सध्या प्रत्येक व्यक्तीचे जीवन हे खूप धावपळीचे बनले आहे. त्यामुळे प्रत्येक जण हल्ली कोणत्या ना कोणत्या तणावाचा सामना करत असतो. प्रत्येकाच्या आयुष्यात अडचणी येत असतात. त्यामुळे तणाव येणे सहाजिकच आहे. जेवणाच्या वेळा बदलल्या आहेत. म्हणजेच बदलत्या जीवनशैलीमुळे तणाव हा आपला जीवनाचा एक भाग बनला आहे. रोजच्या जीवनात थोडासा ताण येणे आवश्यक असले तरी तुम्हाला असलेल्या तणावाचे आपल्या शारीरिक आणि मानसिक आरोग्यावर अल्पकालीन आणि दीर्घकालीन परिणाम होण्याची शक्यता असते. आपल्याला येत असलेल्या किंवा आलेल्या तणावाचा सामना करण्यासाठी कधी कधी लोक आरोग्याला फायदेशीर नसणाऱ्या गोष्टींचा अवलंब करतात. ज्यामुळे फायदा तर नाहीच, पण नुकसान होण्याची शक्यता वाढते. जर तुम्ही तणावात आहात आणि तरीसुद्धा तुम्हाला आवडेल तेच अन्न खायची इच्छा होत असेल तर या इच्छेला तज्ज्ञ स्ट्रेस इटिंग असे म्हणतात. हेही वाचा : Weight: ऑलिव्ह ऑइलच्या अतिसेवनामुळे वजन वाढू शकतं? वाचा डॉक्टर काय सांगतात तणावामध्ये असतानादेखील खाण्यापिण्याच्या चुकीच्या पद्धती अवलंबवणे, नेहमीपेक्षा जास्त प्रमाणात अन्नाचे सेवन करणे अशा कारणांमुळे पचनाच्या समस्या आणि वजनदेखील वाढू शकते. या समस्यांचे निराकरण करण्यासाठी पोषणतज्ज्ञ ऋजुता दिवेकर यांनी इन्स्टाग्रामवर एका व्हिडीओमध्ये तीन खाद्यपदार्थांबद्दल सांगितले आहे. तुम्ही तणावात असताना या पदार्थांचे सेवन करू शकता. आरोग्याला फायदेशीर नसणारे पदार्थ खाण्यापेक्षा ज्यामध्ये साखर आणि कर्बोदकांचे प्रमाण जास्त असेल अशा पदार्थांचे सेवन करावे. शेंगदाणे शेंगदाण्यांमध्ये व्हिटॅमिन बी ६ आणि मॅग्नेशिअम हे घटक असतात. शेंगदाण्याचे सेवन हे दुपारच्या वेळेत नाश्ता म्हणून करण्याचा सल्ला दिला जातो. काजू काजू हा एक ड्रायफ्रुट्सचा प्रकार आहे. हा एक असा पदार्थ आहे, जो तुम्ही तुमच्या स्वयंपाकघरात तसेच बाहेर जाताना जवळ ठेवला पाहिजे. तुम्हाला एकदम सुस्त झाल्यासारखे वाटत असेल तेव्हा लोह आणि मॅग्नेशियमने भरपूर असलेले काजू तुम्हाला फायदेशीर ठरू शकतात. झोपण्यापूर्वी काजू हे दुधासह खाण्याचा सल्ला दिला जातो. सुके खोबरे सुक्या नारळाचे (खोबऱ्याचे) सेवन केल्यास तुम्हाला ताणतणाव नियंत्रित करण्यास मदत होते. सुक्या नारळात लॉरिक अॅसिड असते, ज्यामुळे तुमच्या केसांचे आणि त्वचेचे आरोग्य सुधारण्यास मदत होते. याचे सेवन तुम्ही गुळासह किंवा दुपारच्या जेवणामध्ये चटणीच्या रूपातदेखील करू शकता. https://www.instagram.com/reel/CxUrI4ssdnB/?utm_source=ig_embed&ig_rid=1f1e1975-db09-4fbb-8cd3-2db9c171fc37 हेही वाचा : नाशपती खा, वजन कमी करण्यापासून रक्तदाब नियंत्रित ठेवण्यापर्यंत मिळतील हे फायदे; वाचा, तज्ज्ञ काय सांगतात… तणाव दूर करण्यासाठी आपल्या आहारामध्ये संतुलित आहाराचा समावेश करणे अत्यंत आवश्यक आहे, असे मुंबईच्या पवई येथे असणाऱ्या डॉ. एलएच हिरानंदानी हॉस्पिटलमधील मुख्य आहारतज्ज्ञ ऋचा आनंद यांनी सांगितले. ''असे अनेक पदार्थ आहेत, जे तणाव कमी करण्यासही जोडले गेलेले आहेत. ओमेगा ३ फॅटी अॅसिड हे मेंदूच्या कार्यामध्ये मदत करणे आणि तणाव कमी करण्यासाठी ओळखले जाते. हे अॅसिड सॅल्मन, मॅकरेल आणि ट्राउट यांसारख्या फॅटी माशांमध्ये तसेच अक्रोड आणि जवसाच्या बियांमध्ये मोठ्या प्रमाणात आढळते'', असे ऋचा आनंद म्हणाल्या. याबाबतचे वृत्त The Indian Express ने दिले आहे. तसेच याशिवाय रोजच्या आहारामध्ये पालेभाज्या आणि बेरी पदार्थांचा समावेश करण्याचा सल्ला ऋचा आनंद यांनी दिला आहे. या पदार्थांमध्ये मोठ्या प्रमाणात व्हिटॅमिन आणि अँटिऑक्सिडंट्स आढळून येते. यामुळे तणाव आणि नकारात्मक परिणामांशी लढण्यासाठी मदत होऊ शकते. नट्स, बिया आणि डार्क चॉकलेट यांसारखे भरपूर मॅग्नेशिअम असलेले पदार्थदेखील आहारात समाविष्ट करण्याचा सल्ला दिला जातो. काळजीपूर्वक आणि सावकाशपणे अन्नाचे सेवन करणे, विचारपूर्वक योग्य आहार निवडणे आणि जेवणावर लक्ष केंद्रित करणे तसेच हळूहळू चावून खाणे यामुळे पचनक्रिया सुधारते, असे शालिमार बाग येथील फोर्टिस हॉस्पिटलमधील युनिट हेड, डायटेटिक्स (Dietetics) असणाऱ्या श्वेता गुप्ता यांनी नमूद केले. '' आरोग्य चांगले राहण्यासाठी आपला वैयक्तिक आहार कसा असावा, यासाठी पोषणतज्ज्ञ आणि आहारतज्ज्ञांचा सल्ला घेणेदेखील फायदेशीर ठरते'', असे श्वेता गुप्ता म्हणाल्या.