आवडत्या भाजीबरोबर पराठा नसेल, तर भारतीय खाद्यसंस्कृतीनुसार हे जेवण अपूर्ण आहे. याबाबत पॉप गायक झेन मलिकदेखील सहमती दर्शवतो. काही दिवसांपूर्वीच मलिकने इन्स्टाग्रामवर डाएट पराठाबाबत खुलासा करताना सांगितले की, रोटी आणि चपाती यांपैकी जर एक गोष्ट निवडायची झाली, तर तो नेहमीच पराठा निवडेल. कारण- पराठा हा अधिक चांगला आहे, असा दावाही त्याने यावेळी केला.

रोटी किंवा चपाती आणि पराठा हे दोन्ही लोकप्रिय भारतीय पोळीचे प्रकार आहेत. तरी ते तयार करण्यात आणि त्यांच्यातील पौष्टिक घटकांमध्ये लक्षणीय भिन्नता आहे. या दोघांमधील मुख्य फरक काय आहेत आणि तुमच्या आरोग्याची काळजी घेण्याच्या दृष्टीने तुम्ही कोणता पर्याय निवडावा? हे तज्ज्ञांकडून जाणून घेऊ.

“चपाती ही सामान्यत: संपूर्णपणे गव्हाच्या पिठापासून बनवली जाते आणि तापलेल्या तव्यावर ती भाजली जाते; ज्यामुळे तो आहार म्हणून पचण्यासाठी हलका आणि कमी कॅलरीज असलेला पर्याय ठरतो. याउलट पराठे बहुतेकदा पौष्टिक घटकांनी अधिक समृद्ध असतात. कारण- ते भरपूर तूप किंवा लोणी लावून खाल्ले जातात आणि त्यात बटाटे, पनीर किंवा डाळी यांसारखे विविध पदार्थांचे सारण असू शकते,” असे Sugar.fit क्लिनिकल ऑपरेशन्स, कोच लीड व्हीनस सिंग यांनी स्पष्ट केले.

पराठ्यामध्ये वापरले जाणारे अतिरिक्त घटक आणि फॅट्स त्यांची चव अधिक वाढवतात; पण चपातीच्या तुलनेत ते अधिक कॅलरीजही निर्माण करतात.

हेही वाचा – झोपेचं रुटीन बिघडलंय! फक्त एक तासाची कमी झोप तुमच्या आरोग्यासाठी ठरेल धोक्याची घंटा? तज्ज्ञांनी केला खुलासा

चपाती आणि पराठ्यापैकी कोणता पदार्थ आरोग्यदायी आहे?

सिंग यांचे मत आहे की, चपाती आणि पराठ्यापैकी आरोग्यदायी पर्याय कोणता ते तो पदार्थ कशा प्रकारे तयार केला गेलाय यावर अवलंबून असते. “सामान्यत: चपाती हा कमी फॅट्सयुक्त घटकांमुळे आरोग्यदायी पर्याय मानला जातो. पण, कमीत कमी तेल किंवा तूप वापरून आणि पौष्टिक पदार्थांचा समावेश करून पराठेदेखील आरोग्यदायी बनवता येतात.”

त्यांच्या मते, एक तर पदार्थ आरोग्यदायी बनविण्याची गुरुकिल्ली संयम आणि पौष्टिक-समृद्ध घटक निवडणे ही आहे; जसे की, संपूर्ण धान्याचे पीठ वापरणे आणि भरपूर भाज्या वापरणे.

हेही वाचा – तुम्ही पेट्रोलियम जेली खाताय? चेहऱ्यालादेखील लावताय? पण यामुळे उद्भवू शकतात आरोग्याचे अनेक धोके; जाणून घ्या तज्ज्ञ काय सांगतात

तुम्ही चपाती किंवा पराठ्याची पौष्टिकता कशी वाढवू शकता?

याबाबत सल्ला देताना सिंग यांनी सांगितले, “चपातीच्या पिठात मठ्ठा, डाळ, पाणी किंवा प्युरी केलेल्या भाज्यांचा समावेश करावा. त्यामुळे पराठ्यामध्ये प्रथिने व फायबर हे घटक आपसूकच येतात. मग त्यामुळे एकूणच पौष्टिक घटकांचे प्रमाणही वाढते. याबाबत अधिक स्पष्ट करून त्यांनी सांगितले, “मिश्र धान्याचे पीठ निवडा किंवा नाचणी, बाजरी किंवा ज्वारी ही धान्ये गव्हामध्ये मिसळून ते दळून पीठ तयार करा. या धान्यांमध्ये फायबर, जीवनसत्त्वे व खनिजे मुबलक प्रमाणात असतात आणि त्यामुळे चपाती किंवा पराठा अधिक पौष्टिक होतो.”

पराठ्यांमध्ये सारण म्हणून हिरव्या पालेभाज्या (पालक, मेथी), पनीर, टोफू किंवा गाजर व फरसबी सारख्या पिष्टमय पदार्थ नसलेल्या भाज्या वापरणे उपयुक्त ठरते. या घटकांमध्ये कॅलरीज कमी असतात; परंतु जीवनसत्त्वे, खनिजे व फायबर यांचे प्रमाण जास्त असते, जे अधिक संतुलित जेवणासाठी योगदान देते.