हंगामी आजारामुळे अनेकदा घसा दुखतो, घशात संसर्ग होतो किंवा नाक वाहू लागते. अशा परिस्थिती डॉक्टरांकडे जाण्याआधी अनेकदा लोक घरगुती उपचार करण्यावर भर देतात. जेव्हा घशासंबंधित त्रास होत असेल तर अनेकदा गरण पाणी पिण्याचा सल्ला वडीलधारी मंडळी देतात. पण सध्या सोशल मीडियावर असा दावा केला जात आहे की, घशामध्ये संसर्ग झाला असेल किंवा सर्दीमुळे नाक वाहत असलेल्यांसाठी गरम पाणी पिणे अयोग्य आहे? पमात्र सोशल मीडियावरील या दाव्यात किती तथ्य आहे, की हा केवळ दिशाभूल करणारा दावा आहे? हे जाणून घेणे महत्त्वाचे आहे. याबाबत तज्ज्ञांचे काय मत आहे ते जाणून घेऊ या.

जेव्हा तुम्हाला हंगामी आजाराचा संसर्ग होतो तेव्हा गरम पेये पिण्याबाबत सोशल मीडियावर होणाऱ्या चर्चांमध्ये काहीही तथ्य नाही. अनेक लोक गरम सुप, चहा यासारख्या घशाला आराम देणाऱ्या पदार्थांचे सेवन करतात मात्र पेयांचे तापमान आणि प्रकार यामुळे मोठा फरक पडू शकतो असे तज्ज्ञ सांगतात.

शाचा संसर्ग किंवा नाक वाहत असल्यास शरीरात काय घडते?(What happens to your body when you are suffering from conditions like throat infections and a runny nose?)

जेव्हा शरीर घशाच्या संसर्गाशी किंवा वाहणाऱ्या नाकाशी लढत असते, तेव्हा रोगप्रतिकारशक्ती घशात आणि नाकाच्या मार्गात दाह निर्माण करते, ज्यामुळे दुखणे आणि सूज येते. याबाबत द इंडियन एक्स्प्रेसला माहिती देताना पुणे येथील रुबी हॉल क्लिनिकमधील वरिष्ठ ईएनटी सर्जन आणि निद्राविकार विशेषज्ञ डॉ. मुरारजी घाडगे सांगतात की, “रोगजंतूंना अडकवण्यासाठी श्लेष्माचे उत्पादन वाढते, ज्यामुळे नाक चोंदते किंवा वाहते. जेव्हा शरीर आपली ऊर्जा रोगप्रतिकार संरक्षणाकडे वळवते, तेव्हा काही लोकांना थकवा किंवा ताप येऊ शकतो. जर शरीरातील पाण्याची पातळी पुरेशा प्रमाणात नसेल, तर श्लेष्मा घट्ट होतो, ज्यामुळे अस्वस्थता वाढते. एकूणच, ही लक्षणे शरीर संसर्गाशी सक्रियपणे लढत असल्याचे संकेत आहेत,” असे डॉ. घाडगे सांगतात.

तर, तुम्ही कोणत्या प्रकारचे पाणी प्यावे?

याबाबत द इंडियन एक्स्प्रेसला माहिती देताना मुंबईतील परळ येथील ग्लेनेगल्स हॉस्पिटलमधील इंटर्नल मेडिसिन विभागाच्या वरिष्ठ सल्लागार डॉ. मंजुषा अग्रवाल सांगतात की,खूप गरम पाणी पिणे टाळावे, कारण त्यामुळे “संवेदनशील उती जळू शकतात”. “जर तुम्हाला ताप असेल, तर तुम्हाला आरामदायी वाटेल अशा तापमानाचे द्रवपदार्थ प्या.

अत्यंत गरम पेये किंवा जेवण टाळणे महत्त्वाचे आहे, कारण त्यामुळे आधीच संवेदनशील असलेल्या घशाला त्रास होऊ शकतो. सौम्य ऊब आरामदायी असते, तर तीव्र उष्णतेमुळे अस्वस्थता किंवा किरकोळ त्रास होऊ शकतो, असे ठाण्यातील केआयएमएस रुग्णालयातील इंटर्नल मेडिसिन विभागाचे सल्लागार डॉ. अनिकेत मुळे यांनी द इंडियन एक्स्प्रेसला सांगितले.

गरम पाणी पूर्णपणे टाळावे का? (So, should you avoid hot water?)

डॉ. अग्रवाल म्हणाले की, सर्दी झाली म्हणून गरम पाणी पूर्णपणे टाळण्याची गरज नाही. “खरं तर, कोमट किंवा गरम पेये आणि गरम वाफ घेतल्याने सर्दीची लक्षणे कमी होण्यास मदत होते. अत्यंत गरम नव्हे, तर कोमट पेये घशातील खवखव कमी करण्यास, कफ पातळ करण्यास, चोंदलेले नाक मोकळे करण्यास आणि शरीरातील पाण्याची पातळी टिकवून ठेवण्यास मदत करतात, ज्यामुळे बरे होण्यास मदत होते,” असे डॉ. अग्रवाल म्हणाले.

गरम पाणी पिताना, ते अत्यंत जास्त तापमानाचे टाळावे. “दिवसभर थोडे थोडे पाणी पिणे, तसेच मध, हर्बल चहा किंवा मिठाच्या पाण्याने गुळण्या करणे यांसारख्या इतर आरामदायी उपायांमुळे बरे होण्यास मदत होऊ शकते,” असे डॉ. घाडगे यांनी सांगितले.

अत्यंत गरम पेये किंवा अन्न पूर्णपणे टाळण्याचा प्रश्न नाही, तर आराम आणि बरे होण्यास मदत होईल अशा योग्य तापमानाचे आणि प्रकारचे अन्न निवडण्याचा आहे. “उबदारपणाचा विचारपूर्वक वापर केल्यास, सर्दीची लक्षणे नियंत्रणात ठेवण्यास आणि नैसर्गिकरित्या अस्वस्थता कमी करण्यास मदत होऊ शकते,” असे डॉ. मुळे म्हणाले.

लक्षणे कमी करण्यासाठी आणखी काय करावे?(What else helps?)

अनेक उपायांमुळे लक्षणे कमी होण्यास आणि रोगप्रतिकारशक्तीला आधार मिळण्यास मदत होऊ शकते. पाणी, सूप किंवा हर्बल चहा पिऊन शरीरात पाण्याची पातळी योग्य राखणे अत्यंत महत्त्वाचे आहे. विश्रांतीमुळे शरीराला संसर्गाशी अधिक प्रभावीपणे लढता येते.

घशाची सूज कमी करण्यासाठी मिठाच्या पाण्याने गुळण्या करण्यावर डॉ. घाडगे यांनी भर दिला. “वाफ घेणे किंवा ह्युमिडिफायरमुळे चोंदलेले नाक मोकळे होऊ शकते, पण गरज भासल्यास वेदनाशामक, नाक मोकळे करणारी औषधे किंवा ओव्हर-द-काउंटर (OTC) औषधे किंवा प्रिस्क्रिप्शनशिवाय उपलब्ध औषधे मदत करू शकतात,” असे डॉ. घाडगे म्हणाले.

पौष्टिक, जीवनसत्त्वयुक्त पदार्थांचा आहारात समावेश केल्याने बरे होण्यासही मदत होऊ शकते.