Blood Iin Stool : शौचाच्या वेळी किंवा त्यानंतर रक्त पडताना दिसल्यास मनात धडकी भरणे आणि घाबरून जाणे स्वाभाविक आहे. याबाबतच एका युजरने सोशल मीडियावर प्रश्न विचारला, “गुदद्वारामधून होणारा रक्तस्राव (Rectal Bleeding) कधी गांभीर्याने घ्यावा? हे एखाद्या गंभीर आजाराचे लक्षण असू शकते का?” तेव्हा याबाबत इंडियन एक्स्प्रेसने ‘शारदाकेअर हेल्थसिटी’चे गॅस्ट्रोएन्टेरॉलॉजी विभागाचे अटेंडिंग कन्सल्टंट डॉ. वसिम रमझान दार यांच्याशी संपर्क साधला.
डॉ. दार यांनी स्पष्ट केले की, गुदद्वारामधून होणारा प्रत्येक रक्तस्राव हा गंभीर आजाराचे संकेत देतोच, असे नाही. परंतु, ही समस्या किरकोळ आहे की गंभीर प्रश्नाचे उत्तर, हे ओळखणेही महत्त्वाचे असते. याचे उत्तर रक्तस्रावाच्या स्वरूपावर अवलंबून असते — जसे की रक्त किती प्रमाणात पडते आहे, तसे किती वेळा होते आणि त्यासह इतर कोणती लक्षणे दिसत आहेत, असे ते म्हणाले.
रक्तस्राव कधी सामान्य किंवा किरकोळ असतो?
टॉयलेट पेपरवर किंवा विष्ठेसह थोडेसे लालभडक रक्त दिसणे हे लक्षण सहसा मूळव्याध (Piles) किंवा फिशर (Fissures) यांसारख्या किरकोळ समस्यांशी संबंधित असते, असे डॉ. दार यांनी सांगितले. हे आजार अत्यंत सामान्य असून, उपचारांनी ते सहज बरे होऊ शकतात, असा दिलासाही त्यांनी दिला.
या समस्या निर्माण होण्यामध्ये आपली जीवनशैली मोठी भूमिका बजावते. जुनाट बद्धकोष्ठता (Constipation) आणि शौचाच्या वेळी जास्त जोर लावल्यामुळे मूळव्याध आणि फिशरचा त्रास उदभवतो.
डॉ. दार पुढे म्हणाले, आहारात फायबरचे प्रमाण कमी असणे, पुरेसे पाणी न पिणे आणि व्यायामाचा अभाव यांमुळे या समस्या अधिक वाढतात. काही लोकांमध्ये तिखट, मसालेदार किंवा प्रक्रिया केलेले (Processed) अन्न खाल्ल्यानेदेखील पचनसंस्थेला त्रास होऊन मूळव्याध किंवा फिशरची समस्या उदभवू शकते, ज्यामुळे रक्तस्राव होतो. मूळव्याधीमुळे वेदनेशिवाय लालभडक रक्त पडू शकते; तर फिशरमुळे शौचाच्या वेळी तीव्र वेदना होतात.
रक्त ओळखण्याची एक सोपी पद्धत म्हणजे त्याचा रंग. लालभडक रक्त हे सहसा पचनसंस्थेच्या खालच्या भागातून (Lower Digestive Tract) येते आणि ते कमी गंभीर मानले जाते.
रक्तस्रावाबाबत कधी काळजी करावी?
गंभीर आजारांमध्ये रक्तस्रावासह इतरही काही धोक्याची लक्षणेही दिसून येतात. उदाहरणार्थ,
- जर आतड्यांमध्ये संसर्ग (Infection) किंवा सूज असेल, तर रुग्णाला अतिसार (डायरिया) आणि पोटात अस्वस्थता जाणवू शकते.
वारंवार होणारा रक्तस्राव, जास्त प्रमाणात रक्त पडणे किंवा रक्तासह इतर लक्षणे दिसल्यास त्याकडे अजिबात दुर्लक्ष करू नये, असा इशारा डॉ. दार यांनी दिला आहे. जर हा त्रास नवीन असेल, सतत होत असेल, त्याचे कारण समजून येत नसेल, किंवा त्यासह चक्कर येणे, अशक्तपणा आणि ग्लानी येणे अशी लक्षणे दिसली, तर तातडीने तपासणी करून घेणे गरजेचे आहे.
इतर धोक्याची लक्षणे:
काळ्या रंगाची विष्ठा : पचनसंस्थेच्या वरच्या भागातून (Upper Digestive Tract) रक्तस्राव होत असल्याचे हे लक्षण आहे.
तीव्र पोटदुखी
रक्ताची उलटी होणे
अचानक वजन कमी होणे
शौचाच्या सवयींमध्ये अचानक झालेला बदल (उदा. वारंवार बद्धकोष्ठता किंवा जुलाब होणे)
डॉ. दार यांनी पुढे सांगितले की, याहून अधिक गंभीर कारणांमध्ये आतड्यांतील गाठी (Polyps) किंवा कोलोरेक्टल कॅन्सर (मोठ्या आतड्याचा कर्करोग) यांचा समावेश असू शकतो, ज्यामध्ये सतत रक्तस्राव (Hidden Bleeding) होऊ शकतो.
पुढे काय करावे?
डॉ. दार यांनी पुढील उपायांबद्दल बोलताना सांगितले की, डॉक्टर सर्वप्रथम रुग्णाची शारीरिक तपासणी करतात आणि त्याचा वैद्यकीय इतिहास (Medical History) जाणून घेतात, गरज पडल्यास रक्त तपासणी, विष्ठा तपासणी (Stool Test) किंवा इमेजिंग टेस्ट केल्या जातात.
रक्तस्रावाचे नेमके कारण आणि जागा शोधण्यासाठी कोलोनोस्कोपी (Colonoscopy) किंवा सिग्मॉइडोस्कोपी (Sigmoidoscopy) यांसारख्या चाचण्या केल्या जातात, ज्याद्वारे मोठ्या आतड्याची थेट तपासणी केली जाते आणि त्यानुसार योग्य उपचार ठरवले जातात.
त्यामुळे गुदद्वारामधून रक्त येणे ही सामान्य समस्या वाटत असली तरी त्याकडे दुर्लक्ष करू नका. त्रास नवीन आणि सतत जाणवणारा असेल, तर गंभीर आजारांची शक्यता नाकारण्यासाठी डॉक्टरांचा सल्ला घेणे हाच सर्वोत्तम मार्ग आहे.
(टीप: हा लेख केवळ तज्ज्ञांनी दिलेल्या माहितीवर आधारित आहे. कोणताही उपाय किंवा उपचार सुरू करण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला नक्की घ्या.)
