Adopt Simple Living and Healthy Habits to protect your skin and internal organs: सध्याच्या आधुनिक राहणीमानात आपण नकळतपणे अनेक आजारांना निमंत्रण देत आहोत. केवळ खाण्यापिण्यामुळेच नाही, तर आपण वापरत असलेले प्लास्टिक, नायलॉनचे कपडे आणि रबराच्या चपला सुद्धा आपल्या आरोग्यावर गंभीर परिणाम करत आहेत, असे अनेक वर्षांच्या वैद्यकीय निरीक्षणातून समोर आले आहे.
विकारांना आमंत्रण
साधं राहाणं हल्ली कुणाला फारसं आवडत नाही. पण एक मात्र नक्की लक्षात घ्यायला हवं की, साधं राहणीमान तुम्हाला विकारांपासून दूर ठेवण्याचं काम करतं. अलीकडे आपल्याला होणाऱ्या अनेक विकारांचे मूळ आपल्या राहाणीमानात दडलेले आहे, असे मला माझ्याकडे गेली अनेक वर्षे येणाऱ्या रुग्णांच्या पाहणीतून लक्षात आले आहे. कपड्यांपासून सपाता किंवा चपलांपर्यंत सारे काही बदलले आहे. खूप कृत्रिम गोष्टी वापरात आल्या आहेत. सर्वात महत्त्वाचे म्हणजे प्लास्टिक… आणि या सर्व कृत्रिम गोष्टी विकार घेऊन येताना दिसताहेत. म्हणून आजचा हा भाग त्यासंबंधितच!
कपडे, जोडे आणि विकार
सगळ्यांच रोगांना ‘खाणे-पिणे’ कारणीभूत असते असे नाही. वेडेवाकडे, अतिरेकी कुपथ्यकारक किंवा कमी खाऊन, कदन्न खाऊन, अवेळी खाऊन अनेक पोटाचे व तत्सम विकार होतात, बळावतात आणि दुसऱ्या असाध्य रोगांना जन्म देतात. पण आपल्या नकळत आपले कपडे, अंथरूण-पांघरूण, चपला-जोडेही अनेक रोगांना आमंत्रण देत असतात.
प्लास्टिक आणि रबराचा वापर
आधुनिक राहणीचे आक्रमण, आजकाल केवळ शहरांपुरते सीमित राहिलेले नाही. लहानसहान गावांपर्यंत टेरिलिन, नायलॉन कपडे पोचलेले आहेत. कापसाचे सुताचे कपडे केव्हाच नाहीसे झाले आहेत. पादत्राणे प्लस्टिक व रबर यांचीच वापरावी लागतात. भरपूर पैसे द्याायचे ठरविले तरी चामड्याची पादत्राणे सर्वत्र मिळत नाहीत.

टेरिलिन रोग निर्माण करते
सर्वच प्लास्टिक, रबर, टेरिलिन रोग निर्माण करते असे नाही. पण सुबकता, तलमपणा, नाना आकर्षक रंग, डिझाईनमधील नवलाई व मुख्य म्हणजे या पदार्थांची सेकंड किंवा वापरून वापरून पुन:पुन्हा भट्ट्या लावून तयार केलेल्या प्लास्टिक व रबर यांच्याबरोबर वापरलेली केमिकल्स अनेक रोगांना जन्म देतात. टेरिलिनच्या कपड्यांची अनेकांना अॅलर्जी असते. या कपड्यांमुळे शरीरांतून घामावाटे बाहेर पडणारी मलद्रव्ये बाहेर पडत नाहीत. घाम शरीरात साठून राहतो.
चरबी शरीरात साठते
विशेषत: स्थूल, मधुमेही, रक्तदाब वाढलेले व हृद्रोगी रुग्णांनी टेरिलिन, टेरिकॉट, नायलॉन असे कृत्रिम धाग्याचे कडपे वापरू नयेत. ही मलद्रव्ये त्वचेत साठतात. ज्या वयात हे रोग झालेले असतात, त्या वयात मूत्रेंद्रियांच्या मार्फत मलद्रव्यांचे उत्सर्जन नीट होत नाही. वय साठ-पासष्टच्या पुढे मूत्रेंद्रिय दुर्बल होते. घामावाटे मलद्रव्याच्या बाहेर पडण्याचा रस्ता बंद झाला की फाजील चरबी शरीरात साठते. मग रक्तशर्करा, रक्तातील चरबी, युरिक अॅसिड इत्यादी मळ वाढतात. वर सांगितलेल्या विकारांबरोबर त्वचाविकार सुरू होतात.
त्वचाविकारांना आमंत्रण
असे कपडे घालून किंवा प्लास्टिक व रबराच्या चपला घातल्यामुळे त्वचेचे विकार झालेले अनेकानेक रुग्ण गेली चाळीस- पंचेचाळीस वर्षे माझ्याकडे येत आहेत. त्यांच्या व त्यांची यापूर्वी तपासणी केलेल्या वैद्यकीय चिकित्सकांच्या बहुधा ही गोष्ट लक्षात येत नाही असे चौकशी केल्यावर लक्षात आले. कॉटनचे कपडे, चामड्याच्या किंवा कापडाच्या सपाता, कापडी मोजे घालावयास सांगितले की, त्वचारोगांना उतार पडतो असे पाहिले आहे. मानेवरचा चट्टा, नायटा, अंगावर उठणारे काळे-पांढरे डाग, त्वचेची विवर्णता, काखेत-जांघेत, विलक्षण खाज सुटणे, दीर्घकाळ त्रास देणारा नायटा बळावणे, पावलावर चप्पल लागून होणारे इसब, या विकारांना बऱ्याच वेळा वरील कृत्रिम आवरणे-प्रावरणे, कपडे, चपला-बूट कारणीभूत असतात.
कॉटन वापरा
काही स्त्रियांना आकर्षक व घट्ट बॉडीज घातल्यामुळे स्तनांना फोड, पुरळ, पुटकळ्या झालेल्या आढळतात. काट्याचा नायटा होतो. डायरेक्ट त्वचेशी संबंध येत असलेल्या चड्ड्या, लंगोट, बॉडीज, अंडरवेअर, पोहण्याच्या चड्ड्या, पायमोजे हे सर्व कॉटनचेच असावे. ज्यांना त्वचाविकार, वृक्कविकार, हृद्रोग, मधुमेह, स्थौल्य, कंड, आग, सूज हे विकार बळावू द्याायचे नाहीत त्यांनी कृत्रिम प्रावरणे वापरू नयेत. त्यांनी कॉटनच वापरावे. काहींना अशी कॉटनची महागडी चैन परवडत नाही. त्यांनी काय करावे? कॉटन व टेरिलिन असे दोन्ही धागे असलेले कापडाचे कपडे शिवावेत. टेरिलिनचा कपडा कधीच फाटत नाही, पण त्याचबरोबर त्यामुळे उत्पन्न झालेले त्वचा, घाम, लघवीसंबंधी रोग कायमचे घर करून राहतात.
प्लास्टिक आणि आतड्यांचे विकार
कपड्याच्या किमतीच्या अनेकपट पैसा औषधाकरिता खर्च होऊनही रोग तसेच राहतात. अशीच गोष्ट प्लास्टिक किंवा पॉलिथिलिन पिशव्यांमधील खाद्यपदार्थांची आहे. या पिशव्या दिसायला आकर्षक, वजनाला हलक्या, हाताळायला सोप्या आहेत. पण या पिशव्यांत नेहमीकरिता खाद्यपदार्थ ठेवणे म्हणजे आतड्याचे विकार विकत घेणे आहे.
कृत्रिम रंग टाळा
फळे, भाजी, कोरडे पदार्थ यांच्याकरिता तात्पुरते पॅकिंग म्हणून वापरणे थोडे क्षम्य आहे, पण नेहमीकरिता या पाॅलिथिलिन बॅगच्या वापरांनी पेट्रोलियमधारक द्रव्य आतड्यांना वण निर्माण करू शकतात. अलीकडे अनेक खाद्यपदार्थांत जेलीयुक्त कृत्रिम रंग वापरण्याची फॅशन आहे. मिठाईला लावलेला वर्ख आकर्षक दिसत असला तरी तो पॉयझन आहे. मिठाई बनविताना टाकलेले लाल, गुलाबी, हिरवे, पिवळे, केशरी इत्यादी रंग म्हणजे लहान मुले व म्हाताऱ्यांच्या पोटाची वाट लावण्याचा पक्का मार्ग होय, या रंगांवर बहिष्कार हवा.
