मुंबई : मुंबईत वाढत्या उष्णतेमुळे नागरिकांच्या आरोग्यावर गंभीर परिणाम दिसू लागले असून, विशेषतः पोटाच्या आजारांमध्ये मोठी वाढ नोंदवली जात आहे. शहरातील डॉक्टरांच्या माहितीनुसार, गेल्या काही आठवड्यांत आतड्यांच्या संसर्गाच्या रुग्णांमध्ये सुमारे ५० टक्क्यांनी वाढ झाली आहे.

उष्णतेची लाट, अस्वच्छ अन्न-पाणी आणि अनियमित जीवनशैली यामुळे हा धोका अधिक वाढत असल्याचे तज्ज्ञ सांगतात. अलीकडील एका प्रकरणात ३० वर्षीय सेल्स क्षेत्रात काम करणाऱ्या तरुणाला सुरुवातीला साधी पोटफुगी आणि अस्वस्थता जाणवत होती. त्याने हे किरकोळ लक्षण समजून दुर्लक्ष केले. मात्र पुढील ४८ तासांत त्याची प्रकृती अचानक खालावली. त्याला तीव्र अतिसार, उलट्या, चक्कर येणे आणि अशक्तपणा जाणवू लागला. परिस्थिती इतकी गंभीर झाली की त्याला तातडीने रुग्णालयात दाखल करावे लागले. तपासणीनंतर डॉक्टरांनी उष्णतेमुळे वाढलेल्या जठरांत्र संसर्गाचे निदान केले.

उन्हाळ्यात जास्त तापमानामुळे जंतूंची वाढ वेगाने होते. अन्न पटकन खराब होण्याची शक्यता वाढते ज्यामुळे फूड पॉइझनिंगचे प्रमाण वाढते. याशिवाय दूषित पाणी किंवा उघड्यावर ठेवलेले अन्न खाल्ल्यास संसर्ग होण्याचा धोका अधिक असतो. उष्णतेमुळे शरीरातील पाण्याचे प्रमाण कमी होते म्हणजेच डिहायड्रेशन होते त्यामुळे शरीराची प्रतिकारशक्ती कमकुवत होते. परिणामी संसर्ग लवकर पसरतो असे ठाण्यातील डॉक्टर पराग देशपांडे यांनी सांगितले.

Award Banner

विशेषतः जे लोक दिवसभर बाहेर फिरून काम करतात, रस्त्यावरचे अन्न खातात किंवा वेळेवर जेवण करत नाहीत, त्यांना या आजारांचा धोका अधिक असल्याचे डॉक्टरांनी स्पष्ट केले आहे. एसी ऑफिस आणि बाहेरील कडक उन्हामधील सततचा बदलही शरीरावर ताण आणतो.या प्रकारच्या संसर्गाची लक्षणे सुरुवातीला सौम्य असतात. पोटफुगी, मळमळ, हलकी पोटदुखी अशी लक्षणे दिसतात. मात्र, वेळेत उपचार न घेतल्यास तीव्र अतिसार, उलट्या, ताप, अशक्तपणा अशी गंभीर स्थिती निर्माण होऊ शकते. काही प्रकरणांमध्ये रुग्णांना रुग्णालयात दाखल करणे आवश्यक ठरते असेही डॉ देशपांडे यांनी सांगितले.

उष्णतेच्या काळात पुरेसे पाणी पिणे अत्यंत महत्त्वाचे आहे. दररोज किमान ३ ते ४ लिटर पाणी प्यावे, तसेच नारळपाणी, ताक आणि लिंबूपाणी यांसारख्या द्रवपदार्थांचा आहारात समावेश करावा. दुपारी १२ ते ४ या वेळेत शक्यतो घराबाहेर जाणे टाळावे. बाहेर पडताना टोपी, छत्री किंवा स्कार्फचा वापर करावा.याशिवाय स्वच्छ आणि ताजे अन्न खाण्यावर भर द्यावा. उघड्यावर मिळणारे किंवा शंकास्पद दर्जाचे अन्न टाळावे. हात स्वच्छ धुण्याची सवय ठेवावी आणि पिण्यासाठी स्वच्छ पाण्याचाच वापर करावा.मुंबईतील वाढती उष्णता हा केवळ तापमानाचा प्रश्न नसून गंभीर आरोग्यासाठी सावध राहाण्याचा इशारा आहे. साधी वाटणारी पोटाची लक्षणेही दुर्लक्षित करणे धोकादायक ठरू शकते. वेळेत काळजी घेतल्यास आणि योग्य सवयी अंगीकारल्यास या आजारांपासून बचाव करणे शक्य असल्याचे डॉ श्रेया शेळके यांनी सांगितले.

उन्हाळ्यात कोणती काळजी घ्याल-

रस्त्यावरील सरबत पिणे टाळावा व शक्य असल्यास नारळपाणी प्यावे, दररोज तीन ते चार लिटर पाणी प्यावे, उघड्यावरील अन्नपदार्थ तसेच जंक फुड खाणे टाळावे आणि ताजे व घरचे अन्न घ्यावे. पोटफुगी, मळमळ आदी लक्षणांकडे दुर्लक्ष न करता त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.