‘अन्न हे पूर्णब्रह्म’ आहे असे अनेकदा म्हटले जाते. तुमचे अन्न तुम्हाला आनंदी, निरोगी ठेवण्यासही मदत करते. अन्नाचे सेवन केल्यानंतर त्याचे शारीरिक घटकद्रव्यात व शक्तीत रुपांतर व्हावे ही प्रत्येकाची अपेक्षा असते, त्यामुळे आपण योग्य अन्नाचे सेवन करतोय का? अन्न नीट व योग्य पद्धतीने शिजवतोय का? व उरलेल्या अन्नाचे सेवन करताना काळजी घेतोय का? हेसुद्धा पाहणे महत्त्वाचे आहे. तर आज आपण या लेखातून याबद्दल अधिक जाणून घेणार आहोत.

निरोगी आणि चांगल्या दर्जाचे अन्न यासाठी जागतिक आरोग्य संघटने (WHO) ने अलीकडेच दहा “गोल्डन रुल्स” जाहीर केले आहेत. त्यातील दोन रुल्सबद्दल आपण जाणून घेणार आहोत.जगभरातील लोक अधिक शिळे अन्न खाल्ल्यामुळे किंवा जास्त वेळा आणि चुकीच्या पद्धतीने अन्न सतत गरम केलेल्या अन्नाचे सेवन केल्यामुळे आजारी पडतात, तर हे आजार या गोल्डन रुल्समुळे कमी होऊ शकतात.

या दहा गोल्डन रुल्समधील एक महत्त्वाचा नियम म्हणजे ‘शक्य तितक्या लवकर शिजवलेले अन्न खाणे.’ पण, हे नेहमीच शक्य नसते हे जागतिक आरोग्य संघटनेलाही समजते. तर त्यांनी सांगितलेला आणखी एक गोल्डन नियम म्हणजे ‘निरोगी आणि चांगल्या दर्जासाठी उरलेले अन्न पुन्हा गरम करण्याचे महत्त्व अधोरेखित केलं आहे’. जर शिजवलेल्या अन्नाचे लगेच सेवन केलं जात नसेल तर डब्ल्यूएचओने अन्न पुन्हा गरम करून त्याचे सेवन करण्याचा सल्ला दिला आहे.

हेही वाचा…लाल चेरी मधुमेहासह ‘या’ तीन समस्यांवर ठरेल रामबाण उपाय; किती व कधी खाल्ली पाहिजेत? पोषणतज्ज्ञांकडून जाणून घ्या

तर यासंबंधित अधिक जाणून घेण्यासाठी द इंडियन एक्स्प्रेसने इंद्रप्रस्थ अपोलो हॉस्पिटल्समधील अंतर्गत वरिष्ठ सल्लागार डॉक्टर सुरंजित चॅटर्जी यांच्याशी संवाद साधला. डॉक्टरांच्या मते, किमान 75°C (165°F) च्या तापमानात अन्न पुन्हा गरम केल्याने बंद डब्यात किंवा एखाद्या भांड्यात ठेवलेल्या अन्नात निर्माण झालेल्या कोणत्याही जीवाणूंना मारण्यास मदत करू शकते. पण, त्यांनी चेतावणी दिली की, ही प्रक्रिया फक्त ‘एकदाच’ केली पाहिजे. कारण अन्न थंड असताना ते वारंवार गरम करणे या चक्रांमुळे अन्न गुणवत्ता आणि सुरक्षिततेशी तडजोड निर्माण होऊ शकते. प्रत्येक रीहिटिंग प्रक्रियेदरम्यान अन्नातील बॅक्टेरिया वाढण्यास वेळ देते. डब्ल्यूएचओच्या मार्गदर्शक तत्त्वांनी अन्न फक्त एकदाच पुन्हा गरम करण्याची परवानगी दिली आहे. कारण अन्न जास्त गरम करणे ही प्रक्रिया खरोखरची टाळली पाहिजे. विशेषत: भारतासारख्या उबदार वातावरणातील तापमान असलेल्या प्रदेशांमध्ये, ज्यामुळे सूक्ष्मजीवांच्या वाढीला गती मिळू शकते; असे त्यांनी म्हटले आहे.

डॉक्टर म्हणतात की, शिळे अन्न खाल्ल्यामुळे किंवा जास्त वेळा आणि चुकीच्या पद्धतीने अन्न सतत गरम केल्यामुळे मळमळ, उलट्या आणि अतिसार आदी लक्षणे उद्भवू शकतात आणि विशेषतः लहान मुले, गर्भवती महिला आणि कमकुवत रोगप्रतिकारक शक्ती असलेल्या लोकांसाठी धोकादायक असू शकतात. जर तुम्ही उच्च तापमानात अन्न एकदा गरम केलं तर ते जीवाणू नष्ट करून अनेक आजार टाळण्यास मदत करू शकतात.

डॉक्टर म्हणतात की, अन्न पुन्हा गरम करताना पुढील काही मार्गांचा तुम्ही वापर करून पाहू शकता…

१. थोडं पाणी घाला – उरलेले अन्न पुन्हा गरम करताना कोरडे होऊ शकतात. तर यावेळेस थोडं पाणी किंवा सॉस जोडल्याने अन्नातील ओलावा आणि चव टिकून राहण्यास मदत होते.

२. अन्नाचे विभाजन करा – तुम्हाला अन्न गरम करायचे असल्यास त्याचे पहिले काळजीपूर्वक विभाजन करून घ्या. एकाचवेळी जास्त प्रमाणात अन्न गरम केल्यास त्याच्या गुणवत्तेवर परिणाम होऊ शकतो.

३. नवनवीन पदार्थ बनवून पाहा – उरलेल्या पदार्थांचे नवीन पदार्थांमध्ये रूपांतर करा. ऑम्लेट किंवा सूपमध्ये उरलेल्या अन्नाचा वापर करा. तुमच्या जेवणात नवीन पदार्थांचा समावेश करून पाहा.

सुरक्षित अन्न बनवण्यापासून ते त्याचे सेवन करण्यापर्यंतची गुरुकिल्ली आहे. उरलेले अन्न योग्यरित्या पुन्हा गरम करणे ही आजार टाळण्यासाठी आणि तुम्ही तुमच्या स्वादिष्ट उरलेल्या पदार्थांचा आनंद लुटण्याची खात्री करण्यासाठी एक साधी, पण महत्त्वपूर्ण पायरी आहे. म्हणून पुढच्या वेळी जेव्हा तुम्ही उरलेल्या अन्नाचे सेवन करण्यापूर्वी त्याला ‘फक्त एकदाचं’ गरम करायला विसरू नका.