Prevention Is Better Than Cure: बहुतेक लोक जाणीवपूर्वक आरोग्याकडे दुर्लक्ष करत नाहीत, तर धावपळीच्या जीवनात ते मागे पडते. कामाचा ताण, कौटुंबिक जबाबदाऱ्या आणि किरकोळ वाटणाऱ्या शारीरिक तक्रारींना ‘काही गंभीर नाही’ म्हणून दुर्लक्षित केले जाते. मात्र, सत्य हे आहे की अनेक गंभीर आजार सुरुवातीला कोणतीही मोठी लक्षणे न दाखवता शरीरात शांतपणे पाय पसरतात. म्हणूनच, प्रतिबंध (Prevention) हे केवळ एक ब्रीदवाक्य नसून ती एक जीवनशैली बनणे आवश्यक आहे.
आजार होण्यापूर्वीच रोखणे ही काळाची गरज
आरोग्य क्षेत्रात आता मोठा बदल होत आहे. केवळ आजार झाल्यावर उपचार करण्यापेक्षा (Curative), तो होऊच नये यासाठी प्रयत्न करण्यावर (Preventive) भर दिला जात आहे. डॉ. (कर्नल) विजय दत्ता यांच्या मते, “आज आरोग्य सेवा ही उपचारात्मक आरोग्य सेवेकडून प्रतिबंधात्मक आरोग्य सेवेकडे वळत आहे.” भारत सरकारच्या आरोग्य मंत्रालयाचा अहवालही हेच सांगतो की, डायबिटीज आणि हृदयविकारांसारख्या असंसर्गजन्य रोगांचा धोका वाढत आहे, जो वेळीच निदानाने कमी करता येतो.
‘सायलेंट’ आजारांचा धोका
अनेक आजार सुरुवातीला कोणतीही लक्षणे दाखवत नाहीत. डॉ. जगदीश चंदर स्पष्ट करतात की, “कॅन्सर, हर्निया, पित्ताशयाचे खडे आणि पचनसंस्थेशी संबंधित विकार सुरुवातीला लक्षणे विरहित असतात.” जेव्हा लक्षणे दिसू लागतात, तेव्हा कदाचित आजार बळावलेला असतो. त्यामुळे नियमित तपासणी (Screening) हाच या छुप्या शत्रूंना ओळखण्याचा एकमेव मार्ग आहे.
वयाची चाळीशी आणि कौटुंबिक इतिहास
तज्ज्ञांच्या मते, ज्यांचे वय ४० पेक्षा जास्त आहे किंवा ज्यांच्या कुटुंबात मधुमेह, हृदयविकार किंवा कॅन्सरचा इतिहास आहे, त्यांनी अधिक सावध राहणे गरजेचे आहे. डॉ. सत्यनारायण म्हैसूर यांच्या मते, “नियमित तपासणीमुळे केवळ डायबिटीज किंवा रक्तदाबच नाही, तर प्रोस्टेट किंवा स्तनाच्या समस्यांचेही वेळेत निदान होऊ शकते. इतकेच नाही तर तरुण रुग्णांमधील हृदयविकाराचा धोका ओळखून तो टाळता येऊ शकतो.”
प्रतिबंधाचे फायदे: कमी खर्च आणि उत्तम आरोग्य
लवकर निदान झाल्यास उपचार सोपे आणि कमी वेदनादायी असतात.
- तज्ज्ञांच्या मते, “वेळेत निदान झाल्यामुळे अनेकदा शस्त्रक्रिया टाळता येते आणि रुग्ण लवकर बरा होतो.”
- यामुळे रुग्णालयातील फेऱ्या कमी होतात आणि उपचारांचा आर्थिक भारही कमी होतो.
केवळ चाचण्या म्हणजे प्रतिबंध नव्हे
डॉ. विजय दत्ता यांच्या मते, प्रतिबंधात्मक आरोग्यामध्ये केवळ वैद्यकीय चाचण्यांचा समावेश नसून जीवनशैलीचाही मोठा वाटा आहे:
- समतोल आहार: घाईघाईत खाणे टाळा.
- नियमित व्यायाम: दिवसातून किमान ३० मिनिटे चालणे.
- व्यसनमुक्ती: तंबाखू आणि अल्कोहोलपासून दूर राहणे.
- मानसिक आरोग्य: पुरेशी झोप आणि तणाव व्यवस्थापन.
