Mumbai-Pune Expressway Missing Link Traffic : मुंबई – पुणे द्रुतगती मार्गावरील महत्त्वाकांक्षी प्रकल्प असलेला ‘मिसिंग लिंक’ आजपासून सुरु झाला. मुंबई-पुणे एक्सप्रेस वेवरील खोपोली एक्झिट ते कुसगाव या भागात तयार झालेल्या या मिसिंग लिंकने घाटातील वाहतूक कोंडी मोठ्या प्रमाणात कमी होणार आहे, मात्र लोकार्पणाच्याच दिवशी महामार्गावर प्रवाशांना अनेक तास वाहतूक कोंडीचा सामना करावा लागला. सलग सुट्ट्यांमुळे लोक गावाकडे निघाल्याने अनेक प्रवासी वाहतूक कोंडीत अडकले.
अनेक प्रवाशांकडे पिण्याचे पाणी संपले, अशा परिस्थितीत लहान मुलं आणि ज्येष्ठ नागरिकांना कडक उन्हाच त्रास होऊ लागला. उन्हामुळे गाड्यांचे इंजिन गरम होऊन गाड्या बंद पडण्याचे प्रकार समोर आले. अशा अति उन्हात थांबण्याची वेळ आली तर आपल्या आरोग्याची काळजी कशी घ्यावी याविषयी जाणून घेऊ…
अति उन्हात थांबल्याने पित्ताचे, रक्ताचे, त्वचेचे विकार होऊ शकतात. जर उन्हाळ्यात शरीराचे तापमान सतत वाढत असेल तर, डोके दुखी, चक्कर येणे, अशक्तपणा, मळमळ किंवा निराशपणा येऊ शकते. अतिउन्हामुळे सनस्ट्रोक, मेंदूला इजा पोहोचणे, विलक्षण थकवा येऊन दुबळेपणा येऊ शकतो.
शरीराचे तापमान वाढल्याने रक्तवाहिन्या प्रसरण पावतात. यामुळे रक्तदाब कमी होतो आणि शरीराला रक्त पुरवठा करण्यासाठी ह्रदयाला अधिक कष्ट करावे लागतात. रक्त वाहिन्या प्रसरण पावल्याने शरीराला खाज सुटणे, पाय सुजणे अशी सौम्य लक्षण जाणवू शकतात.
अशावेळी वारंवार भरपूर पाणी पिणे, टोपी किंवा काखेत कांदा ठेवणे, धण्याचे पाणी पिणे, पुदिन्याचे थंडाई सरबत पिऊ शकतात. सतत पाणी पीत राहा जेणेकरुन शरीर हायड्रेट राहिल. ओरल रिहायड्रेशन सोल्युशन (ओआरएस) याचा वापर करा.
अति उन्हामुळे शरीराची ताकद संपते, अशावेळी तुम्ही ताक, लस्सी, कोहळा रस, उसाचा रस, काकडी, कोथिंबीर, मनुका, ताडफळ या गोष्टींचे सेवन करु शकता.
अशावेळी अधिकाधिक फळांचा रस अधिक प्या. फळांचा ज्यूस प्यायल्याने अनेक पोषक तत्वे मिळतात. यामुळे शरीराला ताजेतवाने वाटते. कारण काही फळे थंड असतात, ज्यामुळे तुमचे शरीर देखील थंड राहते.
उष्माघाताचा त्रास झाल्यास काय करावे?
तीव्र उन्हात सतत राहिल्यास उष्माघाताचा त्रास जाणवू शकतो. अशा परिस्थितीत उष्माघात झालेल्या व्यक्तीला त्वरीत थंड सावलीच्या ठिकाणी हलवा.
जमिनीवर झोपवा आणि पाय किंचित वर उचला. भरपूर पाणी प्यायला द्या, स्पोर्ट्स किंवा रिहायड्रेशन ड्रिंक्स देऊ शकता. शरीराचे तापमान कमी करण्यासाठी त्यांच्या शरीरावर थंड पाण्याने स्प्रे करा स्पंजने पुसा, वारा घाला आणि काखे आणि मानेभोवती थंड पट्ट्या ठेवा. इतकं करुनही व्यक्ती ३० मिनिटांच्या आत सुस्थितीत न आल्यास त्याला त्वरीत डॉक्टरांकडे घेऊन जा.
