनी स्पष्ट केले.
आरोग्यतज्ज्ञांनी दिलेल्या माहितीनुसार, तोंडाची आतील त्वचा (म्युकस मेंब्रेन) अतिशय नाजूक आणि संवेदनशील असते. या भागावर लाल किंवा पांढरे चट्टे, लहान जखमा (अल्सर), सूज किंवा फोड निर्माण होऊ शकतात. सर्वसाधारणपणे तोंड येणे ही किरकोळ समस्या मानली जाते; मात्र काही वेळा ते शरीरातील गंभीर आजारांचे किंवा पोषणातील कमतरतेचेही लक्षण असू शकते. तोंड आल्यावर जीभ कोरडी पडणे, जिभेवर काटे येणे, अल्सर होणे तसेच खाणे-पिणे आणि बोलताना वेदना होणे अशा तक्रारी जाणवू शकतात.
तोंड येण्यामागील प्रमुख कारणे
तोंड येण्यामागे अनेक कारणे असू शकतात. यातील प्रमुख कारणांविषयी माहिती देताना तज्ञ सांगतात की, शरीरातील जीवनसत्त्वे, विशेषतः बी-समूहातील जीवनसत्त्वे, लोह किंवा फॉलिक अॅसिडची कमतरता हे एक महत्त्वाचे कारण आहे. याशिवाय, अॅसिडिटी, चयापचयातील बिघाड, काही गंभीर आजार, गुटखा व तंबाखूचे सेवन, रात्रीची अपुरी झोप, मानसिक ताण, जेवणाच्या वेळांमध्ये सातत्याने होणारे बदल, सतत बाहेरचे किंवा तेलकट-तिखट पदार्थ खाण्याची सवय यामुळेही तोंड येण्याचा त्रास होऊ शकतो.
उपचार आणि काळजी
‘तोंड आल्यावर तोंडातील लाळ नैसर्गिकरीत्या जखम भरून येण्यास मदत करते. त्यामुळे बहुतांश वेळा अल्सर पाच ते सहा दिवसांत आपोआप बरे होतात. मात्र जखम एक आठवड्यापेक्षा अधिक काळ टिकून राहिल्यास, वारंवार तोंड येत असल्यास किंवा वेदना वाढत असल्यास त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. कारण अशा वेळी जीवनसत्त्वांच्या कमतरतेवर औषधे, प्रतिजैविके किंवा इतर आवश्यक उपचारांची गरज भासू शकते. काही दुर्मीळ प्रकरणांमध्ये तोंडातील न भरून येणाऱ्या जखमा कर्करोगाचेही लक्षण असू शकतात. त्यामुळे वेळेत तपासणी करून योग्य उपचार सुरू करणे अत्यंत महत्त्वाचे आहे,’ असा सल्ला डॉक्टर देतात.
तज्ञ काय म्हणतात ?
तोंडातील जखम आणि अल्सर बरा होत नसेल, तर कर्करोगाची तपासणी करणे गरजेचे आहे. असे आजार दीर्घ काळ अंगावर काढणे चुकीचे आहे. केवळ तोंड येणे ही एकच समस्या नसून, याच्याशी अनेक समस्या निगडित असू शकतात. त्यासाठी तपासणी आवश्यक आहे. असा सल्ला ससून सर्वोचपार रुग्णालयाचे कर्करोग तज्ञ डॉ. चकोर वोरा यांनी दिला.
याविषयी माहिती देताना जनरल फिजिशियन डॉक्टर अनिकेत जोशी सांगतात की, तोंड येण्याचे मुख्य कारण म्हणजे जीवनसत्त्व बाराची कमतरता. यासाठी सात्विक आहार असावा. बाहेरचे पदार्थ चवदार वाटत असले, तरी त्यातील हानिकारक घटकांमुळेही तोंड येण्याची समस्या उद्भवू शकते. बाहेरच्या अन्नातून आपल्याला जीवनसत्त्वे मिळत नाहीत. त्याचा परिणाम आरोग्यावर होतो. तसेच, तोंड येण्याची समस्या उद्भवू शकते.
तोंड येणे म्हणजे थोडीशी सूज येणे फोड येणे आणि पुढील टप्प्यात अल्सर होणे असे आहे. शरीरातील संसर्ग, जीवनसत्त्वांची कमतरता अशा कारणांमुळे तोंड येऊ शकते. तोंडातील लाळ ही एक प्रकारे औषधाचे काम करते. त्यामुळे सर्वसामान्य कारणांमुळे तोंड येत असेल, तर तीन चार दिवसांत बरे होते. मात्र, अनेक दिवस हा आजार बरा होत नसेल, तर मात्र वैद्यकीय तपासणी करून घेणे आवश्यक आहे. अशी माहिती ससून सर्वोपचार रुग्णालयातील जनरल फिजिशियन डॉ. सोनाली साळवी यांनी दिली.
