Eggs, Overrated Health Food : अंडे हा आरोग्याच्या दृष्टीने अत्यंत पौष्टिक पदार्थ म्हणून ओळखला जातो. अंड्याला प्रोटीनचा मुख्य स्रोत मानले जाते, ज्यामध्ये अमिनो अॅसिड असतात. त्यामध्ये असलेल्या पोषक घटकामुळे अंडीला सूपरफूडही म्हणतात. पण काही लोकांच्या मते, विशेषत: एखादा दीर्घकालीन आजार, कोलेस्ट्रॉल किंवा इतर आजार असलेल्या लोकांच्या मते, अंड्यांना गरजेपेक्षा जास्त महत्त्व दिले जाते. याविषयी दी इंडियन एक्स्प्रेसने तज्ज्ञांच्या हवाल्याने सविस्तर माहिती जाणून घेतली.

नेमके प्रकरण काय?

फिटेलो येथील क्लिनिकल आहारतज्ज्ञ उमंग मल्होत्रा ​​यांनी दी इंडियन एक्स्प्रेसशी बोलताना सांगितले की, अंडी हा जगातील सर्वांत जास्त खाल्ला जाणारा आणि चर्चेत असलेला आरोग्यदायी पदार्थ आहे. ते सांगतात, “अंडी रोगजनकांना अन्न पुरवीत असल्याचा वाद प्रामुख्याने पारंपरिक वैद्यकीय पद्धतींपेक्षा वेगळ्या आरोग्य व्यवस्थापनाच्या पद्धतींचा अवलंब करणाऱ्यांच्या सिद्धांतांवरून निर्माण होतो. जे सांगतात की अंड्यातील काही घटक जसे की वाढ होणारे घटक आणि विशिष्ट प्रोटीन्स आतड्यांमध्ये हानिकारक जीवाणू, विषाणू किंवा यीस्टच्या वाढीस मदत करू शकतात,”
त्यांच्या मते, या दाव्याला विज्ञानाने पूर्णपणे पाठिंबा दिलेला नाही. “सामान्य आरोग्य परिस्थितीत अंड्याचे सेवन माणसाच्या शरीरात रोगजनक जीवांना आहार पुरवते, असं थेट सिद्ध करणारा कोणताही मजबूत क्लिनिकल पुरावा उपलब्ध नाही.”

विज्ञान काय सांगते?

न्यूट्रिएंट्समध्ये प्रकाशित केलेल्या २०२२ च्या एका अभ्यासात सांगितल्याप्रमाणे, संतुलित प्रमाणात अंड्याचे सेवन केल्याने प्रौढांच्या आतड्यांतील जीवाणूंवर नकारात्मक परिणाम होत नाही. खरं तर, अंड्यांमध्ये कोलिनसारखे पोषक घटक असतात, जे यकृत आणि मेंदूच्या आरोग्यासाठी अत्यंत आवश्यक असतात. पण, जेव्हा काही आतड्यांमध्ये जीवाणूंद्वारे चयापचय केले जाते तेव्हा ते ट्रायमेथिलामाइन-एन-ऑक्साइड तयार करू शकतात, ज्याचा संबंध काही अभ्यासांमध्ये हृदय व रक्तवाहिन्यांशी संबंधित आजाराशी जोडलेला आहे.

आहारतज्ज्ञांच्या मते, आतड्यांमधील जीवाणू अंड्यांपेक्षा मोठी भूमिका बजावतात. जर व्यक्तीची रोगप्रतिकार शक्ती आधीच कमकुवत असेल. अशा वेळी अंडी रोगजनकांना आहार पुरवतात, ही बाब अधिक सैद्धांतिक वाटते. अशा परिस्थितीत आहाराच्या निवडीत बदल करायला हवा.

तुमच्या आहारात अंडी का समाविष्ट करावीत?

मल्होत्रा ​​सांगतात की, एका मोठ्या अंड्यामध्ये ६-७ ग्रॅम चांगल्या दर्जाचे प्रोटीन असतात, ज्याचा अमिनो अॅसिड स्कोअर १.० असतो, जो दुग्धजन्य पदार्थ आणि मासांच्या तुलनेत सर्वांत जास्त असतो. “अंड्याचा पांढरा भाग (albumin)मध्ये सर्वाधिक प्रोटीन असतात आणि पिवळ्या भागात (valbumin)मध्ये लेसिथिन, फॅट, व्हिटॅमिन्स ए, डी, इ व बी१२ तसेच कोलिन असते, जे पेशी आणि मज्जातंतूंचे कार्य सुधारण्यास मदत करते”, मल्होत्रा पुढे सांगतात

ज्या लोकांना अंड्याचे सेवन टाळायचे आहे, त्यांच्यासाठी खालील पर्याय –
एवढ्या फायद्यांनंतरही तुम्ही अजूनही अंड्यांचे सेवन करावे की नाही, याविषयी विचार करीत असाल, तर तुम्ही चांगल्या गुणवत्तेचे इतर प्रोटीन स्रोत निवडू शकता. ते खालीलप्रमाणे :

  • मसूर आणि शेंगा
  • चिया सीड्स आणि हेम्प सीड्स
  • टेम्पेह (आंबवलेले सोयाबीन-आधारित पदार्थ) आणि टोफू
  • क्विनोआ
  • ऑरगॅनिक ग्रीक दही किंवा पनीर (शाकाहारींसाठी)
  • लीन चिकन ब्रेस्ट किंवा सॅल्मनसारखे मासे

“आतड्यांसंबंधित किंवा रोगप्रतिकारक समस्यांचा विचार केला, तर काही प्रोटीन स्रोतांचे सेवन करताना काळजी घेणे आवश्यक आहे. कारण- त्यामध्ये जास्त प्रक्रिया केलेले मांस, केसिन व जास्त व्हे प्रोटीन आयसोलेट्स, विशेषतः ज्यामध्ये अ‍ॅडेटिव्ह किंवा आर्टिफिशियल गोड पदार्थ असतात, जे आतड्यांतील चांगल्या जीवाणूंमध्ये व्यत्यय आणू शकतात”, असे मल्होत्रा सांगतात.