Microplastics in Salt And Sugar Brands: मायक्रोप्लास्टिकमुळे जगाची डोकेदुखी वाढलेली आहे. याचे आरोग्य आणि पर्यावरणावर गंभीर परिणाम दिसून येत आहेत. प्लास्टिकचे बारीक कण हवा, पाणी, माती, अन्न आणि मानवाच्या अवयवात आढळून आले आहेत. नुकत्याच झालेल्या एका नव्या अभ्यासातून मायक्रोप्लास्टिकबाबत आणखी एक धक्कादायक बाब समोर आली आहे. दिल्लीतील टॉक्सिक्स लिंक या संस्थेने याबाबत अभ्यास केला असून "मायक्रोप्लास्टिक इन सॉल्ट अँड शुगर" या शीर्षकाखाली अहवाल प्रसिद्ध केला आहे. या अहवालातील महत्त्वाची बाब म्हणजे, भारतातील सर्व साखर आणि मीठाच्या ब्रँडमध्ये प्लास्टिकचे बारीक कण आढळून आले आहेत, अशी बातमी पीटीआय वृत्तसंस्थेने दिली. मीठामध्ये प्लास्टिकचे प्रमाण किती? संसोधकांनी या अभ्यासासाठी १० विविध प्रकारच्या मीठाचे नमुने गोळा केले. यामध्ये आयोडीनयुक्त मीठात सर्वाधिक मायक्रोप्लास्टिक (प्रति किलो ८९.१५ कण) आढळून आले. तर सेंद्रीय खडे मीठात सर्वात कमी प्रमाण (प्रति किलो ६.७० कण) एवढे प्रमाण आढळून आले. आयोडीनयुक्त मीठामध्ये बहु-रंगीत पातळ मायक्रोप्लास्टिकचे कण आढळून आले आहेत. या अहवालातील निष्कर्षानुसार प्रत्येक प्रकारच्या सुक्या मीठामध्ये प्रति किलो ६.७१ ते ८९.१५ इतके प्लास्टिकचे बारीक कण आढळून आले आहेत. हे वाचा >> पुरुषांच्या अंडकोषानंतर आता लिंगातही आढळले प्लास्टिक; इरेक्टाईल डिसफंक्शनचा धोका वाढला का? साखरेमध्ये प्लास्टिकचे प्रमाण किती? मीठासह साखरेचेही अशाच प्रकारची तपासणी केली गेली. यासाठी ऑनलाईन आणि प्रत्यक्ष बाजारातून पाच प्रकारच्या साखरेच्या ब्रँडची खरेदी केली गेली. या नमुन्यात, प्रति किलो साखरेमध्ये ११.८५ ते ६८.२५ इतके प्लास्टिकचे कण आढळून आले आहेत. गैर सेंद्रीय साखरेमध्ये मायक्रोप्लास्टिकचे सर्वाधिक प्रमाण असल्याचेही समोर आले आहे. साखर आणि मीठात आढळणारे मायक्रोप्लास्टिक हे वेगवेगळ्या स्वरुपात असल्याचेही समोर आले आहे. तेसच त्याचा आकार ०.१ मीमी ते ५ मीमी पर्यंत असल्याचे अहवालात म्हटले. संशोधकांचा उद्देश काय? मायक्रोप्लास्टिकबाबत वैज्ञानिक माहिती समोर आणून जागतिक पातळीवर याबद्दल काहीतरी समाधान शोधण्यासाठी प्रयत्न करणे, हा आमच्या संशोधनाचा हेतू असल्याचे टॉक्सिक्स लिंक्सचे संस्थापक रवी अग्रवाल यांनी पीटीआयशी बोलताना सांगितले. मायक्रोप्लास्टिकच्या संपर्कात येण्याचे धोके कमी करण्याच्यादृष्टीने आम्ही या संशोधनातून काही धोरणात्मक निर्णय घेण्यासाठी शास्त्रज्ञांचे लक्ष वेधत आहोत, असेही ते म्हणाले. हे ही वाचा >> विश्लेषण : आईच्या दुधात आढळले ‘मायक्रोप्लास्टिक,’ बाळाला किती धोका? नव्या अभ्यासात नेमकं काय? टॉक्सिक्स लिंक्सचे सहयोगी संचालक सतीश सिन्हा यांनी सांगितले की, आमच्या अभ्यासात सर्व मीठ आणि साखरेच्या नमुन्यांमध्ये मोठ्या प्रमाणात मायक्रोप्लास्टिक आढळून आले आहे. मायक्रोप्लास्टिकचे मानवी आरोग्यावर दीर्घकालीन होणारे परिणामांवर आता व्यापक संशोधन होणे गरजेचे आहे.