आपल्यातील अनेकांचे लाल ‘चेरी’ हे आवडीचे फळ आहे. मग याचे फळ म्हणून सेवन करणे असो किंवा एखादे पेय. पण, तुम्हाला माहीत आहे का केक, पेस्ट्री, आईस्क्रीमची शोभा वाढवणारी इवलीशी लालसर चेरी पौष्टिक फायद्यांचे छोटे पॉवरहाऊस आहे; जर याचे प्रत्येकाने उत्तम प्रकारे सेवन केले तर… म्हणूनच आज आपण या लेखातून चेरी खाण्याचे आरोग्यदायी फायदे आणि त्याचे किती व कोणत्या वेळी सेवन करणे योग्य ठरेल याबद्दल अधिक जाणून घेणार आहोत.

डिजिटल क्रिएटर सतींदर कौर यांनी इन्स्टाग्रामवर एक रील शेअर केली होती, ज्यामध्ये चेरीचे उशिरा रात्रीचा स्नॅक (satiate cravings) म्हणून सेवन करणे कसे काम करेल याबद्दल सांगितले आहे. याबरोबरच त्यांनी दिवसाला २५ चेरी खाण्याचे आव्हानसुद्धा केलं आहे. याबद्दल अधिक जाणून घेण्यासाठी द इंडियन एक्स्प्रेसने पोषणतज्ज्ञ वृत्ती श्रीवास्तव आणि पुणे येथील सह्याद्री हॉस्पिटलच्या मुख्य आहारतज्ज्ञ डॉक्टर शुची शर्मा यांच्याशी चर्चा केली आणि तुमच्या नियमित आहारात चेरीचा समावेश केल्याने कोणते आरोग्य फायदे मिळू शकतात हे जाणून घेतले.

एका दिवसात किती चेरी खाव्यात याच्या संख्येबद्दल बोलताना होलिस्टिक आहारतज्ज्ञ वृत्ती श्रीवास्तव म्हणाले की, चेरीच्या सेवनाची संख्या मोठ्या प्रमाणात एखाद्या व्यक्तीच्या आतड्याच्या आरोग्यावर अवलंबून असते. चेरीमध्ये भरपूर फायबर आणि सॉर्बिटॉल साखर (sugar alcohol sorbitol) असते. सॉर्बिटॉलमुळे गॅस, पोटातील गच्चपणा, आतड्यांची चिडचिड आणि शौचचे प्रमाण वाढते, म्हणूनच एक मजबूत आतडे जास्त संख्येने चेरी सहन करू शकते; तर कमकुवत आतडे चेरीचे जास्त प्रमाणात सेवन केल्याने त्यांना अस्वस्थ वाटू शकते. त्यामुळे लोक १५ ते २० चेरी आरामात खाऊ शकतात. पण, आहारतज्ज्ञ म्हणाले की, शरीराच्या आरामाच्या आधारावर चेरीच्या सेवनाची गणना वैयक्तिकरित्या ठरवली पाहिजे.

हेही वाचा…द्रवरूप औषध किंवा कफ सिरपनंतर लगेच पाणी प्यावे का? आरोग्यासाठी ठरेल का फायदेशीर; वाचा डॉक्टरांचे मत…

चेरीचे आरोग्यदायी फायदे –

पुणे येथील सह्याद्री हॉस्पिटलच्या मुख्य आहारतज्ज्ञ डॉक्टर शुची शर्मा सांगतात की, चेरीमध्ये फायबर, जीवनसत्त्वे आणि खनिजे असतात. चेरीचे सेवन झोपेच्या कमतरतेशी लढा देते. मधुमेह, हृदयाच्या समस्या नियंत्रणात ठेवते आणि रक्तदाब पातळी नियंत्रित करण्यास मदत करते. म्हणजेच ही इवलीशी चेरी अनेक रोगांचा सामना करण्यास मदत करते. म्हणून पोषणतज्ज्ञ म्हणतात की, दररोज किमान १० ते १५ चेरी खाव्यात आणि त्यातून अत्यावश्यक पोषक द्रव्ये मिळवावीत.

चेरी साधारणपणे दोन प्रकारच्या असतात. एक गोड चेरी आणि दुसरी आंबट चेरी असते. या चेरी प्रामुख्याने तीन पौष्टिक घटकांसाठी ओळखल्या जातात – १. फायबर, २. व्हिटॅमिन सी आणि ३. पोटॅशियम असे डॉक्टर म्हणाल्या आहेत.

चेरीमध्ये असणारे फायबर्स हे हृदयविकार आणि मधुमेहाचा सामना करण्यास मदत करतात, तर पोटॅशियम आणि सोडियम शरीरातील रक्तदाब पातळी नियंत्रित करण्यास मदत करतात. व्हिटॅमिन सी रोग प्रतिकारशक्ती आणि त्वचेचे आरोग्य सुधारण्यास मदत करते. स्नायूंच्या आकुंचन-प्रसरणात अडथळा न येण्यासाठी फायदेशीर ठरतात. चेरीमध्ये ग्लाइसेमिक इंडेक्स कमी असतो ; जो रक्तातील साखरेचे प्रमाण नियंत्रित करतो. चेरी फायबरचा चांगला स्रोत आहे. ज्यामध्ये विरघळणारे आणि अघुलनशील दोन्ही फायबर असतात ; जे नियमित मलविसर्जनास समर्थन देतात.चेरीमध्ये पाण्याचे प्रमाण जास्त आहे आणि ते लघवीचे प्रमाण वाढवणारे औषधदेखील आहे असे म्हटले तरी चालेल. याचा अर्थ ते शरीरातील जास्त पाणी साठवून ठेवण्यास मदत करतात, असे पोषणतज्ज्ञ श्रीवास्तव म्हणाले आहेत.

चेरीचे जास्त प्रमाणात सेवन कोणी करू नये?

IBS (इरिटेबल बोवेल सिंड्रोम), SIBO (लहान आतड्यांसंबंधी बॅक्टेरियल अतिवृद्धी) किंवा इतर पाचक अस्वस्थता असलेल्या लोकांनी जास्त चेरी घेणे टाळावे किंवा त्यांच्या आतड्यांचे आरोग्य सुधारेपर्यंत ते टाळावे; असे डॉक्टर शुची शर्मा म्हणाल्या आहेत.