Who Should Avoid Cold Showers: थंड पाण्याने अंघोळ करण्याचे अनेक फायदे आहेत. थंड पाण्याने अंघोळ केल्याने जळजळ कमी होणे, त्वचा शांत होणे असे अनेक फायदे आहेत. परंतु, ते प्रत्येकासाठी योग्य नाहीत. काही विशिष्ट वैद्यकीय परिस्थिती किंवा कमकुवतपणा असलेल्या व्यक्तींसाठी ही पद्धत लक्षणीय धोके निर्माण करू शकते.
मुंबईतील ग्लेनेगल्स हॉस्पिटलमधील औषधांच्या वरिष्ठ सल्लागार डॉ. मंजुषा अग्रवाल यांनी असा इशारा दिला आहे की, मधुमेह किंवा श्वसनाच्या समस्यांसारख्या दीर्घकालीन आजारांनी ग्रस्त असलेल्या लोकांनी दररोज थंड पाण्याने अंघोळ करणे टाळावे. कमकुवत रोगप्रतिकारक शक्ती किंवा दीर्घकालीन आजार असलेल्यांसाठी थंड पाण्याने अंघोळ करण्याने लक्षणे आणखी बिघडू शकतात किंवा बरे होण्याची प्रक्रिया मंदावू शकते, त्यामुळे नियमितपणे थंड पाण्याने अंघोळ करण्यापूर्वी वैद्यकीय सल्ला घेणे महत्त्वाचे आहे.
तज्ज्ञांच्या मते, खालील आरोग्य स्थिती असणाऱ्यांनी लोकांनी टाळावे
हृदयरोग असलेल्या व्यक्ती
थंड पाण्याने अंघोळ केल्याने रक्तवाहिन्या अचानक आकुंचन पावू शकतात, ज्यामुळे रक्तदाब आणि हृदय गती वाढते. कोरोनरी आर्टरी डिसीज किंवा हार्ट फेल्युअरसारख्या हृदयरोग असलेल्या लोकांसाठी, यामुळे त्यांची स्थिती आणखी बिकट होऊ शकते आणि हृदयविकाराचा झटका किंवा स्ट्रोकचा धोका वाढू शकतो. दिल्लीतील सीके बिर्ला हॉस्पिटलमधील इंटरनल मेडिसिनमधील प्रमुख सल्लागार डॉ. नरेंद्र सिंघला यांनी भर दिला की, या जीवघेण्या गुंतागुंती टाळण्यासाठी हृदयरोग असलेल्यांनी थंड पाण्याने अंघोळ करणे टाळावे.
उच्च रक्तदाब असलेले लोक
डॉ. सिंघला हे देखील सांगतात की, उच्च रक्तदाब असलेल्या व्यक्तींना हृदय व रक्तवाहिन्यांसंबंधी आजारांचा धोका जास्त असतो. थंड पाण्याच्या धक्क्यामुळे रक्तदाब वाढू शकतो, जो आधीच उच्च रक्तदाब पातळीचा सामना करणाऱ्यांसाठी धोकादायक असू शकतो. रक्तदाब अचानक वाढल्याने स्ट्रोक, हृदयविकाराचा झटका किंवा इतर हृदय व रक्तवाहिन्यांसंबंधी आजार होऊ शकतात.
स्ट्रोकपासून वाचलेले लोक
डॉ. सिंघला म्हणाले की, ज्या लोकांना स्ट्रोक किंवा सेरेब्रोव्हस्कुलर आजारांची लक्षणे आधीपासून आहेत, त्यांनी थंड पाण्याने अंघोळ करण्याबाबत सावधगिरी बाळगली पाहिजे. अचानक तापमानात बदल झाल्यामुळे रक्तदाबात तीव्र वाढ होऊन वारंवार स्ट्रोक येण्याचा धोका वाढू शकतो. या कारणास्तव, स्ट्रोकमधून वाचलेल्यांनी त्यांच्या दिनचर्येत थंड पाण्याने अंघोळ करण्यापूर्वी त्यांच्या आरोग्यसेवा प्रदात्यांचा सल्ला घ्यावा.
रेनॉड रोग असलेल्या व्यक्ती
रेनॉड रोग हा एक असा आजार आहे, ज्यामध्ये थंडीमुळे बोटे आणि हातपायांमधील रक्तवाहिन्या जास्त प्रमाणात आकुंचन पावतात. रेनॉड रोग असलेल्यांना थंड पाण्याच्या संपर्कात आल्याने तीव्र वेदना, सुन्नपणा आणि अत्यंत अस्वस्थता येऊ शकते. डॉ. सिंघला यांनी सांगितल्याप्रमाणे, थंड पाण्याने अंघोळ केल्याने ही लक्षणे आणखी वाढू शकतात, त्यामुळे या आजाराने ग्रस्त असलेल्या व्यक्तींनी ते टाळावे.
वृद्ध व्यक्ती
शरीराचे तापमान नियंत्रित करण्याची क्षमता कमी झाल्यामुळे वृद्धांना हृदय व रक्तवाहिन्यांसंबंधी धोका आणि हायपोथर्मियाचा धोका जास्त असतो. डॉ. सिंघला सल्ला देतात की, वृद्ध व्यक्तींनी थंड पाण्याने अंघोळ करणे टाळावे, कारण शरीरातील प्रणालीला धक्का बसल्याने आरोग्यावर प्रतिकूल परिणाम होऊ शकतात, ज्यामध्ये हृदयाच्या गुंतागुंती किंवा चक्कर आल्याने पडण्याचा धोका वाढू शकतो.