scorecardresearch

Premium

Health special: वृद्धत्व व त्वचारोग

सध्या भारतीयांचे सर्वसाधारण आयुर्मान ७० वर्षे आहे. त्यामुळे ज्येष्ठ नागरिकांच्या आजारांबद्धल माहिती करून घेणे सर्वांसाठीच आवश्यक आहे.

old age, skin diseases, precautions
Health special: वृद्धत्व व त्वचारोग (भाग पहिला)

डॉ. किरण नाबर, त्वचाविकारतज्ज्ञ

वृद्धत्वामध्ये त्वचेचा कोरडेपणा कसा टाळाल?

elders saved the child slife Varanasi Viral Video
VIDEO: पावसाच्या पाण्यात विजेचा धक्का बसल्याने तडफडत होता चिमुकला, देवदूत बनून आलेल्या वृद्धांनी वाचवले प्राण
Pankaja Munde
“माझ्यावर निर्णय घ्यायची वेळ…”, पंकजा मुंडेंच्या वक्तव्यावर भाजपाची प्रतिक्रिया; म्हणाले…
Marathi Woman Trupti Devrukhkar Shared video
धक्कादायक! मराठी महिलेला मुंबईत घर नाकारलं, मनसेने इंगा दाखवल्यानंतर माफी, व्हायरल व्हिडीओवर संताप व्यक्त
The son told his mother a strange reason for not studying
अभ्यास न करण्यासाठी मुलानं आईला सांगितलं भन्नाट कारण; Video एकदा पाहाच

आधुनिक उपचार पद्धतीमुळे माणसाचे वयोमान वाढते आहे. १९६१च्या भारतीय जनगणनेत ज्येष्ठ नागरिकांचे प्रमाण ५.६% होते ते आता २०२१ मध्ये १०.१% झाले आहे. आणि २०३१ मध्ये ते १३.१% पर्यंत पोहोचण्याची शक्यता आहे. सध्या भारतीयांचे सर्वसाधारण आयुर्मान ७० वर्षे आहे. त्यामुळे ज्येष्ठ नागरिकांच्या आजारांबद्धल माहिती करून घेणे सर्वांसाठीच आवश्यक आहे.

शरीरातील वेगवेगळ्या अवयवांवर आपल्या वयाचा परिणाम होत असतो, त्वचादेखील याला अपवाद नाही. त्वचेचे एकूण दोन भाग असतात. बाह्यत्वचा व अंतर्त्वचा. बाह्यत्वचेमध्ये जे पेशींचे थर असतात ते हळूहळू ३० ते ३५ दिवसात वरती येतात व त्यांचे रूपांतर केराटीन या प्रथिनात होते. थोडक्यात आपली बाह्य त्वचा ही सतत कात टाकत असते. त्यामुळे एखादा ओरखडा जो वरचेवर असतो त्याची खूण राहत नाही, पण मोठ्या जखमेची खूण राहते.

वयस्कर व्यक्तींच्या बाबतीत हा खालील पेशी वर येण्याचा वेग मंदावतो, तसेच वर असलेला केराटीनचा थर साचून राहतो. त्यामुळे त्वचा ही कोरडी व निस्तेज वाटते. अंतर्त्वचा ही मुख्यत्वे इलॅस्टिन व कोल्याजिन अशा दोन प्रकारच्या तंतूंनी बनलेली असते . यांची संख्याही वयपरत्वे कमी कमी होत जाते. त्यामुळे त्वचा ही तुकतुकीत न राहता ती सैल व सुरकुतलेली वाटते. अंतर्त्वचेमध्ये तेलाच्या व घामाच्या ग्रंथीही असतात. त्यांची संख्या व कार्यही मंदावते. त्यामुळेही त्वचा शुष्क व निस्तेज दिसते. त्वचेखाली चरबीचा थर (subcutaneous fat) असतो. वयपरत्वे ही चरबीही कमी होत जाते. त्यामुळे त्वचा सैल व ओथंबलेली दिसते.

वृद्ध व्यक्तींचे त्वचाविकार

कोरड्या त्वचेमुळे होणारे आजार : कोरड्या त्वचेमुळे अंगाला खाज येऊ लागते. जसं पु ल देशपांडे यांनी म्हटले आहे की थंडी सुरू झाली की माझ्या गुडघ्यांना पहिले कळते तसेच अतिवयस्क व्यक्तींच्या हाता-पायांना, मांडीला व पाठीला थंडी सुरू झाली की कोरडी खाज येणे सुरू होते . जिथे हवामान कोरडे आहे ( उदा. पुणे, नागपूर आदी) त्या ठिकाणी तर हे लवकर व जास्त प्रमाणात होते. त्वचा सुकी होते . लालसर होते व जशा दुष्काळात जमिनीला भेगा जाव्यात तशी त्वचा दिसू लागते. जास्त खाजवल्यास पायाच्या वरील नडगीकडच्या बाजूस त्वचा जाड होते व त्यातून लस येऊ लागते. त्याला कोरडेपणाचा इसब (eczema craquele) म्हणतात. थंडी सुरू झाल्यावर वयस्कर व्यक्तींनी आपला नेहमीचा साबण बंद करून पियर्स, डव्ह किंवा अन्य ग्लिसरीनयुक्त साबण वापरावा. नेहेमीच असे साबण वापरले तर उत्तमच.

अंघोळीचे पाणी हे फार गरम घेऊ नये. अंघोळी आधी पाच मिनिटे, दोन्ही हात काखेपर्यंत कोमट पाण्यात बुडवावेत , तसेच झोपण्यापूर्वी दोन्ही पाय गुडघ्यापर्यंत कोमट पाण्यात बुडवावेत. यामुळे चहात बुडवलेल्या टोस्ट प्रमाणे त्वचा नरम होते. त्यानंतर अंग टिपून लगेच त्वचेला मॉयश्चराझर किंवा खोबरेल तेल किंवा लिक्विड पॅराफीन तेल किंवा व्हॅसलिन लावावे. दिवसातून ३-४ वेळा लावावे. थंडीमध्ये सर्व अंग झाकले जाईल असे पायघोळ कपडे घालावेत. आपल्याकडे स्वेटर हे नेहमी लागत नसल्यामुळे ते कपाटात ठेवलेले असतात. ते परत वापरण्यापूर्वी गरम पाण्यात बुडवावेत. नंतर उन्हात वाळवून नंतरच वापरावेत. कारण त्यामध्ये धुळीतील जंतू (dust mite) असतात व त्यामुळे अंगाला खाज येऊ शकते.

अतिसंवेदनशील त्वचेचा आजार ( Atopic dermatitis ) : हा त्वचारोग अति लहान मुले (तीन महिने ते पाच वर्षे वयोगटातील ) तसेच अतिवृद्ध व्यक्तींमध्ये जास्त प्रमाणात दिसतो. व्यक्तींना जो भाग उघडा आहे उदा. तळहात व तळपायांच्या पाठील भाग, हातापायावरील लवणीचा पातळ भाग (कोपर व ढोपरांच्या आतील भाग) , चेहरा व मान या ठिकाणी व इतरत्रही खाज येते. त्वचा कोरडी, जाड व काळपट होते . जास्त खाजवल्यावर लसदेखील येते. अशा व्यक्तींनी साबण पिअर्स, डव्ह इत्यादी वापरावेत. पायघोळ व सुती कपडे वापरावेत. त्वचेला गवत, पेंढा ,रेती ,माती , सिमेंट इत्यादींचा संपर्क येऊ देऊ नये. घरी कुत्री-मांजरे असल्यास त्यांना फार जवळ घेऊ नये. हात पाय पाण्यात बुडवून नंतर लगेच मॉयश्चराझर लावावा.

हाता पायांना होणारे जाडसर इसब : ( Thick Eczema ) काही वयस्कर व्यक्तींच्या हातापायांच्या वरील बाजूंना व क्वचित मानेची त्वचा फार जाड तसेच काळपट होऊन तिथे खूप खाज येत असते. संध्याकाळी, रात्री किंवा अर्ध्या झोपेवर ही खाज जास्त प्रमाणात येते . खाज येते म्हणून खाजवले जाते . खाजवल्यावर ती त्वचा जाड होते. त्वचा जाड झाली की खाज आणखी वाढते व त्यामुळे परत खाजवले जाते व हे दुष्टचक्र सुरू राहते, याला इसब म्हणतात. याचे कारण हे एक तर अतिसंवेदनशील त्वचा हे असते किंवा कधी कधी मानसिक ताण-तणाव, उदासीनता व चिडचिड यातही असू शकते. जे एकाकी वृद्ध आहेत, जे आपले मन वाचन, दूरदर्शन, इतरांशी गप्पा वगैरेत गुंतवू शकत नाहीत त्यांना हा आजार होण्याची शक्यता जास्त असते. अशा व्यक्तींना फक्त त्वचारोगावरील औषधे न देता त्यासोबत समुपदेशन व औदासिन्य कमी करण्याच्या गोळ्याही द्याव्या लागतात. तसेच प्राणायाम , शवासन व ध्यानधारणा याचाही चांगला उपयोग होतो.

नागिण : ( Herpes Zoster ) या आजाराच्या नावालाच लोक घाबरतात व त्याबद्दल अंधश्रद्धाही बऱ्याच आहेत. हा रोग कांजिण्या या आजाराच्या विषाणूमुळे होतो. आपल्याला लहानपणी कांजिण्या होऊन जातात , पण त्याचे विषाणू सुप्तावस्थेत आपल्या मज्जारज्जूमध्ये जिवंत असतात. जेव्हा माणूस वृद्ध होतो तेव्हा त्याची रोगप्रतिकारक शक्ती कमी होते व तेव्हा हे जंतू आपल्या एका नसेमार्फत बाहेर येतात व त्वचेवर जंतुसंसर्ग करतात. या आजारात शरीराच्या एका बाजूला त्वचेवर पाणी भरून फोड येतात व ती बाजू कमी किंवा जास्त प्रमाणात दुखते . हा फक्त त्वचेचा नव्हे तर आतील नस (Peripheral nerve) चा आजार असल्याने कधी कधी असह्य दुखते. कांजिण्याप्रमाणे याचे फोडही एक दोन आठवड्यात सुकतात व खपली धरते, पण दुखणे मात्र हळूहळू कमी होते. नागिण दोन्ही बाजूंना मिळते व माणूस दगावतो हा निव्वळ गैरसमज आहे व त्यात काहीही तथ्य नाही. वेळेत योग्य ते उपचार केल्यास ठणकाही लवकर कमी होऊ शकतो .

Latest Comment
View All Comments
Post Comment

मराठीतील सर्व हेल्थ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Old age and skin diseases hldc asj

संबंधित बातम्या

गणेश उत्सव २०२३ ×