5 Ways To Avoid Heart Attack : हृदयाचे आरोग्य जपणे म्हणजे फक्त आहारावर लक्ष केंद्रीत केले की झाले असे होत नाही. आपल्या रोजच्या जीवनातील काही छोट्या सवयी देखील महत्त्वाची भूमिका पार पाडतात. बऱ्याचदा लोक अशा चुका करतात ज्या हळूहळू हृदयाच्या आरोग्यासाठी घातक ठरतात. हृदयविकारतज्ज्ञांच्या मते, जर तुम्ही वेळीच तुमच्या जीवनशैलीत सुधारणा केली नाही आणि आरोग्यासाठी घातक सवयी सोडल्या नाही तर हृदय विकाराचा धोका मोठ्या प्रमाणात वाढू शकतो.
इन्स्टाग्रामवर सक्रिय बोर्ड-सर्टिफाइड कार्डियोलॉजिस्ट डॉ. निकोल हार्किन यांनी हृदयाला निरोगी ठेवण्यासाठी अशा ५ गोष्टी सांगितल्या आहेत ज्यांना आपल्या जीवनशैलीत कधीही स्थान देऊ नये. त्यांनी सांगितले की, हृदय निरोगी ठेवायचे असेल तर आहार आणि जीवनशैलीतील छोटे छोटे बदल खूप फायदेशीर ठरू शकतात. तज्ज्ञांच्या व्हिडीओनुसार, कोणत्या सवयी आहेत ज्या हृदय निरोगी ठेवण्यासाठी बदलणे आवश्यक आहेत ते जाणून घ्या.
धुम्रपान किंवा वेपिंगमुळे हृदयाला वाढतोय धोका (Smoking or vaping increases heart risk)
cdc.govच्या वृत्तानुसार, सिगारेटचा धुर रक्तवाहिन्यांना नुकसान पोहचवू शकतो आणि हृदयाच्या धमन्यांमध्ये प्लाक साचण्याच्या प्रक्रियेला चालना देतो. निकोटीनमुळे हृदयाचे ठोके आणि रक्तदाब वाढवतो आणि रक्तवाहिन्या आकुंचित करतो. त्यामुळे रक्ताच्या गुठळ्या होण्याची शक्यता वाढू शकते जे हार्ट अटॅक आणि स्ट्रोकचा धोका वाढवते.
cdc.govच्या वृत्तानुसार, वेपिंगला पूर्णपणे सुरक्षित मानले जात नाही. ई-सिगारेटच्या एरोसोलमध्ये असलेले काही रसायन ऑक्सडेटिव्ह स्ट्रेस आणि सूज वाढवू शकतात. तसेच रक्तवाहिन्यांचे सामान्य कामकाजाला प्रभावित करू शकतात. निकोटीनद्वारे वेपिंग प्रोडक्ट ब्लड प्रेशर आणि हृदयाच्या ठोक्यांची गती वाढवून हृदयावर जास्तीचा दाब टाकतात त्यामुळे सिगारेट आणि वेपिंग टाळणे गरजेचे आहे.
प्रक्रिया केलेले मांस हृदयासाठी घातक? (Is processed meat bad for the heart?)
American Heart Associationच्या मते, सॉसेज, बेकन, सलामी, हॉट डॉग सारख्या प्रक्रिया केलेले मांसामध्ये सोडियम आणि सॅच्युरेटेड फॅटचे प्रमाण अधिक असते. या फूड्सचे अधिक सेवन केल्याने उच्च रक्तदाब, खराब कोलेस्ट्रॉल आणि इतर कार्डियो मेटॅबॉलिक जोखीम वाढवते. याच कारणामुळे अमेरिकन हार्ट एसोसिएशनने निरोगी हृदयासाठी आहारात प्रक्रिया केलेल्या मांसाचे सेवन कमी करण्याचा सल्ला दिला आहे.
छातीतील दुखण्याकडे दुर्लक्ष करू नका (Don’t ignore chest pain)
अमेरिकन हार्ट एसोसिएशन (AHA) आणि अमेरिकन कॉलेज ऑफ कार्डियोलॉजी (ACC)सह काही तज्ज्ञ संस्थांच्या २०२१च्या ‘Guideline for the Evaluation and Diagnosis of Chest Pain’ नुसार, छातीत दुखणे, दाब, आखडल्यासारखे वाटमे किंवा अस्वस्थता जाणवत असेल तर दुर्लक्ष करू नये. कारण ही वेदना फक्त छातीपर्यंत मर्यादीत नसते तर खांदा, हात, मान, पाठ किंवा पोटाच्या वरच्या भागात किंवा जबड्यामध्ये देखील जाणवू शकते. श्वास घेण्यास अडचण आणि थकवा देखील जाणवू शकतो.
तुमच्या कुटुंबात हृदयविकाराचा इतिहास असल्यास सावधगिरी बाळगा.(Take precautions if you have a family history of heart disease.)
अमेरिकन हार्ट एसोसिएशन (AHA)च्यानुसार, जर आई-वडिलांना, भावंडांना किंवा आजी-आजोबांना हार्ट अटॅक किंवा स्ट्रोक आला असेल, तर त्या व्यक्तीला हृदयविकाराचा धोका जास्त असू शकतो. याचे कारण केवळ जीवनशैलीतील घटकच नव्हे, तर अनुवांशिक प्रवृत्ती देखील असू शकते. कौटुंबिक इतिहासामुळे त्या व्यक्तीला हृदयविकाराचा झटका येईलच याची खात्री नसते, परंतु तो एक महत्त्वाचा धोक्याचा संकेत असतो. अशा व्यक्तींनी आपल्या कुटुंबाच्या वैद्यकीय इतिहासाची माहिती ठेवणे आणि रक्तदाब, कोलेस्ट्रॉल, रक्तातील साखर व इतर संबंधित मापदंडांसाठी डॉक्टरांकडून नियमित तपासणी करून घेणे आवश्यक आहे.
चांगली झोप ही हृदयाची गरज आहे (Good sleep is a necessity of the heart)
अमेरिकन हार्ट असोसिएशनच्या मते, झोपेच्या वेळी शरीराला पूर्ववत होण्यासाठी वेळ मिळतो. सातत्याने कमी किंवा निकृष्ट दर्जाच्या झोपेचा संबंध उच्च रक्तदाब, चयापचय क्रियेतील बिघाड, लठ्ठपणा, दाह आणि हृदयरोग यांसारख्या धोक्याच्या घटकांशी जोडला गेला आहे. अमेरिकन हार्ट असोसिएशनच्या मते, बहुतेक प्रौढांनी सरासरी ७-९ तास झोप घेण्याचे लक्ष्य ठेवले पाहिजे. म्हणजेच, हृदयाची सुरक्षितता केवळ आहार आणि व्यायामापुरती मर्यादित नाही, तर तुम्हाला धूम्रपान टाळणे, चांगला आहार घेणे, पुरेशी झोप घेणे, आपले धोके जाणून घेणे आणि धोक्याची चिन्हे वेळेवर ओळखणे देखील आवश्यक आहे.
