Priyanka Chopra Hajmola : बॉलीवूडची देसी गर्ल प्रियांका चोप्रा जोनासने नुकताच कपिल शर्मासोबतच्या टॉक शोमध्ये खुलासा केला की पाचक म्हणून हाजमोला खाते आणि हाजमोलाच्या विविध प्रकारचे डब्बे ड्रॉवरमध्ये नेहमी असतात. प्रियांकाने तिचा पती निक जोनासने ते खाल्ल्यानंतर काय प्रतिक्रिया दिली याबाबतही सांगितले. तिच्याप्रमाणेच हाजमोला आणि अशा अनेक आयुर्वेदिक गोळ्या प्रत्येक भारतीयांचे आवडते ‘पाचक’ आहेत. भारतीय घरांमध्ये हा अनुभव नवा नाही. लग्नसमारंभात पचण्यास जड अन्न खाल्ल्यानंतर, स्ट्रीट फूड किंवा सणावारी पांरपरिक जेवण खाल्ल्यानंतर अनेक जणांना “पोट हलकं” करण्यासाठी अशा हर्बल गोळ्या घेतल्याशिवाय समाधान मिळत नाही. परंतु, गॅस्ट्रोएन्टेरोलॉजी आणि न्यूट्रिशन तज्ज्ञांचे मत यापेक्षा वेगळे आहे. त्यांचे स्पष्ट म्हणणे आहे की, “अशा गोळ्या प्रत्यक्षात “पाचक नव्हे तर पोटाला उत्तेजित करणाऱ्या आणि कधीकधी त्रासदायक ठरू शकतात.”
अनेक लोकांना, विशेषतः ज्यांना आम्लपित्त, रिफ्लक्स, इरिटेबल बोवेल सिंड्रोम किंवा संवेदनशील पोटाचा त्रास आहे, त्यांना पचनाची लक्षणे कमी होण्याऐवजी अधिकच वाढल्याचा अनुभव येतो.
‘डायजेस्टिव एड’ म्हणजे नेमकं काय? (What does Digestive Aid actually mean?)
वैद्यकीय दृष्टिकोनातून पाहिले तर खरे “पाचक” ही असे असते, जी पचन एन्झाइमची निर्मिती संतुलित करते, पित्तस्त्राव सुरळीत ठेवते, पोटाच्या हालचाली सुधारते, जडपणा किंवा पोटफुगी कमी करते आणि आतड्यांच्या आरोग्याला मदत करते. आले, बडीशेप, जिरे, ओवा, पेपरमिंट आणि प्रोबायोटिक्स ही त्याची उत्तम उदाहरणे मानली जातात. मात्र, हाजमोला किंवा तत्सम हर्बल गोळ्या यापेक्षा भिन्न प्रकारे कार्य करतात.
या गोळ्यांमध्ये नेमकं असतं तरी काय? (What’s really inside these herbal tablets?)
या गोळ्यांमध्ये सिट्रिक अॅसिड, आमचूर म्हणजे सुक्या आंब्याची पावडर, काळं मीठ, मसाले, तिखट, लवंग, आले आणि वेगवेगळे फ्लेव्हर एन्हान्सर्स यांचा समावेश असतो. हे मिश्रण जिभेवर तिखट, आंबट, खारट अशी तीव्र चव निर्माण करते. लोकांना त्यामुळे “पोटात काहीतरी चाललं आहे” अशी जाणीव होते. पण, ही क्रिया पचन सुधारल्यामुळे होत नाही तर फक्त पोटातील आम्लनिर्मिती वाढल्यामुळे होते.
लोकांना वाटतं ते पचन सुधारतं—पण खरं काय? (Why do people think these help digestion?)
या गोळ्या चवद्रियांना उत्तेजित करतात, लाळेचे स्राव वाढवतात आणि पोटात आम्लनिर्मिती वेगाने वाढवतात; त्यामुळे थोड्या वेळासाठी हलकेपणाची, आरामाची भावना निर्माण होते. पण, ही फक्त संवेदनात्मक ‘भावना’ असते. प्रत्यक्षात अनेकांच्या बाबतीत अतिरिक्त आम्ल आणि पोटाच्या समस्या वाढते, जे दीर्घकाळ हानिकारक ठरू शकते.
संवेदनशील पोट असणार्यांनी घ्यावी विशेष काळजी (Who should be cautious?)
आम्लपित्त, अॅसिडिटी, जीईआरडी, गॅस्ट्रायटिस, पोटातील अल्सर, IBS असणारे रुग्ण किंवा वारंवार पित्ताने त्रासणारे लोक अशा गोळ्यांमुळे अधिक त्रस्त होऊ शकतात. पोटातील जळजळ, उलट्या, मळमळ, शौच सैल होणे, पोटात फुगणे असे त्रास निर्माण होऊ शकतात. जास्त मिठामुळे रक्तदाब वाढण्याचाही धोका असतो. वारंवार सेवन केल्यास डिहायड्रेशन आणि इलेक्ट्रोलाइट संतुलन बिघडण्याची शक्यता नाकारता येत नाही.
खरा प्रश्न – पोट बिघडतंच का? (Do these pills solve real digestive problems?)
बहुतेक पचनाच्या समस्या या जास्त खाणे, जलद खाणे, विरुद्ध आहार खाणे, खराब सूक्ष्मजीवांचा गट, कमी एन्झाइम निर्मितीमुळे होतात. पण, या हर्बल गोळ्या ना एन्झाइम सुधारतात, ना आतड्याचे आरोग्य सुधारते, ना आतड्यांची ताकद वाढवते. त्यामुळे या गोष्टी क्षणिक आराम देतात, पण मूळ समस्या सोडवत नाहीत.
सोपे आणि सुरक्षित पर्याय काय? (Better and safer alternatives)
जेवणानंतर बडीशेप खाणे, ओवा पाणी, आले चहा, ताकात भाजलेले जिरे, दही, प्रोबायोटिक्स यांसारखे नैसर्गिक उपाय पचनाला सौम्य आणि सकारात्मक मदत करतात. हे उपाय पोटाला शांत ठेवतात आणि आतड्यांचे आरोग्य सुधारतात.
हर्बल डायजेस्टिव्ह गोळ्या चवीला खमंग आणि आकर्षक नक्की असतात, पण त्या “उपचारात्मक” पेक्षा “उत्तेजक” जास्त आहेत, असे तज्ज्ञांचे स्पष्ट मत आहे. पचनासंबंधी आरोग्याबाबत निर्णय घेताना शरीराला शांत, संतुलित आणि नैसर्गिक मदत करणारे पर्याय निवडणे अधिक हितावह मानले जाते.
