Priyanka Chopra Eggs Freezing : प्रियांका चोप्राने डेक्स शेफर्डचा पॉडकास्ट शो ‘आर्मचेयर एक्स्पर्ट’मध्ये आपल्या आयुष्यातील एका महत्त्वाच्या निर्णयाचा खुलासा केला होता. प्रियांकाने सांगितले की, “मी माझ्या ३० व्या वर्षी बीजांडे गोठवली (Eggs Freeze) होती. मला मुले हवी होती पण करिअरवरही लक्ष केंद्रित करायचे होते. अशा परिस्थितीत वाढत्या वयाचा माझ्या बीजांडांच्या वाढीवर परिणाम होईल याची चिंता असायची. पण बीजांडे गोठवल्याने मला खूप फायदा झाला.” इतकेच नव्हे तर प्रियांकाने इतर महिलांनासुद्धा सल्ला देत सांगितले की, ‘एखाद्या सणाला तुम्ही कार खरेदी करू नका, महागड्या वस्तू खरेदी करू नका, पण तुमचे बीजांड गोठवून घ्या.’ पण बीजांडे गोठवणे म्हणजे काय व तुमच्यासाठी हे कसे योग्य ठरू शकते हे माहिती आहे का? चला पाहू या तज्ज्ञ काय सांगतात…
बीजांडे फ्रीझिंग म्हणजे काय? (What Is Freezing Eggs)
प्रजननक्षमता-संरक्षण हे एक विस्तृत क्षेत्र आहे. करिअर किंवा अन्य प्राधान्य द्यायच्या गोष्टी डोळ्यासमोर असताना तुम्हाला बाळंतपण पुढे ढकलण्यासाठी बीजांडे फ्रीझ करण्याचा पर्याय मदत करू शकतो. तज्ज्ञ सांगतात की, जेव्हा एखादी स्त्री बाळाला जन्म देण्यासाठी शारीरिक किंवा मानसिकदृष्ट्या तयार नसते तेव्हा बीजांडे गोठवणे ही एक प्रक्रिया पर्याय ठरते. यास oocyte cryopreservation देखील म्हणतात, बीजांडे गोठविण्यामुळे स्त्रीचे बीज तरुणपणीच जतन केले जाते. त्यामुळे जेव्हा ती गर्भधारणेसाठी तयार असेल तेव्हा वय कितीही असले तरी बीजांडांची गुणवत्ता ही तारुण्यातील क्षमतेप्रमाणेच असेल.




महिला बीजांड फ्रीझिंग का निवडतात? (Why Women Opt For Freezing Eggs)
प्रत्येक महिलेच्या शरीरात जन्मतःच एका विशिष्ट संख्येत बीजांडे असतात. साधारणतः महिलेच्या अंडाशयात सुमारे चार लाख बीजांडे असतात. जसजसे तिचे वय वाढत जाते तसतशी अंड्यांची संख्या कमी होत जाते. प्रत्येक मासिक पाळीत जवळजवळ १०० -२०० बीजांडे दर महिन्याला संपतात.
जेव्हा ती रजोनिवृत्तीच्या वयात पोहोचते, तेव्हा उत्तम गुणवत्ता असणारी बीजांडे आधीच गमावलेली असतात व साधारणपणे शरीरात १००० ते २००० बीजांडे उरतात, जी गर्भधारणेसाठी योग्य ठरत नाहीत. डॉ. सुनील ईश्वर, लेप्रोस्कोपिक सर्जन, अॅस्टर आरव्ही हॉस्पिटल यांनी ‘इंडिया टुडे’ला दिलेल्या माहितीनुसार, विशेषतः वयाच्या पस्तिशीनंतर गर्भधारणा होणे थोडे कठीण होते. कारण वाढत्या वयाबरोबर oocytes ची गुणवत्ता आणि संख्या कमी होते ज्यामुळे गर्भधारणेच्या शक्यतांवर परिणाम होतो.
बीजांडे गोठविण्याचे फायदे काय आहेत? (Benefits of Freezing Eggs)
डॉक्टर सांगतात की, “अलीकडे वंध्यत्वाची प्रकरणेसुद्धा वाढत आहेत, यानुसार, लहान वयातच बीजांडे गोठविणे ही एक उत्तम कल्पना आहे, जेणेकरून गर्भाचे आनुवंशिक घटक आणि मुलाचे आनुवंशिक घटक चांगले राहतील. उदाहरणार्थ, जर तुम्ही तुमची बीजांडे २८ व्या वर्षी गोठवली असतील आणि ३८ व्या वर्षी गरोदर होऊ इच्छित असाल, तर आनुवंशिक जोखीम किंवा गर्भधारणेचा धोका १० वर्षे कमी होतो. ही प्रक्रिया सुरक्षित आहे व IVF पेक्षाही अधिक परवडणारी आहे.”
बीजांडे गोठविणे सुरक्षित आहे का? (Is Eggs Freezing Safe)
बीजांडे गोठविण्यात काही आव्हाने आहेत, कारण ही प्रक्रिया जवळजवळ IVF (इन विट्रो फर्टिलायझेशन) सारखी आहे. जर एखाद्या महिलेने वयाच्या तिशीपूर्वी १० बीजांडे गोठवून घेतली तर त्यातील केवळ ४ ते ५ भविष्यात सुरक्षित राहतील अशी शक्यता असते. या प्रक्रियेमध्ये काही औषधे घेणे समाविष्ट असते. ही औषधे बीजांडे विकसित करण्यासाठी इंजेक्शनने दिली जातात. हे अॅनेस्थेशिया वापरून केले जाते.
“बीजांडे काढण्याची प्रक्रिया योनीमार्गातून केली जाते; परंतु जर स्त्री यासाठी तयार नसेल, तर आम्ही ही प्रक्रिया ओटीपोटाच्या भागातून करू शकतो. त्यामुळे, या प्रक्रियेत कोणतीही शस्त्रक्रिया समाविष्ट नाही. ही एक अतिशय सुरक्षित प्रक्रिया आहे. कोणत्याही टप्प्यावर महिलांना रुग्णालयात दाखल करावे लागत नाही,” असेही डॉक्टरांनी पुढे सांगितले.
हे ही वाचा<< भारती सिंहने खाण्यावर प्रचंड प्रेम असताना १५ किलो वजन कमी कसं केलं? फॅन्सना सांगितले ‘हे’ ४ सिक्रेट फंडे
बीजांडे गोठविण्याची योग्य वेळ कोणती आहे? (Ideal Time To Freeze Eggs)
विशीच्या उत्तरार्धात आणि तिशीच्या सुरुवातीस स्त्रियांनी त्यांची बीजांडे गोठविण्यास सुरुवात करणे आदर्श आहे, कारण पस्तिशीनंतर बाळंतपणाची गुंतागुंत होऊ शकते. भविष्यातील गर्भधारणेची शक्यता वाढविण्यासाठी स्त्रिया तरुण आणि ३५ वर्षांपेक्षा कमी वयाच्या असताना हे केले पाहिजे, परंतु वय वाढल्यानंतर गुणवत्ता घसरते आणि याचा परिणाम गर्भधारणेवर होतो.