पुणे : आरोग्याच्या अनेक समस्या उद्भवत आहेत. कर्करोग, प्रजननामधील समस्या आणि लहान मुलांमध्ये लठ्ठपणा असे धोके दुणावत असल्याचे निरीक्षण तज्ञांकडून नोंदवण्यात येत आहे. या पार्श्वभूमीवर मिशन सिटी चक्रच्या वतीने मुलांनी स्टीलचा डब्बा वापरावा म्हणून पुण्यातील शाळांमध्ये प्रयत्न करण्यात येत आहे.

‘मिशन सिटी चक्र’च्या माध्यमातून ४ फेब्रुवारीला पुण्यातील शाळांमध्ये प्लॅस्टिकचे डबे न वापरता स्टीलचे डबे वापरण्याची प्रतिज्ञा घेण्यात येणार आहे. या उपक्रमात आतापर्यंत १२ हजारांहून अधिक विद्यार्थ्यांनी प्लास्टिकचा डब्बा न वापरण्याचा संकल्प केला आहे.

या प्रतिज्ञेत सहभागी होण्यासाठी २ फेब्रुवारीपर्यंत गुगल फॉर्मद्वारे नोंदणी करता येणार आहे. (लिंक -https://forms.gle/Mqcs9vJB39fbmvXbA ) विद्यार्थ्यांच्या प्रतिज्ञेचा हा उपक्रम गिनीज बुक ऑफ वर्ल्डमध्ये नोंदवण्यासाठी प्रयत्नशील असून, अधिक माहितीसाठी https://missioncitychakra.com/schools-children/steel-tiffin-day-in-pune-a-student-pledge-for-a-zero-waste-future/ या संकेतस्थळावर संपर्क साधण्याचे आवाहन मिशन सिटी चक्रच्या प्रमुख अदिती देवधर यांनी निवेदनाद्वारे केले आहे.

‘किमान जेथे शक्य आहे, तेथे प्लॅस्टिकचा वापर टाळूया. स्वच्छ, सुंदर शहरासाठी हे पहिले पाऊल उचलू, नवीन डबा घेऊ तेव्हा संपूर्ण स्टीलचाच डब्बा आणू,’ अशी प्रतिज्ञा विद्यार्थी घेणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. दरम्यान, मिशन सिटी चक्राच्या माध्यमातून प्लास्टिकच्या वापराबाबत जनजागृती करण्यात येत आहे. आतापर्यंत सिटी चक्रच्या माध्यमातून ६० हजार विद्यार्थी जोडले गेले असून, विविध शाळांमध्ये विद्यार्थ्यांच्या सवयी बदलाव्यात आणि दैनंदिन जीवनातला प्लास्टिकचा वापर कमी व्हावा म्हणून प्रयत्न करण्यात येत आहेत.

‘प्लॅस्टिकचा डबा का वापरू नये ?’

प्लॅस्टिकमध्ये बरीच रसायने वापरली जातात. या रसायनांचा अंश डब्यात ठेवलेल्या अन्नात मिसळतो. अन्न गरम असेल, तर हे प्रमाण जास्त असते. त्यातल्या काही रसायनांमुळे कर्करोगाचा धोका निर्माण होतो, तर शरीरातील हार्मोन्सचा समतोल बिघडण्यालाही ती कारणीभूत ठरू शकतात. प्लास्टिकमध्ये असणाऱ्या काही रसायनांमुळे प्रजननाच्या समस्या निर्माण होत असून, काही रसायने ही लहान बाळांमध्ये मेंदूच्या विकासात अडथळा निर्माण करणारी आहेत. त्यामुळे प्लास्टिकचे डब्बे न वापरण्याचे आवाहन करण्यात येत असल्याचे मिशन सिटी चक्रकडून सांगण्यात आले.

सध्या बाजारात ‘बीपीए फ्री’ लेबल असलेले प्लॅस्टिकचे डबे विकले जातात. प्लास्टिकचे आवरण कडक आणि पारदर्शक होण्यासाठी ‘बीपीए’ रसायन वापरले जाते. आता ‘बीपीए’च्या ऐवजी वापरली जाणारी बीपीएस, बीपीएफ या रसायनांचा वापरही तितकाच घातक असल्याचे निरीक्षण नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ हेल्थने नोंदवले आहे. प्रजननाच्या समस्यांबरोबरच सोबत लहान मुलांमध्ये लठ्ठपणाची समस्या उद्भवण्यासाठी हीच रसायनि कारणीभूत ठरतात. तसेच कर्करोगाचा धोकाही प्लास्टिकमुळे दुणावत असल्याचेही संस्थेच्या संकेतस्थळावर नमूद करण्यात आले आहे. प्लॅस्टिकचा काही प्रमाणात पुनर्वापर होतो. मात्र, पुनर्वापराच्या प्रक्रियेतून तयार होणारे प्लॅस्टिक हलक्या दर्जाचे असते. त्यामुळे पुनर्वापरही प्लास्टिक समस्येवर कायमस्वरूपी पर्याय नसल्याचे मत तज्ज्ञांनी नोंदवले आहे.

‘स्टीलच्या डब्याला प्लास्टिकचे झाकणही नको’

अन्न स्टीलच्या संपर्कात असते, प्लॅस्टिकच्या नाही. त्यामुळे हा डब्बा प्लॅस्टिकच्या डब्यासारखा आरोग्यासाठी घातक ठरत नाही. मात्र, त्यातही प्लॅस्टिक आहेच आणि शेवटी ते कचराच ठरते. प्लॅस्टिकमध्ये असणारी रसायने घातक असतात.

शिवाय प्लॅस्टिक आणि स्टील हे दोन भिन्न पदार्थ एकत्र असल्याने त्याच्या पुनर्वापराची शक्यताही धूसर होते. पुनर्वापरासाठी प्लॅस्टिक आणि स्टील वेगवेगळे करावे लागते. त्यामुळे अतिरिक्त कष्ट वाढतात आणि पुनर्वापराची शक्यता कमी होते. त्यातही प्लॅस्टिकचा पुनर्वापर केवळ दोन किंवा तीन वेळा करतो येतो. त्यानंतर ते प्लॅस्टिक कचराच ठरते. प्लॅस्टिकचे विघटन होत नाही. मात्र, त्याचे लहान- लहान तुकडे होत जातात. तिळापेक्षाही लहान तुकडे झाले, की त्याला मायक्रोप्लॅस्टिक म्हणतात.

सध्या हे मायक्रोप्लॅस्टिक माती, ओढे, नदी, समुद्र सगळीकडेच पसरते आहे. ते अन्न साखळीत आले असून, आपल्या भाजीपाल्यात, अन्न-धान्यात, पाण्यात, जेवणाच्या ताटातही या प्लास्टिकचा शिरकाव झाला आहे. हे मायक्रोप्लॅस्टिक अन्न, पाणी आणि हवेतून दररोज आपल्या शरीरात प्रवेश करत आहे. अशा प्रकारे आठवडाभरात शरीरात जमा होणारे मायक्रोप्लास्टीक एकत्र केले, तर एक क्रेडिट कार्ड तयार होईल. एकदा का प्लॅस्टिकच्या वस्तू निर्माण झाल्या की, हे दुष्टचक्र सुरू होते. त्यामुळे प्लास्टिकचा वापर पूर्णपणे बंद करणे, हाच या समस्येवरचा उपाय आहे. प्लॅस्टिकचे झाकण असलेला स्टीलचा डब्बाही न वापरण्याचे आवाहन मिशन सिटी चक्रकडून करण्यात आले आहे.

‘प्लास्टिक टाळा, स्टीलचा डब्बा वापरा’

स्टीलचा डबा खूप काळ टिकतो, अनेक वर्षे वापरता येतो. स्टीलच्या डब्यातून कुठलेही घातक रसायन अन्नात मिसळत नाहीत. स्टीलचा पुनर्वापर शक्य आहे. ते कितीही वेळा वापरता येते.

नव्याने तयार केलेले स्टील आणि रीसायकल केलेले स्टील यांचा दर्जाही सारखाच असतो. पुनर्वापराच्या प्रक्रियेमुळे स्टीलचा दर्जा खालावत नाही. स्टीलच्या पुनर्वापरामुळे ७५% ऊर्जेची बचत होते. स्टीलच्या डब्यामुळे कचऱ्यात भर पडत नाही, पैशांची बचत होते. शाळेत आणलेला डबा, मुले पुढे कॉलेज आणि ऑफिसलाही वापरू शकतात. मुलंच काय, मुलांची मुलंही तो डबा वापरतील कारण स्टीलच्या डब्याला काहीच होत नाही. आपल्या आणि निसर्गाच्या आरोग्यासाठी स्टीलचा डबा वापरू, असे आवाहन संस्थेकडून करण्यात आले आहे.

प्लास्टिकचा डबा कोणत्याही परिस्थितीत आरोग्यासाठी हानिकारकच. त्यातल्या रसायनामुळे अनेक प्रकारच्या समस्या निर्माण होतात. वेगवेगळे आजार उद्भवतात. त्यामुळे काचेच्या किंवा स्टीलच्या डब्याचा वापर करायला हवा. – डॉ. व्ही. जी. भापकर