Cervical Cancer Screening: भारतातील महिलांमध्ये इतर कॅ्सर प्रकारांपैकी गर्भाशयाचा अर्थात सर्व्हायकल कॅन्सर हा एक महत्त्वाचा भाग आहे. देशात दुसरा सर्वात जास्त धोकादायक असा हा कॅन्सरचा प्रकार आहे. तज्ज्ञांचा विश्वास आहे की, जर एखाद्या जीवघेण्या आजारातून जीव वाचवण्यासाठी आजाराचे लवकर निदान आवश्यक आहे. डॉ. सहाना यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले की, सर्व्हायकल कॅन्सर हा अशा कॅन्सरपैकी एक आहे, ज्यासाठी प्रभावी, परवडणारी आणि विश्वासार्ह स्क्रीनिंग टेस्ट उपलब्ध आहे.
प्रतिबंधासाठी टेस्ट आवश्यक
सर्व्हायकल कॅन्सरच्या सुमारे ७० ते ८० टक्के प्रकरणांची मुळे Human papillomavirus (एचपीव्ही) या हाय-रिस्क व्हायरस संसर्गाशी जोडलेली असतात. हा संसर्ग अनेक वर्षे कोणतीही लक्षणे न दाखवता शरीरात राहू शकतो. मात्र कालांतराने तो प्रीकॅन्सर अवस्थेत किंवा थेट कॅन्सरमध्ये रूपांतरित होऊ शकतो. त्यामुळे एचपीव्हीपासून बचाव आणि वेळेवर तपासणी करणे अत्यंत गरजेचे ठरते.
पॅप स्मीयर टेस्ट, याला साधारणपणे पॅप टेस्ट म्हटले जाते. १९४०च्या दशकात ही टेस्ट विकसित झाली. या तपासणीत गर्भाशयाच्या मुखातून (सर्विक्स) पेशी घेतल्या जातात आणि सूक्ष्मदर्शकाखाली त्यांची तपासणी केली जाते. यामुळे सुरुवातीच्या असामान्य बदलांचा वेळीच शोध लागू शकतो. प्रारंभिक टप्प्यात निदान झाल्यास उपचार सोपे आणि अधिक यशस्वी होण्याची शक्यता वाढते.
टेस्टचे किती प्रकार असतात?
पॅप टेस्ट प्रामुख्याने दोन पद्धतींनी केली जाते.
पारंपरिक पद्धत – सर्विक्समधील पेशी घेऊन त्या थेट स्लाइडवर ठेवून तपासल्या जातात.
लिक्विड बेस्ड साइटोलॉजी (LBC) – विशेष ब्रशद्वारे पेशी घेऊन त्या द्रव माध्यमात सुरक्षित करून प्रयोगशाळेत पाठवल्या जातात. ही पद्धत अधिक प्रगत मानली जाते. कारण त्याच नमुन्यातून एचपीव्ही डीएनएची तपासणी करणे शक्य होते.
टेस्ट का करावी?
अनेक महिला लक्षणे नसल्यामुळे तपासणी टाळतात. मात्र स्क्रीनिंगचा उद्देशच लक्षणे नसलेल्या महिलांमध्ये सुरुवातीचे बदल ओळखणे हा आहे. साधारणपणे २१ वर्षांच्या वयानंतर किंवा लैंगिकदृष्ट्या सक्रिय झाल्यानंतर पॅप टेस्ट सुरू करण्याचा सल्ला दिला जातो. २१ ते ३० वर्षे वयोगटातील महिलांनी दर तीन वर्षांनी पॅप टेस्ट करावी. ३० ते ६५ वर्षे वयोगटातील महिलांनी दर तीन वर्षांनी पॅप टेस्ट किंवा दर पाच वर्षांनी पॅप टेस्टसोबत एचपीव्ही टेस्ट करण्याचा सल्ला दिला जातो.
या गोष्टी लक्षात ठेवा…
ही टेस्ट सोपी असून क्लिनिकमध्ये काही मिनिटांत पूर्ण होते. तपासणीच्या दिवशी टॅम्पॉन किंवा मेन्स्ट्रुअल कपचा वापर टाळावा. तसेच मासिक पाळीदरम्यान टेस्ट पुढे ढकलावी.
रिपोर्टमध्ये “स्क्रीन पॉझिटिव्ह” आल्यास कॅन्सर असल्याचा अर्थ होत नाही; तर पुढील तपासण्यांची गरज दर्शवते. “स्क्रीन निगेटिव्ह” म्हणजे सध्या धोका नाही असा दिलासादायक निष्कर्ष असतो.
सोप्या शब्दांत सांगायचे तर पॅप टेस्ट ही एक साधी, सुरक्षित आणि जीव वाचवणारी तपासणी आहे. नियमित स्क्रीनिंगमुळे सर्व्हायकल कॅन्सरचा धोका मोठ्या प्रमाणात कमी करता येतो आणि महिलांना निरोगी, दीर्घायुष्याचा विश्वास मिळतो.

