Side Effects Of Drinking Too Much Tea: विनोदी अभिनयासाठी ओळखले जाणारे अभिनेते Rajpal Yadav पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत, मात्र यावेळी कारण आहे त्यांची एक वैयक्तिक सवय. त्यांच्या पत्नी Radha Yadav यांनी अलीकडेच दिलेल्या एका मुलाखतीत सांगितले की, राजपाल यादव दिवसाला तब्बल १२ ते १३ कप चहा पितात आणि अनेकदा भूक दाबण्यासाठी चहाचा वापर करतात. या सवयीवर आता आरोग्य तज्ज्ञांनी गंभीर चिंता व्यक्त केली आहे.
एका मुलाखतीत राधा यादव यांनी सांगितले की, “राजपाल भूक चहाने मारतात. दिवसाला १२–१३ कप होतात आणि रोज घरी चर्चा होते की, आता मी चहा सोडणार आहे.” भारतात चहा हा अनेकांच्या दैनंदिन जीवनाचा अविभाज्य भाग असला तरी, जेवणाऐवजी चहा घेणे ही सवय आरोग्यासाठी धोकादायक ठरू शकते, असे तज्ज्ञांचे मत आहे.
आर्टेमिस हॉस्पिटल्सच्या क्लिनिकल न्यूट्रिशन अँड डायटेटिक्स विभागाच्या हेड डॉ. शबाना परवीन यांनी दि इंडियन एक्सप्रेसशी या विषयावर बोलताना सांगितले की, “दिवसभरात १२–१३ कप चहा पिणे आणि तेसुद्धा भूक दाबण्यासाठी. ही सवय शरीराच्या नैसर्गिक मेटाबॉलिझममध्ये व्यत्यय आणू शकते.” कॅफिन तात्पुरते भूक कमी करू शकते, पण शरीराला आवश्यक असलेले प्रोटीन, फॅट्स आणि कार्बोहायड्रेट्स यांची पूर्तता चहातून होत नाही.
“दीर्घकाळ शरीराला पुरेसे पोषण मिळाले नाही तर मेटाबॉलिझम वाढण्याऐवजी मंदावतो. शरीर ‘कन्झर्वेशन मोड’मध्ये जाते, कारण त्याला आवश्यक इंधन मिळत नाही.” याशिवाय, जास्त प्रमाणात चहा पिण्याचा आणखी एक मोठा धोका म्हणजे पोषक तत्त्वांचे शोषण कमी होणे. “चहामधील टॅनिनमुळे आयर्नचे शोषण कमी होते, त्यामुळे थकवा आणि आयर्न डेफिशियन्सीचा धोका वाढतो,” असे डॉ. परवीन स्पष्ट करतात.
जेवणाऐवजी चहा घेतल्यास काय होते?
वजन कमी करण्यासाठी काहीजण जेवण टाळून चहा पिण्याचा पर्याय निवडतात. मात्र हा उपाय उलट आरोग्यास हानीकारक ठरू शकतो. डॉ. परवीन यांच्या मते, “जेवण स्किप करून चहा घेतल्यास शरीराला आयर्न, कॅल्शियम, प्रोटीन आणि व्हिटॅमिन B12 सारखी महत्त्वाची पोषकतत्त्वे मिळत नाहीत.”
या सवयीमुळे पुढील समस्या उद्भवू शकतात
- अॅनिमिया आणि सततचा थकवा
- रोगप्रतिकारक शक्ती कमी होणे
- त्वचा आणि केसांची खराब अवस्था
- स्नायू कमकुवत होणे
डॉ. परवीन सांगतात, “ही सवय आरोग्यदायी वजन नियंत्रणास मदत करत नाही, उलट पोषणातील असमतोल आणि उर्जेची अस्थिरता निर्माण करते.”
अतिरिक्त कॅफिनचेही दुष्परिणाम आहेत. जास्त चहा प्यायल्याने डिहायड्रेशन, अॅसिडिटी आणि झोपेचे विकार उद्भवू शकतात. याचा एकूण आरोग्यावर विपरीत परिणाम होतो.
दिवसाला किती चहा सुरक्षित?
“साधारणपणे दिवसाला २ ते ३ कप चहा सुरक्षित मानला जातो. मात्र हे व्यक्तीच्या कॅफिन सहनशक्ती आणि आरोग्यावर अवलंबून असते,” असे डॉ. परवीन सांगतात.
जर एखाद्याला जास्त चहा पिण्याची सवय असेल, तर ती अचानक सोडणे कठीण जाऊ शकते. अशावेळी हळूहळू सवय कमी करणे योग्य ठरते.
दर काही दिवसांनी एक कप चहा कमी करा
अतिरिक्त चहाऐवजी हर्बल टी, कोमट पाणी किंवा लिंबूपाणी घ्या. रिकाम्या पोटी चहा पिणे टाळा. “नियमित आणि पोषणयुक्त आहार घेतल्यास भूक नैसर्गिकरित्या नियंत्रित राहते आणि चहासारख्या उत्तेजकांवर अवलंबून राहण्याची गरज भासत नाही”, असे तज्ज्ञांनी सांगितले.
