Warning Signs of High Blood Pressure in the Morning : उच्च रक्तदाबाला ‘सायलेंट किलर’, असे म्हटले जाते. कारण- उच्च रक्तदाब हा आरोग्यासाठी धोकादायक मानला जातो. पण, तुम्हाला माहीत आहे का की, सकाळचा तुमचा रक्तदाब कसा आहे यावरून तुम्ही तुमच्या हृदय व रक्तवाहिन्यांशी संबंधित आरोग्याविषयी जाणून घेऊ शकता.

परळ येथील ग्लेनेगल्स हॉस्पिटलचे (Gleneagles Hospitals) वरिष्ठ सल्लागार व इंटरव्हेंशनल कार्डिओलॉजिस्ट डॉ. समीर व्ही. पगड यांनी ‘दी इंडियन एक्स्प्रेस’शी संवाद साधला. त्यामध्ये त्यांनी “सकाळच्या रक्तदाबाचे महत्त्व सांगितले आणि त्यावरून आपल्याला काही गंभीर संकेत मिळतात. त्यामुळे त्याकडे दुर्लक्ष करू नका”, असे सांगितले.

हेही वाचा : दररोज ३० मिनिटे सायकल चालविल्याने तुमच्या शरीरावर काय परिणाम होईल? डाॅक्टरांकडून जाणून घ्या…

डॉ. समीर व्ही. पगड सांगतात, “दिवसभर आपल्याला रक्तदाबात चढ-उतार दिसून येतो. विशेषत: सकाळी रक्तदाब वाढतो. सकाळी उच्च रक्तदाब दिसून येणे, हे चिंतेचे कारण असू शकते.

डॉ. पगड सांगतात, “रक्तदाब हा ताण हार्मोन, झोपेचा अभाव इत्यादी गोष्टींमुळे वाढू शकतो. रक्तदाब कधीतरी वाढणे हे सामान्य असले तरी सतत उच्च रक्तदाबाची समस्या जाणवत असेल, तर आपण चुकीची जीवनशैली अंगीकारली असल्याचा तो संकेत आहे; ज्यामुळे रक्तदाब नियंत्रित ठेवण्यात अडथळा निर्माण होतो.

खालील लक्षणांकडे दुर्लक्ष करू नका

उच्च रक्तदाबाची लक्षणे सहसा दिसत नाहीत. त्यामुळे आरोग्याकडे बारकाईने लक्ष देणे महत्त्वाचे आहे.

सकाळी डोकेदुखी जाणवणे : उच्च रक्तदाबामुळे तुमच्या रक्तवाहिन्यांवर ताण येऊ शकतो आणि त्यामुळे डोकेदुखी जाणवू शकते.

नाकातून रक्तस्राव : उच्च रक्तदाबामुळे तुमच्या नाकातील रक्तवाहिन्या फुटू शकतात. असे घडल्यास नाकातून अचानक रक्तस्राव सुरू होतो.

हेही वाचा : “प्रेग्नन्सीदरम्यान माझे ३५ किलो वजन वाढले होते”, सोनम कपूरने केला खुलासा; डॉक्टरांनी सांगितले कारण

सतत थकवा जाणवणे : सकाळी तुम्हाला थकवा जाणवत असेल, तर हे शरीराच्या ऊर्जेवर परिणाम करणारे उच्च रक्तदाबाचे लक्षण असू शकते.

अस्वस्थता जाणवणे : सकाळी आरामदायी न वाटणे किंवा अस्वस्थ वाटणे याचा थेट संबंध उच्च रक्तदाबाशी असू शकतो

चक्कर येणे : उच्च रक्तदाबामुळे सकाळी उठल्यानंतर चक्कर येऊ शकते.

वरील लक्षणे लक्षात घेऊन, तुम्ही उच्च रक्तदाब नियंत्रणात आणू शकता. नियमित तपासणी करा आणि डॉक्टरांचे मार्गदर्शन घ्या. रक्तदाब नियंत्रित ठेवण्यासाठी आणि हृदय व रक्तवाहिन्यांशी संबंधित आजारांचा धोका कमी करण्यासाठी हे अत्यंत गरजेचे आहे.