Sanitary pads can cause Cancer: मासिक पाळी (Menstrual Cycle) म्हणजेच पीरियड हा महिलांच्या आयुष्यातील महत्त्वाचा भाग आहे. मुलगी वयात आली की, तिला मासिक पाळी सुरू होते. दर महिन्याच्या त्या तारखेला चार ते पाच दिवस रक्तस्राव होतो. मासिक पाळीमुळे महिलांना दर महिन्याला असह्य वेदना, ओटीपोटात क्रॅम्प, मूड बदलणं आदी खूप त्रास सहन करावे लागतात. या काळात प्रत्येक महिलेनं काही खबरदारी घेणं आवश्यक असते. या काळात कपड्यांमधील रक्तस्राव आणि रक्ताचे डाग टाळण्यासाठी सॅनिटरी पॅड वापरले जाते. पण या पॅड्सचा वापर केल्यानं महिलांमध्ये कॅन्सरचा धोका वाढू शकतो, असं एका संशोधनातून दिसून आलं आहे. त्यामुळे महिलांच्या आरोग्याविषयी आता प्रश्न निर्माण झाले आहेत.
सॅनिटरी पॅड्सच्या वापरामुळे कॅन्सरचा खरंच धोका?
स्त्रीरोगतज्ज्ञ डॉ. उमा वैद्यनाथन यांनी ‘द इंडियन एक्स्प्रेस’शी बोलताना सांगितलं की, सॅनिटरी पॅड्सच्या वापरामुळे कॅन्सरचा धोका वाढू शकतो, असं संशोधनातून दिसून आलं आहे. ही खूप मोठी चिंताजनक बाब आहे. दिल्लीस्थित एनजीओ टॉक्सिक्स लिंकने आयोजित केलेला हा अभ्यास आंतरराष्ट्रीय प्रदूषण निर्मूलन नेटवर्कच्या चाचणीचा एक भाग आहे; ज्यामध्ये भारतात विकल्या जाणार्या १० ब्रँडच्या सॅनिटरी नॅपकिन्सच्या उत्पादनांचा समावेश करण्यात आला होता. अभ्यासादरम्यान, संशोधकांना सर्व नमुन्यांमध्ये phthalates आणि volatile organic compounds (VOCs)चे अंश आढळले. हे दोन्ही दूषित घटक कर्करोगाच्या पेशी निर्माण करण्यास सक्षम आहेत, ही चिंतेची बाब आहे.
(हे ही वाचा : महिलांनो ‘ती’ जागा स्वच्छ ठेवण्यासाठी व्हजायनल वॉशची गरज आहे का? डॉक्टरांनी सांगितले सत्य )
पॅडमध्ये कापसापेक्षा रेयॉनचा वापर केला जातो. शोषून घेण्याच्या कमी क्षमतेमुळे रेयॉन अस्वच्छ राहतो आणि त्यामुळे संसर्ग होऊन कर्करोग होऊ शकतो. पॅडमधील सुवासामुळे त्वचेला संसर्ग होऊ शकतो. बराच कालावधीसाठी पॅड वापरल्याने योनीमार्गात जीवाणू तयार होऊ शकतात. त्यामुळे अतिसार, ताप व रक्तदाब यांसारख्या समस्या उदभवतात. मासिक पाळीदरम्यान स्वच्छतेची विशेष काळजी घेणं अत्यंत गरजेचं असत. मात्र, बऱ्याच महिलांना आणि मुख्यतः गावाकडील खेडोपाड्यांतील महिलांमध्ये अजून या बाबतीत तशी जागरूकता नाहीये. मासिक पाळीदरम्यान योनीमार्गाची पीएच पातळी बदलते आणि त्यामुळे त्या भागात जीवाणूंचा संसर्ग होण्याची शक्यता अधिक असते, असे त्या म्हणाल्या.
भारतात सॅनिटरी पॅड्सचा वापर किती सुरक्षित आहे?
विशेषत: भारतातील चारपैकी जवळपास तीन किशोरवयीन महिला सॅनिटरी नॅपकिन्स वापरतात. सामान्यतः उपलब्ध असलेल्या सॅनिटरी उत्पादनांमध्ये इतकी हानिकारक रसायने सापडणे हे खरोखरच धक्कादायक आहे. त्यामध्ये कार्सिनोजेन, प्रजननक्षम विष, अंतःस्रावी विघटन करणारे आणि ॲलर्जीनसारख्या विषारी रसायनांचा समावेश आहे. संशोधक पथकानं सांगितलं की, खरं तर या गंभीर रसायनांचा योनीच्या त्वचेवर होणारा परिणाम हा स्त्रीच्या शरीराच्या इतर भागांच्या त्वचेच्या तुलनेत जास्त असतो. त्यामुळे हा धोका अधिकच वाढतो.
युरोपियन देशांमध्ये या सर्वांसाठी काही नियम आहेत. पण, भारतात असे कोणतेही विशिष्ट नियम नाहीत; ज्याद्वारे लक्ष ठेवले जाते. विशेषत: रसायनांबाबत कोणताही नियम नाही, असे दिल्लीतील पर्यावरण विषयावर काम करणाऱ्य संस्थेने नमूद केले आहे.
महिलांनी सॅनिटरी पॅडऐवजी काय वापरावे?
डॉ. वैद्यनाथन सांगतात, “मासिक पाळीच्या काळात अनेक गंभीर आजार टाळण्यासाठी सॅनिटरी पॅड्सचा वापर केला जातो. पण, संशोधनादरम्यान सॅनिटरी नॅपकिन्समध्ये आढळणारी रसायनं आरोग्यासाठी अत्यंत हानिकारक असल्याचं स्पष्ट झालं. म्हणूनच महिलांनी सॅनिटरी पॅड निवडताना सावधगिरी बाळगणं आवश्यक आहे आणि धोकादायक पदार्थ असलेली उत्पादनं खरेदी करू नका.” डॉ. वैद्यनाथन यांनी कापडी नॅपकिन्स आणि मेन्स्ट्रुअल कप यांसारखे सुरक्षित पर्याय वापरण्याची सूचना केली. हे पर्याय पर्यावरणासाठीही चांगले आहेत. Organic Cloth Pads हे तुलनेनं सुरक्षित असतात. ते धुऊन पुन्हा वापरता येतात. तसेच मेन्स्ट्रुअल कपचा वापर अधिक सुरक्षित व पर्यावरणपूरक ठरतो. हे कप गरम पाण्यात धुऊन पुन्हा वापरता येतात, असंही त्यांनी नमूद केलं.