Painkiller Side Effects On Kidney : एखाद्या रुग्णाचा वैद्यकीय अहवाल पाहून जेव्हा हे स्पष्ट होते की, केवळ एका चुकीच्या सवयीमुळे त्याचे आयुष्य कायमचे बदलले आहे, तेव्हा एका नेफ्रोलॉजिस्ट (मूत्रपिंड विकारतज्ज्ञ) म्हणून तो प्रसंग अत्यंत वेदनादायी असतो. तिरुवन्नमलाई येथील ४९ वर्षीय शेतकरी ‘श्री एस’ जेव्हा दवाखान्यात आले, तेव्हा असाच प्रकार समोर आला. त्यांना सतत थकवा, मळमळ, उलट्या, श्वास घेण्यास त्रास आणि पायांना सूज येण्याची समस्या होती. थोड्या उपचारांनी बरे होऊन पुन्हा शेतात कामाला जाता येईल अशी त्यांची अपेक्षा होती.

परंतु, त्यांच्या रक्ताच्या चाचणीचे अहवाल अत्यंत चिंताजनक आले. त्यांच्या रक्तातील ‘क्रिएटीनीन’चे प्रमाण ११.४ mg/dL वर पोहोचले होते (सामान्यतः हे प्रमाण १.२ mg/dL च्या आसपास असावे लागते). सोनोग्राफी अहवालात दोन्ही किडन्यांचे आकारमान लहान झाल्याचे आणि त्या गंभीररीत्या खराब झाल्याचे दिसून आले. किडन्या निकामी होण्याच्या शेवटच्या टप्प्यावर (End-stage kidney disease) रुग्ण पोहोचला होता आणि त्यांना तातडीने डायालिसिस सुरू करण्याची गरज होती.

विशेष म्हणजे, त्यांना मधुमेह किंवा उच्च रक्तदाबाचा कोणताही इतिहास नव्हता—जे सहसा किडन्या खराब होण्यास कारणीभूत ठरतात. यामुळे डॉक्टरांनी त्यांच्या रोजच्या रुटीनची अधिक चौकशी केली. तेव्हा त्यांनी खिशातून एका वेदनाशामक गोळ्यांची उघडी पट्टी बाहेर काढली, ज्याला ते स्थानिक भाषेत “वली माथिराई” (दुखण्यावरची गोळी) म्हणायचे.

५ वर्षे डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय पेनकिलर्सचा वापर

शेतातील शारीरिक कष्टाच्या कामातून होणारा त्रास सहन करण्यासाठी श्री एस गेल्या ५ वर्षांपासून या गोळ्या घेत होते. कडक उन्हात १०-१० तास भात लावणीचे काम करताना त्यांना प्रचंड घाम यायचा, शरीरातील पाणी कमी व्हायचे (डिहायड्रेशन) आणि पाठीत व अंगात तीव्र वेदना व्हायच्या. अशा वेळी विश्रांती घेणे किंवा डॉक्टरांचा सल्ला घेण्याऐवजी ते स्थानिक मेडिकलमधून स्वतःच पेनकिलर्स विकत घेऊन खायचे. या गोळ्यांमध्ये ‘डाइक्लोफेनाक’ (Diclofenac) आणि ‘एसिक्लोफेनाक’ (Aceclofenac) या ‘NSAIDs’ गटातील औषधांचा समावेश होता.

वेदनाशामक औषधे मुळात पूर्णपणे घातक नसतात. मात्र, डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय, प्रमाणाबाहेर आणि सतत वापर केल्यास—विशेषतः शरीरात पाण्याचे प्रमाण कमी असताना—ती किडन्यांवर गंभीर परिणाम करतात.

पेनकिलर्स किडन्यांसाठी धोकादायक का ठरतात?

आपल्या किडन्या शरीरातील रक्त शुद्ध करण्याचे, टाकाऊ पदार्थ व अतिरिक्त द्रव बाहेर टाकण्याचे काम करतात. यासाठी किडन्यांना सतत रक्ताचा सुरळीत पुरवठा आवश्यक असतो. जेव्हा शरीरात पाण्याचे प्रमाण कमी होते, तेव्हा किडन्यांना होणारा रक्तपुरवठा टिकवून ठेवण्यासाठी शरीरात एक नैसर्गिक संरक्षक यंत्रणा कार्य करते.

परंतु, NSAIDs गटातील पेनकिलर्स या नैसर्गिक यंत्रणेत अडथळा निर्माण करतात. उन्हात सतत काम करून आधीच डिहायड्रेशन झालेल्या व्यक्तीने अशा गोळ्या घेतल्यास किडन्यांवर प्रचंड ताण येतो. सतत आणि जास्त प्रमाणात गोळ्या घेतल्यास हा धोका अधिक वाढतो.

यामुळे काही वेळा किडन्या अचानक काम करणे बंद करू शकतात (Acute Kidney Injury). अशी दुखापत वारंवार झाल्यास पुढे जाऊन किडन्या कायमच्या निकामी होतात.

डिहायड्रेशनमुळे धोका का वाढतो?

प्रचंड घाम आल्यावर पुरेशा प्रमाणात पाणी न प्यायल्यास किडन्यांपर्यंत पोहोचणाऱ्या रक्ताचे प्रमाण घटते. शेतमजूर, बांधकाम कामगार, डिलिव्हरी बॉईज आणि उन्हात काम करणाऱ्या कामगारांना याचा सर्वाधिक धोका असतो.

पेनकिलर्समुळे न कळत होणारे शरीराचे नुकसान

किडनी खराब होत असताना त्याची लक्षणे लगेच तीव्रतेने दिसून येत नाहीत. रुग्ण सामान्यपणे काम करत राहतो, पण आतून किडन्या हळूहळू खराब होत असतात. जेव्हा थकवा, पायांवर किंवा चेहऱ्यावर सूज, लघवीचे प्रमाण कमी होणे, श्वास गुदमरणे, मळमळ किंवा भूक न लागणे अशी लक्षणे दिसतात, तोपर्यंत किडन्यांचे बरेच नुकसान झालेले असते.

कोणी जास्त काळजी घेतली पाहिजे?

  • ज्यांना आधीच किडनीचे आजार आहेत.
  • ज्येष्ठ नागरिक तसेच मधुमेह, उच्च रक्तदाब किंवा हृदयाचे आजार असलेले रुग्ण.
  • शरीरात पाण्याचे प्रमाण कमी असणाऱ्या व्यक्ती.

अनेकदा लोक दोन वेगवेगळ्या नावांच्या गोळ्या एकत्र घेतात, परंतु त्यात एकच घटक असतो, त्यामुळे प्रमाणापेक्षा जास्त औषध पोटात जाते म्हणूनच तुम्ही घेत असलेल्या सर्व गोळ्यांची माहिती डॉक्टरांना किंवा फार्मसिस्टला असणे अत्यंत गरजेचे आहे.

लक्षणे आणि खबरदारी

दररोज वेदनाशामक गोळ्या घेतल्याशिवाय काम होत नसेल तर त्वरित डॉक्टरांशी संपर्क साधा. पायावर सूज, लघवीत बदल, सतत थकवा किंवा श्वास घेण्यास त्रास या लक्षणांकडे दुर्लक्ष करू नका. रक्तातील क्रिएटीनीन आणि लघवीची चाचणी करून किडनीचे आरोग्य सहज तपासता येते.

पेनकिलर्सबद्दल भीती बाळगण्याची गरज नाही; योग्य आजारासाठी, योग्य प्रमाणात आणि डॉक्टरांच्या सल्ल्याने घेतलेली औषधे सुरक्षित असतात. पण, त्यांना रोजच्या साध्या गोळ्यांसारखे वापरणे जीवावर बेतू शकते.