६० वर्षीय सलमान खान, ज्याने अलीकडेच आपल्या सुडौल शरीराची (chiselled physique) झलक दाखवली होती, त्याने आता आपल्या आहाराबद्दल (Diet) खुलासा केला आहे. व्हरायटी इंडिया’च्या यूट्यूब चॅनल माहिती देताना सलमानने सांगितले की, “मी एक चमचा भात खाऊन माझी प्रोटीनची गरज पूर्ण करतो माझ्यासाठी प्रत्येक दिवस चीट डे असतो. त्याऐवजी मी जिममध्ये अतिरिक्त २० मिनिटे किंवा अतिरिक्त एक तास घालवणे पसंत करेन, पण मला जे खायचे आहे ते मी खाईन. मी वाफवलेले पदार्थ खात नाही.”
‘सुलतान’ फेम अभिनेता सलमानने पुढे सांगितले की,“मला जेवढे प्रोटीन खाण्याची गरज आहे, तेवढेच मी खातो. जेवण कितीही चविष्ट असले तरी. मी फक्त एक चमचा भात घेतो. मी पोळीला हात लावत नाही. बस्स. आणि मग मला जेवढ्या प्रोटीनची गरज असते, तेवढी मी त्या एका चमचा भाताने पूर्ण करण्याचा प्रयत्न करतो.”
सलमान खानचे हे विधान अनेक फिटनेस-सजग लोकांना पटणारे वास्तव दर्शवते: कठोर डाएटपेक्षा सातत्य अधिक महत्त्वाचे आहे. चीट मीलची कबुली नव्हे, तर त्यांनी वर्णन केलेली आहाराचे प्रमाण नियंत्रित ठेवण्याची आणि प्रथिनयुक्त आहाराची पद्धत अधिक लक्षवेधी आहे. “भात किंवा पोळीसारखे प्रक्रिया केलेले कर्बोदकयुक्त पदार्थ मर्यादित प्रमाणत सेवन करून प्रथिनांवर लक्ष केंद्रित केल्यास, विशेषतः सक्रिय व्यक्तींसाठी, पोट भरल्यासारखे वाटणे, रक्तातील साखरेची स्थिरता आणि स्नायू टिकवून ठेवण्यास मदत होऊ शकते,” असे ठाण्यातील केआयएमएस हॉस्पिटल्सचे मधुमेह विभाग प्रमुख डॉ. विजय नेगलूर यांनी द इंडियन एक्स्प्रेसला म्हणाले.
पण, तीव्र व्यायाम करणाऱ्या अत्यंत सक्रिय सेलिब्रिटीसाठी जे उपयुक्त ठरते, ते बैठी जीवनशैली, तणाव, अपुरी झोप किंवा चयापचयाच्या समस्या असलेल्या सामान्य व्यक्तीला थेट लागू होईलच असे नाही, असा युक्तिवाद त्यांनी यावेळी मांडला.
कर्बोदके पूर्णपणे बंद करणे ही एक आरोग्यदायी रणनीती आहे का?(Is completely cutting carbohydrates a healthy strategy?)
कर्बोदकांविषयी अनेकदा गैरसमज असतो. शरीराला ऊर्जा, आतड्यांचे आरोग्य आणि हार्मोनल संतुलनासाठी चांगल्या प्रतीच्या कर्बोदकांची अजूनही गरज असते. “सामान्यतः समस्या अतिरिक्त प्रमाणात आणि निकृष्ट दर्जाच्या कर्बोदकांमध्ये असते. जसे की रिफाइंड पीठ, साखरयुक्त पदार्थ, प्रमाणापेक्षा जास्त जेवण आणि वारंवार खाणे. मधुमेह किंवा इन्सुलिन प्रतिरोधकतेचा धोका असलेल्या लोकांसाठी, कर्बोदकांचे सेवन कमी केल्याने ग्लुकोज नियंत्रणात सुधारणा होऊ शकते, परंतु कर्बोदके पूर्णपणे बंद करणे क्वचितच आवश्यक असते. विशेषतः भारतीय आहारात, निर्बंधांपेक्षा संतुलन अधिक व्यावहारिक आहे. भात किंवा पोळीचे लहान तुकडे, त्यासत प्रथिने, फायबर आणि आरोग्यदायी चरबी यांचे सेवन करणे, हे पूर्णपणे टाळण्यापेक्षा दीर्घकाळात सहसा अधिक चांगले काम करते,” असे डॉ. नेगलूर म्हणाले.
व्यायाम काही प्रमाणात अतिसेवनाचा परिणाम कमी करू शकतो का? (Can exercise offset overeating?)
शारीरिक हालचालींमुळे इन्सुलिन संवेदनशीलता सुधारते आणि शरीराला ग्लुकोजचा अधिक प्रभावीपणे वापर करण्यास मदत होते. तथापि, आज एक सामान्य गैरसमज आहे की तीव्र व्यायाम अस्वास्थ्यकर खाण्याच्या सवयी पूर्णपणे रद्द करू शकतो. पोषण आणि व्यायाम एकत्र काम करतात; एक दुसऱ्याची जागा पूर्णपणे घेऊ शकत नाही,” असे डॉ. नेगलूर यांनी स्पष्ट केले.
काय लक्षात घ्यावे? (What should be kept in mind?
सर्वात मोठा धडा म्हणजे सातत्य, परिपूर्णता नव्हे. सतत क्रॅश डाएट आणि अति खाणे यांच्या चक्रात अडकण्यापेक्षा, शाश्वत खाण्याच्या सवयी, पुरेसे प्रथिने, आहाराच्या प्रमाणाबद्दल जागरूकता, नियमित व्यायाम आणि अपराधीपणाच्या भावनेशिवाय अन्नाचा आनंद घेणे हे अधिक आरोग्यदायी आहे. सेलिब्रिटींच्या दिनचर्या लोकांना प्रेरणा देऊ शकतात, परंतु वैयक्तिक आरोग्याच्या गरजा, वय, शारीरिक हालचालींची पातळी आणि चयापचय प्रोफाइल यांचा विचार केल्याशिवाय त्यांना आदर्श मानू नये.
