Suniel Shetty basic mantra for good health : बॉलीवूड अभिनेता सुनील शेट्टी (Suniel Shetty) हा जगातील काही खास व्यक्तींपैकी एक आहे, कारण त्याचे वय वाढत असतानासुद्धा तो दिवसेंदिवस तरुण दिसतो आहे. वयाच्या ६३ व्या वर्षीही त्याची शरीराची रचना खूपच चांगली आहे. पण, स्वतःला तंदुरुस्त ठेवणे सोपे नाही. कारण त्यासाठी खूप मेहनत घ्यावी लागते. तर याचबद्दल प्रसिद्ध यूट्यूबर रणवीर अलाहबादियाच्या शोमध्ये अभिनेता सुनील शेट्टीने त्याचा फिटनेसचा मंत्र सांगितला आहे. त्याचा मंत्र हा आहे की, त्याच्या शरीराच्या रचनेचे ८० टक्के श्रेय तो ज्या पदार्थांचे सेवन करतो त्यांना देतो. सुनील शेट्टी घरी शिजवलेल्या अन्नाचे सेवन करतो, तो बाहेरून पदार्थ ऑर्डर करत नाही. तसेच तो पांढऱ्या पदार्थांपासून दूर राहतो. जसे की, मीठ, साखर, भात.”

हा सल्ला आपण अनेकदा अनेकांकडून ऐकला आहे. पण, सुनील शेट्टी (Suniel Shetty) सर्व पांढरे पदार्थ टाळतात, ही माहिती ऐकून आम्हाला आश्चर्यच वाटले. तर हे खरंच फायदेशीर आहे का? याबद्दल जाणून घेण्यासाठी द इंडियन एस्क्प्रेसने इंद्रप्रस्थ अपोलो हॉस्पिटल्सच्या आहारशास्त्र विभागाच्या उपव्यवस्थापक, कनिका नारंग यांच्याशी संवाद साधला. त्यांनी ठळकपणे सांगितले की, पांढऱ्या पदार्थांचे मर्यादित सेवन केल्यास आरोग्य चांगले राहण्यास हातभार लागतो. शुद्ध कार्बोहायड्रेट्स, जसे की भात, व्हाईट ब्रेड यांचा ग्लायसेमिक इंडेक्स जास्त असतो. त्यामुळे हे खाल्ल्यावर रक्तातील साखरेची पातळी झपाट्याने वाढते. यामुळे इन्सुलिन रेझिस्टन्स आणि टाइप २ मधुमेहाचा धोका वाढू शकतो. त्याचप्रमाणे जास्त साखरेचा वापर लठ्ठपणा, मेटाबॉलिक सिंड्रोम आणि दातांच्या समस्यांशी निगडीत असतो.

हेही वाचा…Four habits : तुम्हीसुद्धा काम करताना मांडी घालून बसता का? आरामदायक वाटणारी स्थिती या आरोग्य समस्यांना देते आमंत्रण; वाचा डॉक्टरांचा सल्ला

सर्व पांढरे पदार्थ टाळणे आरोग्यदायी आहे का?

अन्नातील सगळ्यात पहिला पांढरा पदार्थ म्हणजे मीठ. कारण मिठाचे सहसा जास्त सेवन केले जाते. पण, मिठाचे सेवन कमी करणे हे हृदयाच्या आरोग्यासाठी आवश्यक आहे. अतिरिक्त सोडियम हे उच्च रक्तदाबात महत्त्वाचे योगदान देते, ज्यामुळे हृदयविकार, स्ट्रोकचा धोका वाढतो. फरीदाबाद येथील यथार्थ सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल्सच्या, डायरेक्टर इंटर्नल मेडिसिन अँड रुमॅटोलॉजी डॉक्टर जयंता ठाकुरिया यांनीसुद्धा या गोष्टीवर सहमती दर्शवली आहे. त्या म्हणाल्या की, “जास्त मिठाचा आहार दीर्घकालीन उच्च रक्तदाबात योगदान देऊ शकतो, ज्यामुळे हृदय व रक्तवाहिन्यांसंबंधी रोग आणि स्ट्रोकचा धोका वाढतो. त्यामुळे मीठ, भात, साखर यांचे प्रमाण कमी करून तुम्ही संपूर्ण धान्य, फळे, भाज्या यांसारख्या पोषक तत्वांनी भरपूर पर्यायांची निवड करू शकता आणि रक्तातील साखरेची पातळी सुधारू शकता. एकूणच यामुळे तुमचा आहार सुधारेल आणि हृदयरोगाचा धोका कमी होईल.

यात काही जोखीम आहे का?

कनिक्का मल्होत्रा, सल्लागार आहारतज्ज्ञ आणि मधुमेह शिक्षक चेतावणी देतात की, अतिशय कडक आहार योजना असलेल्या आहारामुळे अस्वस्थ आहार पद्धती आणि पोषणात असंतुलन निर्माण होऊ शकते, त्यामुळे लोकांचे इतर पदार्थांवरचे आकर्षण वाढू शकते आणि ते निरोगी अन्न खाण्याऐवजी अनहेल्दी पदार्थांकडे वळू शकतात. उदाहरणार्थ, साखर आणि प्रक्रियायुक्त पांढरे पदार्थ टाळणे फायदेशीर आहे, पण योग्य पर्यायांशिवाय दूध किंवा भात खाणं पूर्णपणे बंद केल्यामुळे पोषक तत्वांची कमतरता जाणवू शकते. कारण कमीत कमी प्रक्रिया केलेला तांदूळ (भात), आवश्यक ऊर्जा व पोषक तत्वे प्रदान करू शकतात. त्याचप्रमाणे दूध, कॅल्शियम, व्हिटॅमिन डी, प्रथिने हाडांच्या आरोग्यासाठी महत्त्वाचे पोषक तत्त्वांचा एक मौल्यवान स्रोत आहे. जर तुम्हाला दूग्धजन्य पदार्थ पूर्णपणे टाळायचे असल्यास बदाम किंवा सोया दूधसारख्या फोर्टिफाइड पर्यायांनी बदलू शकता, नाही तर शरीरात कमतरता निर्माण होऊ शकते.

तुम्ही काय करावे?

तर दोन्ही आहारतज्ज्ञ संतुलन आणि विविधतेस प्रोत्साहन देतात. संतुलित आहार घेतल्याने शरीरास आवश्यक सर्व घटक मिळतात आणि आरोग्य चांगले राहते. पांढऱ्या भाताच्या ऐवजी किव्हा, ओट्स किंवा ज्वारीसारखे संपूर्ण धान्य उत्तम पर्याय आहेत. कमी फॅट किंवा स्किम दूधही अनेक फायदे देते. पण, त्यात अतिरिक्त फॅट नसतो. विविध फळे, भाज्या, कमी फॅट प्रथिने, आहारात समाविष्ट करून आपण एक संतुलित आणि पोषक आहार मिळवू शकतो. लॅक्टोज असहिष्णुता किंवा प्री-मधुमेह यांसारख्या विशिष्ट आरोग्यविषयक चिंता असलेल्यांसाठी, आरोग्य सेवा प्रदात्याशी किंवा आहारतज्ज्ञांशी सल्लामसलत केल्याने वैयक्तिक गरजांनुसार आहारातील पदार्थ निवडण्यास मदत होते.

(टीप – कोणतीही दिनचर्या सुरू करण्यापूर्वी तुमच्या डॉक्टरांचा सल्ला घ्या)

Story img Loader