Shefali Jariwala : ‘काँटा लगा गर्ल’ शेफाली जरीवालाचे वयाच्या ४२ व्या वर्षी निधन झाले. तिच्या अकाली निधनाने सर्वांनाच धक्का बसला आहे. शुक्रवारी रात्री पती पराग त्यागी आणि इतर तिघांनी शेफालीला बेलेव्ह्यू मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये नेले होते; पण डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले. तिच्या निधनाने मनोरंजनविश्वात शोककळा पसरली आहे. बिग बॉसच्या १३ व्या सीझनमध्ये १३ आठवडे ती बिग बॉसच्या घरात राहिली होती, त्यानंतर जेव्हा ती तिच्या घरी परतली तेव्हा तिला एन्झायटीचा सामना करावा लागला.
२०२४ मध्ये पारस छाब्रा याच्या यूट्यूब चॅनेलवर बोलताना शेफालीने सांगितले, “मी एक मृदू आवाजात बोलणारी व्यक्ती आहे; पण माहीत नाही की, बिग बॉसच्या घरात जाऊन कशी काय इतक्या मोठ्याने बोलू लागले. बिग बॉसनंतर मी घरातसुद्धा तितक्याच मोठ्यानं बोलायची तेव्हा पराग मला आठवण करून द्यायचा की, तू आता बिग बॉसच्या घरात नाहीस, रिलॅक्स! बिग बॉसनंतर आमच्याकडे लॉकडाउन होता. ते एक वर्ष माझ्यासाठी खूप कठीण होतं. मला एन्झायटीचा त्रास होत होता.”
शेफालीने पुढे सांगितले की, कोरोना लॉकडाऊन म्हणजे तिच्यासाठी दीर्घकाळ घरी राहणे होते. “मला पहिल्या आठवड्यात कोरोना म्हणजे काय हे कळले नाही. पहिल्या आठवड्यात मी झोपले. कारण- मला खूप झोप लागायची. सहा महिने मलाही काहीही समजत नव्हतं. माझ्या कुटुंबानं अतिशय संवेदनशीलतेनं मला सांभाळलं. नंतर मला जाणवलं की, हा एक मानसिकतेचा खेळ आहे. मी तिथे १३ आठवडे होती; पण तिथून बाहेर पडणं खूप कठीण आहे. तुम्हाला जाणीवपूर्वक बिग बॉस मोडमधून बाहेर पडावं लागतं. ज्यांना वाटतं की, हा एक सोपा खेळ आहे. मनोरंजक आहे, आयुष्यभराचा अनुभव आहे; पण जेव्हा खेळ संपतो तेव्हा बंद करायला शिकावे लागते. मला पूर्णपणे एक वर्ष लागले. १०० टक्के मला एन्झायटी होती आणि नैराश्य आले होते.”
पारस छाबराशी बोलताना शेफाली म्हणाली “आम्ही घरात खूप संवेदनशील असल्यानं, आमच्या संवेदना खूप वाढल्या होत्या. आम्हाला त्रास खूप झाला, राग खूप आला आणि अगदी प्रेमही खूप वाढलं. असंच ते पुढेही चालू राहिलं. लॉकडाऊनमुळे आम्ही बाहेरील जगाशी संवाद साधू शकलो नाही. माझ्या भावना मला नियंत्रित करण्यासाठी एक वर्ष लागलं. त्यात मी काही लोकांना गमावलं. त्याचाही परिणाम माझ्यावर झाला. मला एन्झायटीची समस्या होती. त्यावेळी मला वैद्यकीय उपचार घ्यावे लागले. एन्झायटी ही चांगली गोष्ट नाही. त्याशिवाय मला एपिलेप्सी (Epilepsy)चा त्रास होता.” एपिलेप्सी म्हणजे अपस्मार किंवा फीट येणे. हा एक न्यूरोलॉजिकल आजार आहे, ज्यामध्ये वारंवार झटके येतात. शेफालीने हेसुद्धा सांगितले की, एपिलेप्सीचे निदान झाल्यानंतर तिने योगा सुरू केला, ज्यामुळे एन्झायटी कमी होण्यास मदत झाली.
दी इंडियन एक्स्प्रेसने याविषयी मानसोपचार तज्ज्ञ, एनर्जी हीलर, लाइफ कोच डेल्ना राजेश यांच्या हवाल्याने सविस्तर माहिती जाणून घेतली. डेल्ना यांनी असे अनुभव भावनिकदृष्ट्या कसे थकवणारे असू शकतात याबद्दल सांगितले. “एखादी व्यक्ती जितकी अधिक संवेदनशील, तर्क किंवा विचारांशिवाय, सहजपणे एखादी गोष्ट समजून घेण्याची क्षमता असणारी, उदार स्वभावाची असेल तितकीच ती भावनिक त्रासाला बळी पडते,” असे डेल्ना सांगतात.
डेल्ना यांच्या मते, जरीवालाच्या बाबतीत भावनिक ओव्हरलोड एपिलेप्सीमुळे तिचा त्रास वाढला होता. ही एक अशी स्थिती आहे, ज्यासाठी शरीराच्या अंतर्गत आणि बाह्य बदल यांची एकत्र जुळवून घेण्याची क्षमता आवश्यक असते. “तुम्ही एन्झायटीतून बाहेर पडण्याचा मार्ग शोधू शकत नसल्यानं, तुम्हाला सुरक्षिततेचा मार्ग हळुवारपणे, सातत्याने आणि दया व सहानभूतीनं तो शोधावा लागतो.
तुम्ही काय करू शकता?
घराबाहेर पडा –
लहान सुरुवात करा. अनवाणी चालत जा. दीर्घ श्वास घ्या. तुमचा हात तुमच्या हृदयावर ठेवा आणि स्वतःला आठवण करून द्या की, तुम्ही सुरक्षित आहात.
खूप जास्त उत्तेजित होण्यापासून दूर राहा –
शांतता हे एक औषध आहे. निसर्ग म्हणजे नियमन. लॅपटॉप, मोबाईल, आवाज आणि दीर्घकाळ खोलवर संवाद करणे टाळा.
मनात भावना जमा करू नका –
रडा, डायरी करा, डान्स करा, बाहेर पडा. शब्द प्रत्येक गोष्ट व्यक्त करू शकत नाही. त्यासाठी शरीराला परवानगी द्या, असे डेल्ना सांगतात.
वेगवेगळे प्रश्न विचारा –
“माझ्यात काय चूक आहे?” असे विचारण्याऐवजी “मी खूप दिवसांपासून एकटा काय धरून बसलो आहे?” असे प्रश्न विचारा
आधार घ्या –
तुम्ही मानसिकदृष्ट्या खचण्याची वाट पाहू नका. थेरपी, उपचार, एखादी सुरक्षित जागासुद्धा सर्व काही बदलू शकते.