Stress And Diabetes Link : आजच्या आधुनिक जीवनशैलीत तणाव हा आपल्या आयुष्याचा एक अविभाज्य भाग बनला आहे. डोकेदुखी, निद्रानाश (झोप न येणे), वजन वाढणे आणि पचनाच्या समस्या यांसारख्या अनेक शारीरिक त्रासांसाठी बऱ्याचदा तणावालाच जबाबदार धरले जाते. परंतु, तणावामुळे मधुमेहाचा धोका खरोखरच वाढू शकतो का?
हाच प्रश्न नुकताच ‘कोरा’ (Quora) या सोशल साइटवर एका युझरने विचारला होता. त्याला जाणून घ्यायचे होते की, सततच्या मानसिक तणावामुळे प्रौढांमध्ये मधुमेह (Adult-onset diabetes) होऊ शकतो का? याचे उत्तर ‘हो’ किंवा ‘नाही’ अशा एका शब्दात देणे सोपे नसले, तरी तज्ज्ञांच्या मते तणावाचा आपल्या चयापचय आरोग्यावर अत्यंत तीव्र परिणाम होतो.
‘झांड्रा हेल्थकेअर’चे मधुमेह आणि लठ्ठपणा तज्ज्ञ डॉ. राजीव कोवील यांच्या मते, “केवळ आणि केवळ तणावामुळेच टाईप २ मधुमेह (Type 2 Diabetes) होतो असे नाही, परंतु हा आजार होण्यामागे तणाव हा एक अत्यंत महत्त्वाचा आणि मोठा कारणीभूत घटक मानला जात आहे.”
तणावाचा रक्तातील साखरेवर कसा परिणाम होतो?
जेव्हा आपल्या शरीराला एखाद्या संकटाची किंवा आव्हानाची जाणीव होते, तेव्हा शरीर ‘फाइट-ऑर-फ्लाईट’ मोड सक्रिय करते. यावेळी शरीरात कोर्टिसोल (Cortisol), ॲड्रिनालिन (Adrenaline), नॉरॲड्रिनालिन आणि ग्रोथ हार्मोन्स यांसारखे हार्मोन्स वेगाने तयार होतात. हे हार्मोन्स शरीराला संकटाचा सामना करण्यासाठी ऊर्जा पुरवण्याचे काम करतात. मात्र, याच वेळी ते शरीरातील ‘इन्सुलिन’च्या कार्याला विरोध करतात.
डॉ. कोवील स्पष्ट करतात, “हे हार्मोन्स यकृतामधील (Liver) ग्लुकोजची निर्मिती वाढवतात आणि स्नायू तसेच फॅट सेल्सद्वारे ग्लुकोज शोषून घेण्याची प्रक्रिया मंदावतात. परिणामी, रक्तातील साखरेचे प्रमाण अचानक वाढते.”
या वाढलेल्या साखरेचे नियंत्रण करण्यासाठी स्वादुपिंड (Pancreas) अधिक प्रमाणात इन्सुलिन तयार करू लागते. परंतु, ज्या लोकांमध्ये आधीपासूनच इन्सुलिनचा प्रतिकार (Insulin Resistance) होत आहे किंवा ज्यांचे स्वादुपिंड कमकुवत आहे, त्यांच्या शरीराला ही अतिरिक्त मागणी पूर्ण करणे कठीण जाते.
तज्ज्ञांच्या मते, ‘कंटिन्युअस ग्लुकोज मॉनिटरिंग’ (CGM) अभ्यासातून असे दिसून आले आहे की, आहार किंवा व्यायामात कोणताही बदल न करताही, केवळ मानसिक तणावाच्या काळात रक्तातील साखरेची पातळी लक्षणीयरीत्या वाढते.
तणाव दीर्घकालीन (Chronic Stress) बनल्यास काय होते?
अल्पकालीन किंवा तात्पुरता तणाव असणे सामान्य आहे. परंतु, जेव्हा हा तणाव रोजच्या जीवनाचा भाग बनतो, तेव्हा खऱ्या समस्या सुरू होतात.
दीर्घकाळ कोर्टिसोलची पातळी वाढत राहिल्यामुळे यकृताकडून ग्लुकोजची निर्मिती वाढत राहते, स्नायू कमकुवत होतात, पोटाभोवती चरबी जमा होऊ लागते आणि इन्सुलिनचा प्रतिकार अधिक तीव्र होतो. याशिवाय, सततच्या तणावामुळे शरीरात दाहकता (Inflammation) वाढते, ज्यामुळे इन्सुलिनचे सिग्नलिंग विस्कळीत होते.
यासह मानसिक तणावाखाली असलेली व्यक्ती अपुरी झोप घेते, व्यायाम करणे टाळते आणि कॅलरीयुक्त जंक फूड किंवा ‘कम्फर्ट फूड’कडे आकर्षित होते. ही सर्व लक्षणे मिळून चयापचय क्रिया पूर्णपणे कोलमडते.
“काळानुरूप, वाढत्या इन्सुलिन प्रतिकाराचा सामना करण्यासाठी स्वादुपिंडातील बीटा पेशींना (Beta Cells) जास्त काम करावे लागते. चयापचय क्रियेवरील हा अतिरिक्त ताण अखेर स्वादुपिंडाचे कार्य मंदावतो. यामुळे सुरुवातीला ग्लुकोजची पातळी बिघडते (Impaired Glucose Tolerance), त्यानंतर प्रीडायबेटीस (Prediabetes) आणि शेवटी टाईप २ मधुमेह जडतो,” असे डॉ. कोवील यांनी सांगितले.
केवळ तणावामुळे मधुमेह होऊ शकतो का?
सध्याच्या वैद्यकीय पुराव्यांवरून याचे उत्तर ‘नाही’ असे आहे.
तज्ज्ञ तणावाला एक ‘अँप्लीफायर’ (तीव्रता वाढवणारा घटक) मानतात, जो अनुवांशिकता, वाढलेले वजन, अयोग्य आहार, व्यायामाचा अभाव, वाढते वय आणि आधीपासून असलेल्या चयापचयाच्या समस्या अशा इतर कारणांसह मिळून काम करतो.
डॉ. कोवील यावर एक सुंदर उदाहरण देतात: “टाईप २ मधुमेह हा अनेक घटकांमुळे होणारा आजार आहे, जिथे अनुवांशिकता बंदूक लोड करते आणि आपली जीवनशैली त्याचा ट्रिगर दाबते.”
थोडक्यात सांगायचे तर तणाव स्वतःहून आजार सुरू करत नाही, परंतु जी व्यक्ती आधीच या आजाराच्या उंबरठ्यावर आहे, त्याची सामान्य साखरेकडून प्रीडायबेटीस आणि मधुमेहाकडे जाण्याचा प्रवास तणावामुळे खूप वेगवान होतो.
तणावाचा चयापचय आरोग्यावर परिणाम होत असल्याची लक्षणे:
- बऱ्याचदा ही लक्षणे अतिशय सूक्ष्म असतात. डॉ. कोवील यांच्या मते, खालील लक्षणांवरून तुम्ही अंदाज लावू शकता:
- आहारात बदल न करताही पोटाभोवतीचे वजन अचानक वाढणे.
- उपाशी पोटी असणारी साखरेची पातळी (Fasting Glucose) वाढणे.
- खाण्यापिण्याच्या सवयी स्थिर असूनही HbA1c ची पातळी बिघडणे.
- जास्त कॅलरी असलेल्या गोड किंवा तेलकट पदार्थांची तीव्र इच्छा होणे.
- सतत थकवा जाणवणे, झोप नीट न येणे.
- व्यायाम करण्याची क्षमता कमी होणे.
- रक्तदाब (Blood Pressure) वाढणे, चिडचिड होणे, अस्वस्थता आणि एकाग्रता न होणे.
तणाव व्यवस्थापनाचा (Stress Management) फायदा होतो का?
होय, नक्कीच होतो. आता वैद्यकीय क्षेत्रातही याला मान्यता मिळत आहे. “नियमित व्यायाम, ध्यानधारणा (Mindfulness), योगसाधना, कॉग्निटिव्ह बिहेविअरल थेरपी (CBT), पुरेशी झोप आणि मित्रांचा किंवा कुटुंबाचा पाठिंबा यांसारख्या तणावमुक्तीच्या उपायांमुळे कोर्टिसोलची पातळी कमी होते, इन्सुलिनची संवेदनशीलता सुधारते आणि शरीरातील अंतर्गत सूज कमी होते,” असे डॉ. कोवील यांनी स्पष्ट केले.
यामध्ये व्यायाम अत्यंत फायदेशीर ठरतो, कारण तो शरीरातील साखरेचा वापर सुलभ करतो आणि त्याच वेळी मानसिक तणावही कमी करतो.
निष्कर्ष : तणाव थेट मधुमेह निर्माण करत नसला तरी तो आगीत तेल ओतण्याचे काम नक्कीच करतो.
