Vinesh Phogat Weight Issue : बदलती जीवनशैली, खाण्यापिण्याच्य चुकीच्या वेळा, व्यायामाचा अभाव अशा अनेक कारणांमुळे लठ्ठपणाची समस्या वाढतेय. महिला आणि पुरुष दोघांनाही ही समस्या भेडसावते; यात भारताची स्टार कुस्तीपटू विनेश फोगट हिला पॅरिस ऑलिम्पिक २०२४ च्या कुस्ती स्पर्धेतून (५० किलो वजनी गट) अधिक वजनामुळे अपात्र ठरविण्यात आले आहे. तिचे वजन मर्यादेपेक्षा जास्त असल्याने अंतिम सामन्यासाठी ती अपात्र ठरली. ऑलिम्पिक नियमानुसार विनेशचे वजन मर्यादित वजनापेक्षा १०० ग्रॅम जास्त होते. त्यामुळे खेळाडूंनाही आपल्या वजनावर विशेष लक्ष द्यावे लागते.

यात सर्वसामान्यपणे महिलांमध्ये वजन वाढण्याची समस्या पटकन दिसून येते. एकंदरीत शरीराच्या कोणत्याही भागाकडे पाहिले तरी महिलांना आपण जाडजूड झालो आहोत, असे लक्षात येते. अशा परिस्थितीत दिवसेंदिवस वाढणारे वजन कमी करण्यासाठी महिला अनेक उपाय करून पाहतात. त्यामध्ये त्या जिममध्ये जाऊन वर्कआउट करणे, स्ट्रिक्ट डाएट प्लॅन फॉलो करणे आणि इतरही अनेक उपाय करून पाहत असतात. पण, कितीही उपाय केले तरी पुरुषांच्या तुलनेत महिलांना वजन कमी करणे अधिक आव्हानात्मक असते. त्यामुळे पुरुषांपेक्षा महिलांना वजन कमी करण्यासाठी अधिक वेळ लागतो? पण असे का? याविषयी आहारतज्ज्ञ भक्ती कपूर यांनी इंडियन एक्स्प्रेसला दिलेल्या माहितीच्या आधारे जाणून घेऊ…

आहारतज्ज्ञ भक्ती कपूर यांच्या मते, एखाद्या महिलेला काही किलो वजन कमी करण्यासाठी खूप मेहनत घ्यावी लागते; पण पुरुष ते सहजतेने करू शकतात. आहारतज्ज्ञ कपूर यांनी एका इन्स्टाग्राम पोस्टमध्ये तीन गोष्टी नमूद केल्या आहेत. त्यात कोणत्या कारणामुळे पुरुष महिलांपेक्षा सहजपणे वजन कमी करू शकतात यामागची कारणे सांगितली आहेत.

१) कमी टेस्टोस्टेरॉन :

टेस्टोस्टेरॉनची पातळी कमी झाल्यास वजन कमी करणे कठीण होते. टेस्टोस्टेरॉन रिप्लेसमेंट इंजेक्शन्स घेतलेल्या पुरुषांचा अभ्यास करण्यासाठी ११ वर्षांपर्यंत संशोधन करण्यात आले. त्यातून असे स्पष्ट झाले की, त्यांच्या शरीराचे वजन सरासरी २० टक्के कमी झाले होते.

Read More News On Vinesh Phogat: विनेश फोगटप्रमाणे एका रात्रीत २ ते ३ किलो वजन कमी करण्याचा प्रयत्न केल्यास शरीरावर काय परिणाम होतात? आरोग्यतज्ज्ञांचे उत्तर वाचाच…

२) शरीररचना :

पुरुषांची शरीरयष्ठी महिलांच्या शरीरा इतकी फॅटी नसते. पण, महिलांच्या शरीरात पुरुषांपेक्षा जास्त फॅट असते. पुरुषांमध्ये छाती आणि ओटीपोटाच्या आजूबाजूला अॅडिपोज टिश्यू जमा होण्याची अधिक शक्यता असते, तर महिलांमध्ये सामान्यत: नितंब आणि मांड्यांभोवती अॅडिपोज टिश्यू जमा होतात. त्यामुळे महिलांमध्ये हे दोन अवयव अधिक जाड दिसू लागतात.

३) हार्मोन्समधील चढ-उतार :

हार्मोन्स हा शरीरातील महत्त्वाच्या विविध कार्यांसाठी जबाबदार घटक असतो. त्यात स्नायूंचे आरोग्य जपण्यासह शरीरातील चरबी कमी करणे, ताणतणाव व्यवस्थापन व भुकेशी सामना करण्याची क्षमता समाविष्ट असते. परिणामी जेव्हा हार्मोन्सची पातळी असंतुलित होते, तेव्हा वजन कमी करणे अधिक कठीण होते.

कपूर पुढे म्हणाल्या की, पुरुषांपेक्षा महिलांच्या शरीरात सर्वाधिक चरबी जमा होते. परंतु, हे त्यांच्या शरीररचनेमुळे होते; अतिरिक्त वजनामुळे नाही. जर एखाद्या महिलेच्या शरीरात पुरुषापेक्षा ११ टक्के जास्त चरबी आहे. याचा अर्थ ती जाडी किंवा लठ्ठ आहे, असे म्हणता येणार नाही. कारण- महिलांची शारीरिक स्थिती जरी योग्य असली तरी त्यांच्या शरीरात पुरुषांपेक्षा सहा ते ११ टक्के जास्त चरबी असते.