सोप्या शब्दात समजून घेऊया RCT किंवा रूट कॅनॉल ट्रीटमेंट म्हणजे नक्की काय असतं. आपल्या सर्वांना साधारणतः दात व त्याचा आकार माहिती आहेच. हसताना, बोलताना, खाताना किंवा शरीरावर, चेहऱ्यावर कुठलेही हावभाव करताना सर्वात चमकदार दिसणारा आपला अवयव म्हणजे दात. डोळ्यांची चमक ही फार कमी लोकांना प्राप्त असते. परंतु दाताची चमक ही साधारणतः सर्वांनाच लाभलेली देणगी आहे. ज्या व्यक्तीने दात स्वच्छ करण्याची सवय समाजाला सांगितली व ज्या समूहाने ती अंगीकारली त्यांचे खरंच मानव जातीवर फार उपकार आहे. आज आपल्या आयुष्याचा तो अविभाज्य व दररोजचा उपक्रम व विधी आहे.
विषुववृत्तावर राहणारे आणि भारतीय उपखंडातले लोक या चमकणाऱ्या दातांबद्दल अधिकच भाग्यवान आहे. कारण साधारणतः विषुववृत्तावर व भारतीय उपखंडावर राहणाऱ्या लोकांचा त्वचेचा रंग जसा आहे, त्याच्या विरोधी रंग हा दातांचा असतो. म्हणून वरील लोकांना शुभ्र दातांचे वरदान लाभले आहे व त्यामुळे ती दातांची चमकही जास्त उजळून लक्षवेधक बनते.
आपल्याला जे दात दिसतात ते खरं म्हणजे ३० % किंवा एक तृतीयांशानेच आपण बघू शकतो. कारण २/३ किंवा ७०% दातांचा भाग हा हिरड्यांच्या खाली हाडांमध्ये रुतून सुरक्षित केला जातो. आपण कुठलेही उपकरण घेतले, गाडी घेतली, वस्तू घेतली तर तिचे आयुष्य १० ते २० वर्षे मर्यादित असते. काही काळाने तिला दुरुस्त करावे लागते किंवा ती खराब होऊन जाते. परंतु आपल्या शरीराचे अवयव आपल्याला जन्मभर साथ देतात. दातांचा उपयोग तर आपल्याला २४ तास करावा लागतो. त्यामुळेच दातांची मूळं आपल्या हिरडीखालील हाडात २/३ म्हणजेच ७०% खोल रुतून घट्ट असतात. त्यामुळेच ते आपल्याला ५०,६०,७० वर्षे ही साथ देतात.
काही वेळा मात्र दातांचा जो वरचा ३० % दिसणारा भाग आहे, त्याला कीड लागते. ही कीड सुरुवातीला दुखत नाही ती फक्त एक छोटासा काळा तपकिरी ठिपका या स्वरूपात असते. काही काळाने तिथे छोटं छिद्र सदृश खड्डा पडतो. याही अवस्थेत आपल्याला वेदना होत नाही. या अवस्थेत तिथे अन्नकण अडकायला सुरुवात होते. यानंतर जर आपण डेंटिस्टकडे गेलो नाही तर मात्र ही कीड वाढत वाढत जाऊन दातांमध्ये असलेल्या नसांना स्पर्श करण्यास सुरुवात करते. या अवस्थेत काही वेळा वेदना होतात.
विशेषतः थंड किंवा गरम खाल्ल्यानंतर किंवा गोड खाल्ल्यानंतर वेदना जास्त होतात. या अवस्थेतही निसर्ग बऱ्याचदा दाताला तंदुरुस्त ठेवण्यासाठी प्रयत्न करतो. म्हणजेच या अवस्थेत तुम्ही डॉक्टरांकडे गेलात तर डॉक्टर सिमेंट भरून ८-१० दिवस निरीक्षणाखाली तो दात ठेवतात. त्यातून दाताला स्वतःला रिपेअर करण्याची एक संधी निसर्ग देतो. काही वेळा खरोखरच रूट कॅनॉल न करताही दातात पर्मनंट सिमेंट भरून तो वाचवता येतो. इतक्या वेळा संधी मिळूनही रुग्ण मात्र बेफिकीर असतो. जोपर्यंत दातातून प्रचंड कळा व वेदना होत नाही तोपर्यंत तो डॉक्टरांकडे जातही नाही. शेवटी असा दात रूट कॅनॉल ट्रीटमेंट केल्यावरच वाचतो.
खरं म्हणजे आपण दातांची रचना जरा समजावून घ्यायला हवी . एक उदाहरण मी नेहमी माझ्या रुग्णांना सांगतो. दात कसा दिसतो हे समजावून घ्यायचे असेल, तर आपण सोललेला नारळाचा फळ नजरेसमोर आणा. नारळाचा सर्वात बाह्यभाग हा अतिशय टणक असतो. त्या टणक कवटीच्या आतमध्ये खोबरं असतं व खोबऱ्याच्या आत पाणी असते. अगदी तशाच प्रकारे दाताच्या सर्वात बाहेरचा भाग जो २-३ मिली मीटरचा असतो. ज्याला ईनँमल म्हणतात. तो अत्यंत टणक व मजबूत असतो अगदी हिऱ्याइतका.
त्याच्या आत मध्ये २-३ मिलिमीटरचा डेंटिंनचा भाग असतो. जो थोडा टणक असतो व त्या डेंटिंनच्या आतमध्ये गाभा असतो. त्यामध्ये आपल्या दाताचा नसा असतात. असे चित्र डोळ्यासमोर ठेवल्यास आपल्याला आपल्या दाताची कीड कशी कशी वाढत जाऊन नसेपर्यंत पोहोचते हे कळेल.
एकदा ही कीड नसेपर्यंत गेल्यानंतर आपल्याला प्रचंड वेदना होतात. दातांतून कळा येतात व काही खाणेपिणे मुश्किल होऊन जातं. आपण डॉक्टरांकडे जातो व डॉक्टर आपल्याला RCT करायला सांगतात. ही ट्रीटमेंट करताना सुरुवातीला आपल्या दाताच्या मधोमध एक छोटा खड्डा केला जातो. हा खड्डा करताना तो ईनँमल डेंटिंन भेदून आत गाभ्यापर्यंत न्यावा लागतो. तिथे आपल्या दातांच्या नसा असतात. साधारणपणे पुढच्या दातांमध्ये एकच मूळ असल्याने एकच नस असते. उपदाढांमध्ये काही वेळा दोन नसा असतात व मागच्या दाढांमध्ये तीन-चार नसा असतात. अपवादात्मक केसेस मध्ये जास्त नसाही असू शकतात.
या सर्व नसा भुलेचे इंजेक्शन देऊन बधीर केल्या जातात. अशा बधिर केलेल्या नसा काढताना वेदना होत नाही.
१० मायकॉन पासून ते ७०-८० मायकॉन पर्यंत बारीक वेगवेगळ्या आकारांच्या सुया वापरून या नसा शोधल्या जातात त्या काढून टाकल्या जातात. आज काल आधुनिक उपकरणे आल्याने त्या उपकरणांच्या सहायाने नसा काढणे अधिक सहज झाले आहे. त्यानंतर त्या नसा पूर्णपणे निर्जंतुक केल्या जातात. निडल व सिरींजच्या सहाय्याने त्यांचे एरीमगेशन केले जाते व त्या स्वच्छ केल्या जातात. अशा स्वच्छ व निर्जंतुक नसांमध्ये प्लास्टिकच्या नसा टाकून त्या सील केल्या जातात. त्यावर सिमेंट भरले जाते. नंतर पर्मनंट फीलिंग केली जाते. दाताच्या सर्व वेदना गायब झाल्यावर दाताला सर्व बाजूंनी २-३ मिलिमीटर कट केले जाते. नंतर आपल्या सर्व दातांचे माप घेतले जाऊन ते माप लॅबमध्ये पाठविले जाते आणि त्यानुसार RCT केलेल्या दातावर कॅप लावली जाते. या संपूर्ण प्रक्रियेला ३-४ व्हिजिट्स लागतात. या सर्व प्रक्रियेला रूट कॅनॉल/RCT असे म्हटले जाते.

